चमचाभर कॉफी

“सागर?” मी “yes” म्हणत कॉम्पुटर मधून डोकं काढून वर बघितलं. चाळीशीच्या आस पास चा एक माणूस माझ्या डेस्क च्या बाजूला उभा होता. उंच, बारीक अंगचटीचा, जाड मिशा, २-३ वेळा भेटल्यावरही लक्षात राहणार नाही असा सर्वसामान्य चेहरा. सगळ्यात आधी डोळ्यात भरले ते त्याचे मोठे, पाणीदार डोळे. त्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. डोक्यातल्या गुंत्यात मी त्याचा चेहरा शोधायचा प्रयत्न केला, पण काही केल्या चेहरा ओळखीचा वाटेना. “तुम्ही काय मस्त गाता!” मी आणखीच गोंधळात पडलो.

माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून तो पटकन म्हणाला “तुम्ही मला ओळखत नाही. गेल्या वर्षी तुमच्या सोसायटी च्या गेणशोत्सवात तुम्ही गाणं म्हटलं होतं ते मी ऐकलं. माझा मित्र राहतो तुमच्या बिल्डिंग मध्ये, रतलानी. तुम्ही खरंच खूप छान गाता”.  “थँक यू. पण खरं सांगायचं तर मी गणेशोत्सवात अनेक वर्षांनी गायलो.   कॉलेज मध्ये असतांना गायचो. पण त्यानंतर गायलो नव्हतो. विशेष काही जमलं नाही, सहज एक प्रयत्न करून बघितला, म्हटलं बघावं जमतंय का. एके काळी मुली फिदा व्हायच्या माझ्या गाण्यावर.” मी क्षणभर आठवणीत रमलो. भानावर येत म्हटलं “पण कार्यक्रम झाल्यावर माझ्या मुलाने निक्षून सांगितलं की पुन्हा असलं काहीतरी करू नका, मित्र हसतात मला” माझ्या आवाजातला खेद त्याने ओळखला असावा. “छे छे. त्याचं काय ऐकता. मी सांगतो ना. थोडी प्रॅक्टिस आणि ‘मधुबन मे राधिका ‘ सहज म्हणाल”. मनात कुठे तरी बरं वाटलं. “नाव काय तुमचं? बसा” मी बाजूची खुर्ची ऑफर करत म्हटलं.

मोहनचा त्या दिवशी ऑफिस मध्ये पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी आमची मस्त मैत्री जमली. महिन्याभरातच सगळं ऑफिस त्याला ओळखायला लागलं. रोज कॅफेटेरिया मध्ये लंच आणि टी ब्रेकला तो वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये दिसायचा. बघता बघता receptionist, कॅफेटेरिया मधला छोटू, आणि अकाउंटिंग मधल्या चावला पासून CEO च्या assistant प्रिया पर्यंत सगळेच त्याचे मित्र मैत्रिणी बनले.

एक दिवस सकाळी मी क्लायंट मिटींग साठी ब्रेकफास्ट नं करताच ऑफिसला गेलो. मिटींग संपवून कॅफेटेरिया मध्ये गेलो आणि पाठोपाठ मोहन येऊन बसला. आधीच मिटींग मनासारखी गेली नव्हती, क्लायंट नाराज होता, तो नाराज म्हणून बॉस पण नाराज! त्यात कॅफेटेरिया मधले ब्रेकफास्ट चे सगळे पदार्थ संपले होते. शेवटी नाईलाजाने मी सँडविच ची ऑर्डर देऊन आणि “चटणी घालू नका” असं दोन-दोनदा बजावून मोहन समोर येऊन बसलो. मोहन नेहमीप्रमाणे मस्त मुड मध्ये होता, कुठलं तरी गाणं गुणगुणत, टेबल वर त्याने ताल धरला होता. “या शनिवारी काय करतोयस? मैफिल करूयात” अचानक मोहन उद्गारला. “मैफिल?” मी त्रासलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं. “हो, म्हणजे बघ, तू छान गातोस, खालच्या फ्लोअर वरचा निनाद मस्त तबला वाजवतो, आणि या रमण ला गिटार छान वाजवता येते.” पलीकडच्या टेबल वर नुकत्याच येऊन बसलेल्या रमणकडे बोट दाखवत तो म्हणाला. “शनिवारी माझ्या घरी कोणी नाहीये आपल्याला डिस्टर्ब करायला. रात्री उशिरा पर्यंत मैफिल रंगली तरी हरकत नाही.”

मी मोहन कडे बघत राहिलो. मी रमण सोबत गेली दहा वर्ष काम करतोय, पण मला माहितीच नव्हतं की तो गिटार वाजवतो ते. आणि खालच्या मजल्यावरचा निनाद की कोण, तो तर मला माहिती देखील नव्हता. मोहनला येऊन जेमतेम एक वर्ष झालं असेल, पण त्याला सगळे माहित, नुसते माहितीच नाही तर त्यांच्या सगळ्या छंद आणि कला गुणांसकट माहित. तेवढ्यात छोटू माझं सँडविच आणि मोहन ची कॉफी घेऊन आला. मोहन ची कॉफी खास असायची. त्याला दूध पाणी मिक्स एकत्र गरम करून एका कपात आणि कॉफी आणि साखर वेगवेगळ्या वाट्यांमध्ये लागायची. त्याच्या प्रमाणाप्रमाणे तो कॉफी आणि साखर घालून, स्वतःच त्याची कॉफी बनवायचा. “काय रे कसे गेलेत पेपर्स?” त्याने छोटू ला विचारलं. “इंग्रजी चा थोडा कठीण गेला” छोटू कसनुसं हसत म्हणाला. “काही नाही,  होशील पास”. “दहावीच्या परिक्षेला बसला होता हा यंदा” माझ्या प्रश्नार्थक चेहरा बघून त्याने मला सांगितलं.

समोर आणून ठेवलेलं सँडविच उचलत मी म्हटलं, “जगन्मित्र आहेस. कसं काय जमतं तुला?” उत्तरादाखल तो नुसताच हसला आणि खांदे उडवले. घेतलेला पहिलाच घास तोंडातून बाहेर काढत मी काउंटरकडे परत  जाणाऱ्या छोटू वर खेकसलो, “दोनदा सांगितलं होतं चटणी घालू नकोस म्हणून!” छोटू घाबरून पळत आला, “सॉरी सर” म्हणत पटकन प्लेट उचलली. माझ्या भुकेचा आणि रागाचा दोन्ही पारे एकदम चढले. मी छोटू ला उगाचच २-३ अर्वाच्य शिव्या दिल्या आणि अजूनही बरंच काही टाकून बोललो. त्याने मान खाली घालून सगळं ऐकून घेतलं. शेवटी मोहन ने मला शांत करत छोटू ला मानेनेच जायची खुण केली. मी नंतरही बराच वेळ बोलत राहिलो. सकाळी ब्रेकफास्ट ला कसा वेळ मिळाला नाही, क्लायंट मिटिंग, त्यानंतर बॉस ची कटकट. मोहनने सगळं शांतपणे  ऐकून घेतलं.

थोड्या वेळाने माझं नवीन सँडवीच आलं. ते खाऊन होईपर्यंत मोहन ने रमण शी बोलून शनिवार चा सगळा बेत आखला सुद्धा. पोटात अन्न गेल्यामुळे की मैफिल च्या विचाराने कोण जाणे, पण माझा मूड पण आता चांगला झाला. शनिवारच्या खाण्याची व्यवस्था मी माझ्यावर घेतली. मोहन ने “८-१० लोक असले तर आणखी मजा येईल” असं म्हणत, बसल्या बसल्या अजून २-३ मित्रांना शनिवार साठी messages पाठवले.

खाऊन झाल्यावर मी काउंटर ला चहाची ऑर्डर देऊन परत येऊन बसलो.  पाण्याचा एक घोट घेतला आणि सगळं तोंड कडू झालं. तोंडातून पुन्हा एक शिवी बाहेर पडली, ग्लास बघितला तर पाणी गढूळ दिसत होता. पुन्हा एकदा झापण्यासाठी छोटू ला हाक मारणार तेवढ्यात मोहन म्हणाला, “कॉफी आहे ती. मीच घातलीये तुझ्या ग्लास मध्ये” मी पाण्याच्या जार मधलं पाणी घटाघटा प्यायलो तरी तोंडातली कडवट चव जाईना. “हे घे” म्हणत त्याने पाण्याचा दुसरा ग्लास पुढे केला. मी संशयाने एकदा आणि पाण्याकडे त्याच्याकडे बघितलं, पाणी स्वच्छ दिसलं. प्यायल्यावर गोड लागलं. “साखर घातलीये त्याच्यात” तो शांतपणे माझ्याकडे बघत म्हणाला.

“पण का?” मी वैतागून विचारलं.

“तू मला मघाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर!” तो शांतपणे म्हणाला.

“तू मला विचारलंस ना कसं काय जमतं मला.” मोहन म्हणाला.

“आपण सगळे दिवसभरात किती लोकांना भेटतो? निदान २०-३०? आणि भेटल्यावर काय करतो? बऱ्याचदा समोरच्याच्या दिवसात चमचा भर कॉफी घालतो. आणि मग त्याची कडवट चव त्यांच्या तोंडात दिवसभर रेंगाळत राहते. मी त्या कॉफी ऐवजी त्यांच्या ग्लास मध्ये साखर घालतो, म्हणून मी सहज त्यांचा मित्र बनतो. आता या छोटूचंच उदाहरण घे, त्याची काहीही चूक नसतांना तू त्याला रागावलास. त्याने ना तुझी ऑर्डर घेतली होती, ना तुझं सँडविच बनवलं, तो फक्त ते तुला द्यायला आला होता. त्यात त्याची काय चूक? पण या गोष्टीचा विचार नं करता तू त्याला शिव्या दिल्यास, आणि त्याने त्या निमूटपणे ऐकून घेतल्या. गेले १० दिवस तो दहावीचे पेपर देऊन, उरलेल्या दिवसात इथे कॅन्टीन मध्ये काम करत होता आणि रात्री जागून दुसऱ्या दिवसाच्या पेपर चा अभ्यास करत होता. उद्या कामाला सुट्टी मिळाली म्हणून आज काम संपवून पिक्चर बघायला जाणार होता तो, परीक्षा संपल्याच्या आनंदात. पण आता दिवसभर सकाळचा हा प्रसंग त्याच्या मनात घर करून राहील आणि पिक्चरचा आनंद घेऊ देणार नाही. तो उष्टी खरगटी भांडी उचलतो, मालकाची बोलणी खातो आणि वेळप्रसंगी आपलीही. तरी त्यातून शिक्षण घेण्याचा, काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतोय. पण हे असे प्रसंग त्याच्या लढाण्यातलं बळ काढून घेतात.”

मी छोटू चा विचार करून मनातल्या मनात शरमलो. 

“फक्त छोटूच नाही, तर प्रत्येक जण आयुष्यात  कुठली ना कुठली लढाई लढत असतो, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. कधीतरी आपण आपल्या एखाद्या वाक्याने, एखाद्या कृतीने त्यांच्या त्या दिवसाला कडू करून टाकतो, काहीच गरज नसतांना. पण आपल्या त्या वागण्याने त्यांच्या लढाईत आपण भर टाकतोय याची जाणीवच नसते आपल्याला. तुझंच बघ. आज सकाळपासून तू उपाशी पोटी काम करतो आहेस, पण त्याचा विचार नं करता आधी क्लायंट ने आणि मग तुझ्या बॉस ने तुझा सगळं दिवस कडू करून टाकला. पण मैफिली च्या विचाराने त्यात गोडवा आला, आला की नाही?”

मी विचारमग्न झालो.

पुढे तो म्हणाला, “तुला गम्मत सांगू, काही लोकं तर जणू पाठीवर रोज सकाळी कॉफीने भरलेलं पोतंच घेऊन निघतात. त्या पोत्याच्या ओझ्याने स्वतःही दिवसभर वाकलेले असतात आणि भेटणाऱ्या प्रत्येकाचा दिवस कडू करतात. मी फक्त त्यांच्या त्या ग्लास मध्ये चमचाभर साखर घालून तो कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करतो. तू पण कधीतरी कोणाच्या दिवसात चमचाभर साखर घालून बघ. फार काही करायची गरज नाही, त्यांच्याशी हसून बोल, माणूस म्हणून त्यांना समजून घे. आणि यातलं काही जमत नसेल तर नुसतं एक स्माईल दे. समोरच्याने उत्तरादाखल स्माईल नाही दिलं तरी निदान त्यांच्या कपाळावरच्या आठ्या कमी होतील बघ.” नकळत माझ्या चेहऱ्यावर स्माईल पसरलं.

“तू पण कधीतरी प्रयत्न करून बघ. समोरच्यासोबत तुझा पण दिवस गोड होईल.”.

Leave a Reply