Carpe Diem – Sieze the day

Corona मुळे सगळ्या जगावर संकट आलं, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत, अनेक देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पण या रोगाने मला एक गोष्टं नव्याने शिकवली – Carpe Diem (इंग्लिश मध्ये Seize the day) म्हणजे येणारा प्रत्येक दिवस साजरा करा. 

एखादी गोष्टं जेवढी कमी मिळते तेवढी आपल्याला तिची किंमत जास्त. हापूस आंबे जर वर्षातले १२ ही महिने मिळाले असते, तर कदाचित आपल्याला त्याची एवढी नवलाई वाटली नसती. पण मोजक्या २-३ महिन्यांसाठी येणाऱ्या हापूस आंब्यांसाठी आपण वर्षभर नजर लाऊन बसतो आणि ते मिळायला लागले की ते खायला मिळणारा प्रत्येक दिवस साजरा करतो.  

कॅनडा सारख्या देशात, जिथे ६वर्षातले ५-६ महिने चेहरा सोडून बाकी पूर्ण अंगावर कपड्यांचे २-३ थर घालून फिरावं लागतं तिथे मिळणाऱ्या summer चा पण असाच काहीसा प्रकार आहे. एप्रिल / मे महिन्याच्या सुमारास इथे हवामान सुसह्य व्हायला लागतं आणि ऑक्टोबर/नोव्हेंबर पासून परत थंड. अश्या वेळेस उन्हाळ्याच्या आशेकडे नजर लावून मी थंडीचे दिवस काढते. 

६ महिने कपड्यांचे ३-३ layers, पायात वूलन सॉक्स, त्यावर गुडघ्यापर्यंत येणारे वॉर्म बूट्स, लेग वॉर्मर आणि त्याच्या वरून fleece lining असेलेली विंटर पॅण्ट, वर पूर्ण बाह्यांचे, गळा बंद स्वेटर आणि कधी कधी त्या स्वेटर च्या आत अजून एक t -shirt किव्वा थर्मल ची layer. आणि बाहेर पडतांना त्या वरून मोठे जॅकेट. बऱ्याचदा एवढे घालूनही मला ऑफिस मध्ये अजून एक साधं स्वेटर किव्वा ब्लॅंकेट घालून बसावं लागतं. बायकांना पार्टी साठी जातांना तयारी करण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढा वेळ मला विंटर मध्ये रोजची तयारी करायला लागतो, आणि तरी सुद्धा मी वाईटच दिसते कारण डोळ्यांसमोर एकमेव ध्येय असतं, वॉर्म राहण्याचं. 

माझ्यासाठी wardrobe change हा एक event असतो. हिवाळा संपून Spring ची लक्षणं दिसायला लागतात. तापमान सतत ०c पेक्षा जास्त राहायला लागतं, रस्त्याने दोन्ही बाजूला बर्फाचे पांढरे थर जाऊन, ओसाड अश्या ब्राउन रंगात छोटे मोठे हिरव्या रंगाचे patchwork दिसायला लागतात, क्वचित एखाद्या झाडावर नुकत्याच रंग द्यायला घेतलेल्या पैंटिंग सारखे छोटे हिरवे ठिपके दिसायला लागतात आणि अचानक एक दिवस लक्षात येतं की संध्याकाळी ऑफिस मधून निघतांना उजेड होता जो घरी येईपर्यंत टिकून राहिला! मग एखाद्या वीकएंड ला कपाटातले थंडीचे सगळे कपडे काढून, ते धुवून पॅक करून ठेवण्याचा कार्यक्रम होतो आणि थंडीचे ६ महिने hibernation मध्ये असलेले उन्हाळ्याचे कपडे त्यांची जागा घेतात. नाही म्हणायला इथल्या weather चा काही भरवसा नाही, म्हणून थंडीचा एखाद दुसरा सेट  वर सोडून बाकीचे सगळे थंडीचे कपडे डोळ्याआड गुडूप होतात. आता दिवस मोठा होत जाणार, ५ मिनिटात जीन्स, T – shirt आणि पायात सध्या चपला किव्वा सँडल्स घालून मनाला वाटेल तेव्हा बाहेर जात येणार हा विचारच एवढा आल्हाददायक असतो, की ते स्वप्न बघत थंडीचे उरलेले दिवस काढणं सोपं होतं.  

गेल्या वर्षी उन्हाळ्यात घालण्यायोग्य फारसे कपडे नाही म्हणून मी उत्साहाने नवीन कपडे खरेदी केले. पण जेमतेम एकदा ते सगळे घालून होईपर्यंत उन्हाळा संपला. त्यात भर म्हणून मी गेल्या डिसेंबर मध्ये भारतात ठेवलेले माझे छान छान कपडे आणि accessories घेऊन आले. पण या वर्षी वॉर्डरोब change करण्याला एक निराशेची झालर होती. मनात एकच विचार होता, मी हे सगळे कपडे कपाटात काढतेय खरी, पण ते खरंच मला घालायला मिळतील का? Lockdown मुळे घरून काम, कामाव्यतिरिक्त फारसे बाहेर जायचे नाही, कोणा मित्र मंडळींना भेटायचे नाही, उन्हाळ्यात होणारे सगळे celebrations, festivals कॅन्सल म्हटल्यावर मला हातात धरलेल्या वाळूसारखा, उन्हाळा हातातून निसटून जातोय असं वाटायला लागलं. 

असेच काही दिवस उदास राहण्यात गेल्यावर मनात विचार आला की बाहेर जाण्याचा प्रत्येक प्रसंग माझ्यासाठी एक संधी आहे, नवीन कपडे घालण्यासाठी. मग ते संध्याकाळी काम संपवल्यावर पाय मोकळे करायला बाहेर जाणं असेल, नाहीतर grocery घ्यायला जाणं. मी कितीही कपडे घेतले तरी माझ्यासाठी सगळ्यात comfortable म्हणजेच पर्यायाने नेहमी पहिला चॉईस असतो, जीन्स, एखादा साधासा T – shirt आणि पायात सगळ्यात सुखकर सँडल्स नाहीतर स्पोर्ट्स शूज. कदाचित हेच कारण असेल की मागच्या वर्षी माझे summer चे कपडे मला मनसोक्त घालता आले नाहीत. मी कायम निमित्ताची वाट बघायचे, आणि काही निमित्त असेल तरच ते कपडे घालायचे, बाकी वेळेस, कपाट कपड्यांनी भरलं असलं तरी  जीन्स आणि T – shirt. पण आता मात्र मी ते प्रयत्न पूर्वक बदलतेय. अगदी लॉन्ग ड्राईव्ह ला जातांना, जिथे आम्ही एकदाही कार मधून उतरणार नाही हे माहित असतांना सुद्धा मी छानसे कपडे घालूनच बाहेर पडते. 

आता मला कुठल्या निमित्ताची किव्वा कारणांची गरज नाही. प्रत्येक दिवस खास आहे आणि तो साजरा करण्यासाठी माझ्याकडे छानसे कपडे आणि तेवढाच उत्साह आहे. 

Leave a Reply