बॅकबेंचरगिरी

सगळ्यात चांगली मैत्री ही बॅकबेंच वरच होते. कदाचित सगळेच या विचाराशी सहमत नसतील. माझ्या काही ‘चांगल्या’ मित्रांच्या मते, सगळ्यात चांगली मैत्री सिगारेट पितांना होते. पण मी कधी तो अनुभव (सिगारेट पिण्याचा आणि तेव्हा मैत्री होण्याचा, दोन्ही) घेतला नसल्यामुळे, माझ्या मते बॅकबेंच ही मैत्री साठी भन्नाट जागा आहे. माझ्या कमनशिबाने  मला या सत्याचा शोध जरा उशिराच म्हणजे कॉलेज मध्ये गेल्यावर लागला.

कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण आणि मी, मागच्या बेंचवर बसून अनेक उचापत्या केल्यात, पण त्यातली सगळ्यात आवडीची उचापती म्हणजे चेहरा निर्विकार ठेऊन अशी काही तरी कमेंट करणे जी ऐकून आमच्या पुढच्या बेंच वर बसणारे हसलेच पाहिजे. गोत्यात आल्यावर त्यांनी आमच्याकडे बोट दाखवलं तर आमचा निर्विकार चेहरा आमच्या निर्दोष पणाची साक्ष द्यायला पुरेसा असायचा. 

कॉलेज मधला वेळ हे उद्योग करायला पुरे पडत नसल्यामुळे (लेक्चर बंक करण्यामुळे) अजाणतेपणी ते उद्योग माझ्यासोबत क्लास ला पण आलेत. त्याच दरम्यान मॅथ्स साठी मी एका क्लास ला जायचे.  या क्लास ची खासियत अशी की इथे बॅकबेंचरगिरी साठी कुजबुजण्याची गरज नसायची. उलट क्लास घेणाऱ्या M.D. मॅडम ते एन्जॉय करायच्या. त्यामुळे सगळे timepass कंमेंट्स मोठ्याने करता यायचे, आणि त्याला त्या वेळोवेळी दाद किव्वा प्रत्युत्तर द्यायच्या. कधी कधी क्लास नेहेमीपेक्षा जरा जास्तच शांत वाटला तर त्या स्वतःच आम्ही कंमेंट करू असे काहीतरी विषय काढायच्या किव्वा कंमेंट करायच्या. माझे काही मित्र मैत्रिणी या क्लास ला फक्त या timepass साठीच जायचे. इथेच मला माझी जिवाभावाची मैत्रीण भेटली. खरं तर आम्ही दोघी वेगळ्या कॉलेजच्या, त्यातून ती मला एक वर्ष सिनियर. पण आधीच्या वर्षी मॅथ्स राहिल्यामुळे तिने फक्त ऑक्टोबर मध्ये परत पेपर देण्यासाठी ४ महिने हा क्लास जॉईन केला होता. थोडक्यात काय, तर नॉर्मल सिचुएशन मध्ये आम्ही दोघी भेटण्याचे दूर दूर पर्यंत काहीही चान्स नव्हते. पण आम्ही फक्त भेटलोच नाही तर ४ महिन्यात एकमेकींचे सिक्रेट्स शेअर करणाऱ्या जिगरी मैत्रिणी झालो. आणि त्याचं कारण होतं या क्लास मध्ये पहिल्याच आठवड्यात एकमेकींच्या बाजूला बसून केलेली बॅकबेंचरगिरी!

कॉलेज संपवून जॉब चालू झाला तरी मला माझ्यासारखे अवलिया बॅकबेंचर्स भेटतच राहिले. माझ्या पहिल्या जॉब मध्ये असाच माझा एक मित्र होता. तो, मी आणि माझा प्रोजेक्ट मॅनेजर आम्ही तिघे एकाच क्युबिकल मध्ये बसायचो. माझ्या उजवीकडे माझा मॅनेजर आणि त्याच्या उजवीकडे (आणि माझ्या diagonally opposite) माझा हा मित्र. रोज कमीत कमी १०-१४ तास काम करवून घेणाऱ्या या कंपनी मध्ये त्या मित्रांसोबत केलेली बॅकबेंचरगिरी हा माझ्यासाठी एकमेव स्ट्रेस बस्टर होता. IP मेसेंजर हा आमच्या सारख्या गोरगरिबांसाठी बनवण्यात आलेला देवदूत होता.  दिवसभर मला आणि टीम मधल्या बाकीच्या लोकांना छळण्याबद्दल आम्ही या मॅनेजर वर मनसोक्त तोंडसुख (किव्वा messenger सुख) घेत असू. बऱ्याचदा एकाच वेळेला पिकलेली आमच्या दोघांची खसखस ऐकून मॅनेजर अधून मधून आमच्याकडे संशयाने बघायचा पण कधी त्याच्या हाती ठोस पुरावा लागला नाही आणि पुराव्याअभावी आमची कायम निर्दोष मुक्तता झाली. दिवसभरच्या या उचापत्यांनी पोट न भरल्याने आम्ही लंच नंतर walk ला जाऊन आमची उरलेली भूक भागवत असू. यात जुनाट टेकनॉलॉजी वर काम करत असल्याने लंच टेबल वर सगळे चिडवतात म्हणून मॅनेजर कडे जाऊन (शब्दशः डोळ्यातून गंगा यमुना वाहून, टिशू पेपर ला नाक पुसून) रडणाऱ्या एका colleague पासून ते दर दोन दिवसांनी ATM ला जाणाऱ्या आमच्या कंपनीच्या VP पर्यंत आम्ही कोणालाही सोडलं नाही. ती कंपनी सोडली तेव्हा मी फक्त आणि फक्त त्या मित्राला मिस केलं. 

वेगवेळ्या रूपात, आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर असे अनेक बॅकबेंचर मित्र, मैत्रिणी मला भेटले. अगदी अलीकडचीच गोष्ट. कोरोना मुळे सगळं बंद झाल्यावर मी वेळ चांगला जाण्यासाठी एक ऑनलाईन क्लास जॉईन केला. या क्लास मध्ये मला अजून एक असाच मित्र भेटला. सुरुवात नक्की कशी झाली ते सांगता येणार नाही, पण क्लास च्या दरम्यान प्रायव्हेट चाट वर आमची timepass ची मेहफिल रंगतच गेली. शेवटी शेवटी तर क्लास मध्ये काय चाललंय याचा आम्हाला पत्ताच नसायचा, पूर्ण वेळ कंमेंट्स आणि timepass. त्यातून बरेच मजेशीर किस्से देखील झाले. एकदा माझ्याच प्रेसेंटेशन मध्ये त्याने माझ्यावर केलेली कंमेंट चुकून मलाच पाठवली तर एकदा mute वर हसता हसता अचानक ट्रेनर ने मला काहीतरी प्रश्न विचारला आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडण्याऐवजी फक्त हसूच बाहेर पडले.

थोडक्यात काय, तर बॅकबेंचरगिरी हा एक असा धर्म आहे की एकदा तो स्वीकारल्यावर त्यातून ‘घर वापसी’ नाही!

Leave a Reply