लोकमान्य टिळकांना पत्र

ति. स्व. लोकमान्य टिळकांना साष्टांग नमस्कार,

पत्र लिहिण्यास कारण की , गणेशोत्सव सार्वजनिक करण्यासाठी तुमचे आभार मानायचे होते. लहानपणी दर वर्षी तुमच्या पुण्यतिथीच्या भाषणात हे सांगून सुद्धा वर्षानुवर्षे हा सण साजरा करतांना, तो तुम्ही सुरु केलाय हि गोष्ट कुठेतरी विस्मरणात गेली होती. पण घरापासून हजारो मैल दूर राहतांना, एका दिवसासाठी का होईना, ते सगळं पुन्हा एकदा उपभोगायला मिळालं आणि तुमची प्रकर्षाने आठवण आली.

भारतात आता या सणाने काय रूप घेतलंय ते मी नं बोललेलंच बरं. पण लोकांना एकत्र आणून जनजागृती करण्यासाठी सव्वाशे वर्षांपूर्वी तुम्ही सुरु केलेल्या या सणाने आता विश्वरूप घेतलंय. सुमारे ८ देशातील वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यावर मला एका  गोष्टीची खात्री पटली की तुम्ही लावलेल्या त्या एका रोपट्याच्या बिया आता जगभर पसरल्या आहेत. अगदी ऑस्ट्रेलिया पासून ते फ्रान्स मधल्या एका छोट्याश्या गावापर्यंत आणि Middle East मधल्या Bahrain पासून ते अमेरिका आणि कॅनडातल्या सगळ्या शहरांपर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यात हा सण तिथल्या मराठी लोकांना एकत्र आणतोय. कुठे तिथल्या देवळात, कुठे मराठी मंडळात तर कुठे घरगुती गणपतीचं पुढे झालेल्या सार्वजनिक रूपात, तो अखंडपणे साजरा होतोय. कोणी मराठी ऐकायला, बोलायला मिळेल म्हणून जातात तर कोणी मुलांना आपल्या भाषेची, संस्कृतीची ओळख राहावी म्हणून, कोणी या निमित्ताने मित्र मंडळींना भेटायला मिळेल म्हणून जातात तर कोणी नवीन ओळखी होतील म्हणून, कोणी नटायला मिळतं म्हणून जातात, तर कोणी भारतीय वेशात नटून आलेल्यांना बघायला मिळतं म्हणून जातात, एकटे जीव त्यानिमित्ताने चांगलं जेवण मिळेल म्हणून जातात तर कोणी ढोल ताशावर नाचायला मिळेल म्हणून जातात. कोणी त्या निमित्ताने आपली संस्कृती त्या देशातील अभारतीय  लोकांना  दाखवायची संधी म्हणून जातात  तर कोणी फक्त मोदक खाण्यासाठी.

पण खरं सांगू का कोणी काहीही सांगितलं तरी खरं म्हणजे सगळे  घरच्या आठवणीने हळव्या झालेल्या मनावर फुंकर मारण्यासाठी जातात. news मध्ये, social media वर आणि वारंवार घरी होणाऱ्या विडिओ कॉल्स मध्ये जसा गणेशोत्सवाचा माहोल बघायला, ऐकायला मिळायला सुरुवात होते तसं कितीही नाही म्हटलं तरी मनात आठवणींचं काहूर माजतं आणि डोळ्यांच्या कडा ओलावतात. गणपती ची ती मजा, तो नॉस्टॅल्जिया पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी जातात आणि आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवण्याच्या धडपडीसाठी  जातात.

तसं म्हटलं तर गणपती हा देव. पण त्याला देव्हार्यातून जनसामान्यात आणून तुम्ही त्याला सगळ्यांचं लाडकं दैवत बनवून टाकलंत. कडक सोवळ्यातून बाहेर काढून त्याला कधीही नं रागावणारं असं मैत्रीपूर्ण रूप दिलंत.  कदाचित हेच कारण असेल की बाकीच्या देवांसारखी गणपतीची आम्हाला भीती वाटत नाही, तर त्याच्याबद्दल वाटतं ते फक्त अपार प्रेम. उगाच नाही लहान मुलांना बाप्पा त्यांचा जवळचा मित्र वाटतो आणि आपण सगळेच त्याचा बाप्पा असा एकेरी उल्लेख करतो.

थोडक्यात सांगायचं तर हा एक अनुभव मी काय सांगतेय हे समजावण्यासाठी पुरेसा होईल. काही वर्षांपूर्वी एक डॉक्टर अमेरिकेच्या St. Louis या शहरात आला. आल्या दिवसापासून त्याची मराठी कुटुंबांशी ओळख होती, एका मराठी कुटुंबाकडून जेवणाचा डबाही मिळत होता. असं असूनही तिथे येऊन ६-७ महिने झाल्यावर जेव्हा तो तिथल्या मराठी मंडळाच्या गणेशोत्सवाला गेला तेव्हा फक्त रडायचाच बाकी होता. मराठी ऐकून आणि भारतीय वेशातील लोक आपल्या आजूबाजूला बघून काय वाटतं हे कुठल्याही शब्दात सांगणं केवळ अशक्य. कुठलंही पोलिटिकल correctness चं बंधन नं ठेवता आणि cultural references नं समजावता बोलायला मिळणं आणि ते ही मातृभाषेत,  याचं महत्व हे भारताबाहेर राहतांना अश्या सार्वजनिक समारंभात गेल्यावर कळतं.

या सगळ्या लोकांशी बोलतांना मला एक गोष्टं जाणवली, याची तयारी करायला विदेशात राहणारे मराठी लोक रात्रीचा दिवस करून झटतात. दिवसा नोकरी धंदा सांभाळून रात्री उशिरा जागून त्याची तयारी करतात. सोप्पं नसतं विदेशात, जिथे मदतीला फार कोणी नाही तिथे असा मोठ्या प्रमाणावरचा समारंभ साजरा करणं. मग इथे असलेले लोकंच एकमेकांचं कुटुंब बनतात. कोणी decoration ची जबाबदारी घेतं तर कोणी उकडीच्या मोदकांची जबाबदारी ताकदीने पेलतं. उत्साहाने शनिवार रविवारी खपून मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम बसवतात, स्वतःच्या  कला सादर करतात. त्यांच्यासाठी तो कलेच्या देवतेला अर्पण केलेला एक प्रकारचा नैवेद्य असतो. पण बाप्पाचा सण म्हटल्यावर आपोआपच असमीप उत्साह अंगात संचारतो. आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी काम केल्याचं समाधान मिळतं.

मी जेव्हा Melbourne च्या गोखले मावशींशी बोलले तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ५० वर्षांपूर्वी बाप्पाच्या फोटोची पूजा करून सुरु केलेला गणेशोत्सव आज ५०० पेक्षा जास्त लोकांसाठी एक हक्काचा सण झालाय. जेवढ्या हक्काने लोक सणात सामील होतात तेवढ्याच हक्काने कामही वाटून घेतात. सगळे पदार्थ घरी बनवलेलेच असावेत, विकत काहीही आणायचं नाही असा शिरस्ताच आहे त्यांचा. पण येणाऱ्यांची संख्या जशी वाढत गेली तशी मदत करणाऱ्यांची पण. लोक घरून वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात, बायका उत्साहाने मोदक करू लागतात.  मावशींच्या शब्दात सांगायचं तर “मुद्दाम काही केलं नाही, बाप्पाच्या कृपेने सगळं होत गेलं. कधी कोणाला सांगितलं नाही, हे कर, ते कर.” दुसऱ्या पिढीने पण हे सगळं आनंदाने सुरु ठेवलं, आणि आता तिसरी पिढीही तेवढ्याच उत्साहाने जबाबदाऱ्या घेऊ लागली आहे. या सगळ्यातून भेटलेले लोकच आता नातेवाईकांपेक्षा जवळचे वाटायला लागले आहेत, आणि मैत्रिणी बहिणींसारख्या.

गणेशोत्सवाचे जगभरातली वेगवेगळी रूपं शोधतांना, मला भेटला टोरोंटो मधला Dean. धर्माने ख्रिश्चन, भाषेने अमराठी. पण पुण्यात लहानाचा मोठा झाल्याने लहानपणापासून गणेशोत्सव त्याच्या आयुष्यातला  एक अविभाज्य भाग! २ वर्षांपूर्वी पुण्याहून टोरोंटो ला आलेल्या Dean ने पहिल्या वर्षापासूनच नवीन घरी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. त्याच्या मते बाप्पाच्या सणात मोठा भाग आहे – संस्कृती, आनंद, खाण्याचे निरनिराळे पदार्थ, चैतन्य, आप्तस्वकीयांसोबत आनंदात घालवलेला वेळ, मजा मस्ती असं बरंच काही, जे धर्मापलीकडचं आहे. थोडक्यात सांगायचं तर हा सण सकारात्मकता साजरा करतो. बाप्पा त्याच्यासाठी एवढा जवळचा होता, की कॅनडासाठी बॅग भरतांना त्याने सगळ्यात आधी दगडूशेठ गणपतीची एक छोटी मूर्ती ठेवली. त्याच्या  घराच्या गणपतीला वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या देशातून आलेले भारतीय आणि अभारतीय तेवढ्याच उत्साहाने सामील होतात. जणू काही टोरोंटो च्या  संस्कृतीचं एक प्रतीकच. डीन च्या शब्दात सांगायचं तर गणेशोत्सव साजरा करतांना घरी भेट दिल्याचं समाधान मिळतं.

जाता जाता गोखले मावशींनी मला एक खूप महत्वाचा संदेश दिला. बाप्पाचं विसर्जन आपल्याला लेट गो करायला शिकवतं. गोष्टी धरून नं ठेवता, त्यांना बांधून नं ठेवता जाऊ देणे आणि पुढच्या वर्षी नव्या दमाने निर्मिती करणे हाच तर या सणाची शिकवणूक आहे.

सुबोध भावे म्हणतात तसं तुमचं पुण्यस्मरण करणारी आमची पिढी शेवटची असेलही कदाचित. पण तुमच्या कार्यरूपाने, येणाऱ्या अनेक पिढ्या तुम्ही आमच्यात असाल. आणि शब्दांत मांडू शकलो नाही तरी आम्ही सगळेच यासाठी तुमचे कायम ऋणी राहू.

कळावे. लोभ असावा.

आपली विनम्र,

गायत्री 

Leave a Reply