आनंदी माणसाचा सदरा

काही वर्षांपूर्वी UK मध्ये रहात असतांना एकदा माझ्या मैत्रिणीचे आई वडील तिला भेटायला आले. त्यांना फिरवायला म्हणून ती खास केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला घेऊन गेली. “वीकेंडला घरी एकटी बसून काय करशील?” म्हणत तिने मलाही सोबत ओढून नेलं. चालून चालून दमल्यावर आम्ही तिथल्या नदीत punting tour घ्यायची ठरवली. यात बोटीला वल्ह्याऐवजी एका लांब काठीने पुढे ढकललं जातं. बोटीत बसेपर्यंत मी त्या जागेच्या प्रेमात पडले होते. तिथे शिकून बाहेर पडलेले मोठमोठे शास्रज्ञ, मॅथेमॅटिशिअन्स, फिलॉसॉफर्स, लेखक, कवी, कलाकार या सगळ्यांच्या विचाराने मी भारावून गेले होते. त्यासोबतच एवढ्या रोमँटिक ठिकाणी लोकांचा अभ्यास कसा होत असेल असाही एक तारुण्य सुलभ विचार माझ्या मनाला चाटून गेला.

आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत डोळ्यांना सुखावणारी हिरवळ, त्यावर ठिकठिकाणी पसरलेली हसणारी, अभ्यासात बुडालेली किंव्वा स्वतःच्या विश्वात हरवलेली तरुणाई, त्याच्या पलीकडे तेराव्या चौदाव्या शतकापासूनच्या प्रशस्त इमारती, एवढ्या मस्त माहोल मध्ये अभ्यास करावा की रोमान्स अश्या द्विधा मनाचं प्रतिबिंब दाखवणारा आकाशातला ऊन आणि ढगांचा खेळ, बोटीत बसण्याआधी आलेल्या पावसाच्या सरीने धुंद झालेलं वातावरण आणि प्रियकराच्या स्पर्शाची आठवण करून देणारी वाऱ्याची मंद झुळूक. मला काही क्षणांत ढगात तरंगत असल्यासारखं वाटायला लागलं. आणि त्या वातावरणात शांतता भंग करणारा (आणि ढगातल्या एका भोकातून माझा एक पाय जमिनीवरच्या दलदलीत रुतवणारा) एक आवाज “सुधा तू लांब दांडीची छत्री घे”.

त्याचं असं झालं की बोटीत बसण्याआधी जी पावसाची सर आली तिच्यासोबत जोराचा वारादेखील आला होता. आणि आम्ही त्याची दखल घ्यावी या विचाराने आमच्या छत्र्या उलट्या करून गेला होता. आम्ही फार काही भिजण्याआधीच आली त्या वेगाने सर आणि तिच्या हातात हात घालून वारा आमच्यावर हसत निघून गेले. पण जातांना काकूंना एक निमित्त देऊन गेले. अर्ध्या पाऊण तासाच्या बोटीच्या प्रवासात, प्रियकर नसला तरी त्याच्या विचाराने देहभान विसरावं अश्या त्या वातावरणात, काकू मात्र सुधाने लांब दांडीची छत्री घ्यावी यासाठी अविरत वेगवेगळे युक्तिवाद मांडत होत्या आणि माझी ती मैत्रीण सुद्धा तेवढ्याच चिकाटीने तो पुर्ण वेळ त्यांचा युक्तिवाद मोडून काढत “मी लांब दांड्याची छत्री घेणार नाही” हे पुन्हा पुन्हा ठसवून सांगत होती. अनेकदा मला त्या मायलेकींना लांब दांड्याच्या छत्रीला बांधून वाऱ्यावर सोडून द्यायची तीव्र इच्छा झाली. पण लहानपणापासून झालेले संस्कार आडवे येत होते. त्यामुळे मी जास्त जास्त frustrate होत होते. शेवटी शेवटी तर मला कधी एकदा त्या बोटीतून बाहेर पडतोय असं झालं होतं. त्या दिवशी मला पहिल्यांदा कपाळकरंटे असणं म्हणजे काय याचा उलगडा झाला.

मला वाटतं आयुष्यात आनंदी राहण्यासाठी फार काही लागत नाही. लागते ती फक्त आनंद उपभोग्यण्याची वृत्ती. पण मी जेवढं जास्त जग बघितलं तेवढी मला त्या वृत्तीची कमी अधिकाधिक जाणवली. पहिला पाऊस आल्यावर त्याच्यात भिजायचा विचार येण्याऐवजी गच्चीत वाळत घातलेले कपडे आठवणं, पानात सुग्रास अन्न पडल्याक्षणी त्यातल्या कॅलरीज डोळ्यात खुपणं, एखाद्याने नवीन वस्तू घेतल्यावर ती त्याला/तिला कशी महागात पडली हे पटवून देणं, सूर्यास्ताच्या वेळेस आकाशातली रंगांची उधळण सोडून मोबाईल मध्ये डोकं घालून बसणे, ही त्याची काही उदाहरणं.

खरंच आनंदी रहायला काय लागतं? पु. ल. म्हणतात तसं “जीवनातली बहुतेक सगळी मोठी, अवर्णनीय सुखं फुकटात मिळतात.” पहिला पाऊस येऊन गेल्यावर वातावरणात पसरलेला मृदगंध – फुकट. रस्त्याने जातांना किनाऱ्याला उगवलेली मोहक फुलं – फुकट. निष्पर्ण झाडावर आलेल्या पहिल्या पालवीचे हिरवे ठिपके बघण्यातली मजा – फुकट. अनपेक्षितरित्या कुठून तरी आपल्या आवडीच्या पक्षाचा आवाज येऊन मनाला प्रसन्न करून जातो; आपण लावलेल्या झाडाची पहिली कळी उमलतांना बघण्यातला आनंद; एखाद्या कंटाळवाण्या सकाळी, नाईलाजाने ऑफिसला जातांना अचानक रेडिओवर आपल्या आवडीचं गाणं लागणं, किशोरी ताईचं गाणं ऐकतांना ब्रम्हानंदी टाळी लागणं हे सगळे आनंद फुकट. एक दिवस माझ्याशी फोनवर बोलत असतांना आई मला दहा वर्षांच्या मुलीच्या उत्साहाने सांगायला लागली “अगं, सकाळी अंघोळ करून टॉवेल वाळत घालायला गच्चीवर गेले तर समोर मोठ्ठा इंद्रधनुष्य! हातातली सगळी कामं सोडून तो दिसेनासा होईपर्यंत गच्चीतच बसून राहिले.” तिच्या एकाकी जगांत रंगांची उधळण करून तिला आनंदात चिंब करणारं ते इंद्रधनुष्य – फुकट!

हॉस्टेलला रहात असतांना माझा रोज संध्याकाळी आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर मुक्काम असे. आजूबाजूला कुठलीच उंच इमारत नसल्याने, सगळीकडून क्षितिज दिसायचं. तिथून सुर्यास्त काय सुंदर दिसायचा म्हणून सांगू. रोज वेगळे रंग, वेगळी उधळण, नवीन पॅटर्न. मी स्वतःला हरखून आकाशातली रंगाची शेवटची छटा दिसेनाशी होईपर्यंत बघत बसायचे. समोरच्या बसक्या इमारतीच्या छपरावर अगणित कबुतरं बसलेली असायची. नाक्यावर रेंगाळणाऱ्या, “चल यार अंधार झाला, उशीर झाला तर आई रागवेल” असं म्हणून अजून एक तास मित्रमंडळींसोबत गप्पा छाटणाऱ्या चुकार मुलांसारखी जायला उठायची आणि आकाशात एक चक्कर मारून परत त्याच छपरावर येऊन बसायची. शहाण्या मुलांसारखे, अंधार पडल्यावर निमूटपणे घराकडे उडत जाणारे इतर अगणित पक्षी दिसायचे. आणि हा सगळा शो रोज फुकट. परीक्षेतही माझ्या या गच्ची भेटीत खंड पडत नसे. माझी रूममेट माझ्यावर अभ्यासाचा वेळ वाया घालवते म्हणून आग पाखड करायची आणि मग परीक्षेचा निकाल लागल्यावर मला तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले की अधिकच चिडचिड करायची. माझी गच्ची भेट सतत तिच्या डोळ्यात खुपायची. एकदा दोनदा तर तिने माझ्यावर पाळतही ठेवली, मी गच्चीत कोणाला चोरून भेटते की काय हे बघण्यासाठी. तिला मी काय समजावणार की गच्ची वरचा तो वेळ माझ्या थकलेल्या मनाची मरगळ दूर करायचा, अभ्यास करायला नवीन उभारी द्यायचा. निसर्गासोबतचा तो एकांत माझ्यासाठी ते करत होता, जे महागड्या थेरपिस्टना पण जमलं नसतं. अभ्यास, परीक्षेचा निकाल, नोकरी, भविष्य या सगळ्या काळजीत टाकणाऱ्या गोष्टींना काही वेळासाठी विसरायला लावायचा.

आम्ही तारकर्लीच्या ट्रिप मध्ये असंच एकदा सूर्यास्त बघत समुद्रकिनाऱ्यावर बसलो. ऑफ सिझन असल्याने बीचवर आमच्या शिवाय कोणीच नव्हतं. अंधार पडल्यावर आम्ही दोघेही तिथेच आपले टॉवेल पसरून त्यावर आडवे झालो. डोळ्यासमोरच्या अंगणात चांदण्यांची फुलं पसरलेली आणि साथीला फक्त लाटांचा सुखावणारा आवाज. साऊंड थेरपी तरी याच्यापेक्षा वेगळी काय असेल? आम्ही दोघेही निःशब्द होऊन मनात ते सगळं साठवून घेत होतो. तिथून परतल्यावर देखील आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही, बोलायची आवश्यकताच भासली नाही. मनात पसरलेल्या समाधानाला कुठल्याच आवाजाने ओरखडा उमटवण्याची आमची इच्छा नव्हती. पण अश्या नितांत सुंदर ठिकाणी जाऊन लोक जेव्हा मोट्ठ्या आवाजात ढँगढँग गाणी लावतात तेव्हा त्यांच्यावर भडकावं की त्यांची कीव करावी हेच समजेनासं होतं.

एकदा आम्ही मित्रमंडळींनी सहज म्हणून माथेरानचा ट्रेक आखला. ट्रेकचा मुळ हेतू पावसाचा आनंद घेणे हा असल्याने, प्लॅन अगदी साधासा होता. रिक्षेने जुम्मापट्टी पर्यंत जायचे. तिथे उतरून आड वाटेने खालील गावात परत उतरायचे. आमच्यातील एकालाच रस्त्याचा साधारण अंदाज होता. पण काही कारणाने आम्ही रास्ता चुकलो आणि एका दरीच्या काठाशी येऊन पोहोचलो. दरीच्या पलीकडे उंच डोंगर आणि त्यात ७-८ धबधबे. आम्ही सगळे वेळकाळ विसरून एकेक दगड पकडून शांत बसून राहिलो. समोर हिरवागार डोंगर आणि त्यात स्वतःला झोकून देणारे ते धबधबे. कानांवर फक्त पावसाची रिपरिप आणि त्याला साथ देत त्या धबधब्यांची गाज. त्या काही क्षणांनी आमचा तो ट्रेक सार्थकी लागला. नंतर प्रयत्न करून देखील आम्हाला ती जागा पुन्हा कधी सापडली नाही. पण जेव्हा ती लाभली तेव्हा तिचा मनसोक्त उपभोग घेतल्याचं समाधान मनात चिरंतन राहील.

एकदा मित्रमंडळींसोबत ट्रिपला गेलो होतो. रात्री मुलांना झोपवून आमचा Pictionary चा डाव रंगला. त्यात मी बेडूक काढला (काढला म्हणण्यापेक्षा काढण्याचा प्रयत्न केला म्हणणं योग्य ठरेल). दिलेली वेळ संपल्यावर मी जेव्हा तो बेडूक आहे सांगितलं तेव्हा सगळ्यांनी आळीपाळीने माझ्याकडे आणि त्या बिचाऱ्या बेडकाकडे बघायला सुरुवात केली. अचानक कोणातला समीक्षक जागा झाला. “बेडकाला दोनच पाय?” मग त्यावरून त्याचे “ठाकूर बेडूक” असे नामकरण करत हसून झालं. मग कोणालातरी जाणवलं कि इतर शरीरापेक्षा त्याचा पार्श्वभाग अति मोठा काढलाय म्हणून मग त्याचं JLo बेडूक नाव देऊन हसलो. त्यानंतरचा एक तास फक्त त्या बेडकावर ताशेरे ओढण्यात आणि प्रत्येक ताशेऱ्यावर गडाबडा लोळून हसण्यात गेला. आजदेखील त्या बेडकाकडे बघितलं की नैराश्याचं मळभ दूर होतं. या आनंदाची किंमत काय तर एका रात्रीची झोप, आणि आपल्यासारख्याच आनंदी राहणाऱ्या मित्रमंडीळीची संगत.

“आत्या झोपली आहे, तिला त्रास देऊ नकोस” ही आई बाबांची तंबी शिरसावंद्य मानून, माझ्या खोलीच्या दारात कित्येक वेळ आवाज नं करता माझ्याकडे एकटक बघत उभी असलेली माझी ४ वर्षांची भाची, माझे डोळे उघडताच “आत्या, झोप झाली? चल आता आपण खेळू” म्हणत माझ्याकडे झेप घेते तेव्हा रामदास स्वामींच्या “जगी सर्वसुखी असा कोण आहे?” या प्रश्नाला, त्या चिमुरडीच्या उत्साहात उड्या मारत “मी, मी” असं मला ओरडावंसं वाटतं.

मग या सगळ्याचा असा अर्थ आहे का की स्वप्नांमागे, ध्येयामागे धावू नये? मुळीच नाही. स्वप्नांच्या मागे धावण्यात एक वेगळाच आनंद आहे. पण धावायला सुरुवात करण्याआधी ज्यांच्यामागे धावतोय ती आपलीच स्वप्नं आहेत की दुसऱ्यांच्या स्वप्नांचे कवडसे, हे मात्र तपासून बघता आलं पाहिजे. आणि धावता धावता रस्त्यात एखादं फुलपाखरू दिसलं तर मंत्रमुग्ध होऊन काही काळासाठी तिथे थांबताही आलं पाहिजे. फुलांचा मंद सुगंध कुठून येतोय याचा शोध घेत आडवाटेला शिरता आलं पाहिजे. स्वप्नपूर्तीएवढाच त्याच्यामागे धावण्याचा प्रवास देखील मोहक असावा. मग स्वप्नं भंगलं तरी त्याचं दुःख कमी होतं कारण रस्त्यात अनेक विस्मरणीय क्षण आपल्या झोळीत पडलेले असतात.

तर मुद्दा असा आहे की आनंदी राहण्यासाठी लागते ती फक्त समोर मिळणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्याची वृत्ती. भलेही त्या गोष्टी क्षणिक असतील पण ते काही क्षण चिरकालासाठी आनंद देऊन जातात. असे क्षण क्षण जमवतंच तर आयुष्य घडतं. पण त्यासाठी गोष्टींचा किस नं पाडता त्यांना उपभोगता आलं पाहिजे. केम्ब्रिज च्या त्या रम्य वातावरणात मुलीचा डोळा चुकवून हळूच काकांच्या हातात हात द्यायचा की लांब दांड्याची छत्री घेण्यासाठी सुधाचं डोकं खायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. शेवटी काय आनंद घेण्याची वृत्ती आतून यावी लागते, ती बाहेरून सांगून येत नाही. नाहीतर काय, आहेच आपली “लांब दांड्याची छत्री!”.

Leave a Reply