Tanvi Abhivachan

“आई मला ना भरतनाट्यम शिकायचं” आयुषी माझ्या गळ्यात हात टाकत म्हणाली. कुठलीही गोष्ट तिच्या मनाप्रमाणे मनवून घेण्याची आयुषीची ही नेहमीची स्टाईल. “भरतनाट्यम!” मी चकित होत विचारलं. “हो, माझी बेस्ट फ्रेंड आहे ना तन्वी, ती शिकते, आणि खूप छान डान्स करते, मला पण शिकायचं”. तिच्याकडून तन्वीचं नाव मी हल्लीच ऐकायला लागले होते. “माझी फ्रेंड” ते “माझी बेस्ट फ्रेंड” चा प्रवास फारच पटकन झाला होता. मी “बरं” म्हणूनही आयुषीचा भरतनाट्यमचा घोका चालूच होता, म्हणून मी रविवारी जाऊन तिचं क्लास ला नाव घातलं. स्वारी खुशीत होती.

मग एक दिवस तिने कुठल्यातरी पुस्तकासाठी हट्ट धरला, आता मात्र माझ्याएवढाच तिचा बाबाही सरप्राईझ झाला. वाचनाची आवड तर दूरच, उलट आयुषीला वाचनाचा प्रचंड कंटाळा होता. जबरदस्तीने बसवलं तर गाडी जेमतेम एका पानापर्यंत जाई, पण त्यानंतर तिला स्वस्थ बसवायचं नाही. यावरून बऱ्याचदा माझे आणि सलीलचे वादही झाले होते. त्याच्या मते मी तिला फार वेळ मोबाईल वर गेम खेळू देते, म्हणून तिचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. मी तरी काय करणार, आयुषी ऐकायचीच नाही. मला ऑफिस, घर आणि मुलं सगळं सांभाळून जेवढं जमायचं तेवढं मी करत होते. “तुझ्या रूम मध्ये एवढे बुक्स ठेवले आहेत, ते वाच आधी, त्याशिवाय एकही नवीन बुक मिळणार नाही” मी वैतागत म्हटलं. “ते वाचले तर घेऊन देशील?” आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. सलीलच्या चेहऱ्यावर एक स्मित लकेर उमटल्याशिवाय राहिली नाही. मग बाबाचा आणि लेकीचा करार झाला. आणि खरंच पुढच्या महिन्याभरात तिने तिच्या कपाटातली सगळी पुस्तकं नुसती वाचलीच नाहीत तर आम्हाला एक एक करत त्यांतली स्टोरी पण सांगितली. सलील जामच खुश झाला. तिच्या फर्माइशीसोबत अजून ढीगभर पुस्तकं त्याने आणली. दोघांनी मिळून ती वाचून पण काढलीत. मग कळलं की तन्वी खुप पुस्तकं वाचते आणि त्यातल्या गोष्टी सगळ्यांना सांगते. तिनेच ते पुस्तक छान आहे असं सांगितलं म्हणून त्याच्यासाठी एवढा हट्ट चालला होता.

हळू हळू तन्वी खेळायला घरी यायला लागली. हसरी, अविरत बडबड करणारी. सगळ्या गोष्टी मनापासून करणारी, एकदम हॅपी गो लकी. नाचाची आवड, वाचनाची आवड. नवीन काही काही शिकून यायची, आयुषीला पण शिकवायची. “कोणी शिकवलं गं?” विचारलं की “माझ्या आईने” हे उत्तर ठरलेलं. मनापासून हसायची. बघता क्षणी मला ती आवडली. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाईट ही वाटलं, आपली मुलगी अशी का नाही म्हणून. अशी मुलं मिळायला आई वडील काय पुण्य करतात देव जाणे! त्यांच्या वर्गात कदाचित ती आणि आयुषी दोघीच जणी होत्या ज्या “आई बाबा” म्हणायच्या, बाकी सगळे “मॉम डॅड” वाले. अधून मधून आयुषीही तन्वीकडे खेळायला जाऊ लागली.

आयुषी साठी मैत्रीण म्हणून मला ती खूप आवडली. तिच्यामुळे आयुषीला चार चांगल्या सवयी लागत असतील तर चांगलंच. एकदा तिने कधी खाल्ला नसलेला खाऊ मी तिला दिला. तिने चमच्याने आधी एक घास हातावर काढून खाऊन बघितला. आणि मग बाकीचा परत देत म्हणली “मला नाही आवडला, पण मी तो उष्टा नाही केलाय” मला कौतुक वाटलं. मी आयुषीला सांगितलं, “बघ, शिक जरा तिच्याकडून” तर तन्वी म्हणाली “माझा बाबा सांगतो की एकदा खाऊ उष्टा केला की तो टाकायचा नाही”.

मला तिच्या आई वडिलांना भेटायची आता उत्सुकता लागली होती. पॅरेंट्स च्या व्हॉट्सअँप ग्रुप वर तिच्या बाबाचा नंबर होता. ओळख नसल्याने एकदम त्यांच्याशी चॅट करणं मला योग्य वाटेना. तन्वी कडून कळलं होतं की तिची आई मोबाईल वापरत नाही. म्हणून पॅरेंट्स टीचर मीटिंगला मी खास शोधायला गेले. मीटिंग ला पण तन्वीचा बाबाच आलेला. मोठ्या कंपनी मध्ये सिनियर पोसिशन ला, पण मुलीच्या मीटिंग साठी खास सुट्टी काढून आलेला. “असे नवरे मिळायलाही काय पुण्य करावं लागतं, देव जाणे!”. सलील घरी मला आयुषीच्या पॅरेंटिंग बद्दल १० गोष्टी सुनावत असला तरी, स्वतः कधीही पॅरेंट्स टीचर मीटिंगला आला नव्हता. तन्वीच्या बाबाजवळ मी तिचं तोंड भरून कौतुक केलं. सोबत त्यांच्या पॅरेन्टींगचं पण कौतुक केलं. तन्वी बाबाचा हात धरून तिथेच उभी होती. तिची आणि आयुषीची काहीतरी बडबड चालली होती. “तन्वीच्या आई कडे मोबाईल नाही का? मला आवडेल बोलायला त्यांच्याशी.” “आई ला लॅण्डलाइनच आवडतो” बाबाच्या आधी तन्वीच म्हणाली. तिचा बाबा फक्त हसला. कधी तरी सहपरिवार घरी यायचं आमंत्रण देऊन मी तिथून निघाले.

आयुषीच्या वाढदिवसाला त्यांना बोलावण्याची संधी मिळाली. तसं आम्ही फक्त तिच्या मित्रमैत्रिणींना बोलावायचो. पण या वर्षी सुट्टीचा दिवस येत असल्याने ठरवलं, की काही ठराविक मोठ्यांनाही बोलवावं. मी तन्वीच्या बाबाला फोन करून आमंत्रण दिलं. “आई बाबा दोघांनाही नक्की घेऊन ये” म्हणून तन्वीला आठवण करून दिली. वाढदिवसाच्या दिवशी मी उत्सुकतेने त्यांची वाट बघत होते.

केक कापायच्या थोडं आधी एक सत्तरीच्या आस पासच्या आजी एक डबा घेऊन माझ्याजवळ आल्या, “तुम्हीच आयुषीची आई ना? मी आयुषीसाठी तिच्या आवडीच्या वड्या करून आणल्या आहेत, तन्वी सोबत खेळायला येते तेव्हा नेहमी मागते”. मी अंदाज बांधला की या तन्वीच्या आजी बहुतेक. “सहकुटुंब या” हे वाक्य फारच मनावर घेतलं असा विचार मनात येऊन मी गालातल्या गालात हसले. “असू दे, एक माणूस जास्त आलं म्हणून काही फरक पडत नाही” माझ्या अंतर्मनाने मला लगेच दटावलं. “आई चल ना, मी केक कापल्याशिवाय मला कोणी गिफ्ट्स नाही देणार” आयुषी माझा हात ओढत म्हणाली. तन्वीच्या आजी समजुतीचं हसल्या आणि म्हणाल्या “आपण बोलू नंतर, तुम्ही गडबडीत आहात”. नंतर गर्दीत मला तन्वीचा बाबा दिसला पण माझी नजर तिच्या आईला शोधत होती. थोड्या वेळाने मुलं खाण्यापिण्यात रमल्यावर मी आयुषीला एक बाजूला घेत विचारलं “काय गं, तन्वीची आई नाही आली?” “ती काय!” आयुषी तन्वीच्या आजीकडे बोट दाखवत म्हणाली. “अगं ती आजी आहे ना तन्वीची?” “ती ना आजीलाच आई म्हणते बहुतेक, कारण तिचा बाबा पण तिला आईच म्हणतो”, असं म्हणून आयुषी पुन्हा मित्रमंडळींमध्ये खेळायला निघून गेली.

तिच्या बाबाशी बोलायला गेले तेव्हा कळलं तन्वीची आई तिच्या लहानपणीच गेली. “खूप लहान होती तन्वी, तिला कदाचित आई आठवतही नसेल. मी आई म्हणायचो मग ती पण आजीला आईच म्हणू लागली. आम्हीही तिला थांबवलं नाही. आजीपेक्षा आई जास्त जवळची वाटते.” तिचा बाबा म्हणाला. “पण तिच्यासमोर काही बोलू नका, तिला या सगळ्याची काही कल्पना नाही. लहान आहे अजून हे सगळं समजायला. आम्ही तिच्यासमोर हे काही बोलत नाही.” मला काय बोलावं सुचेना. कुठल्याही आई बाबांपेक्षा चांगले संस्कार आजी आणि बाबा मिळून करत होते. वयाच्या सत्तरीत पण तिची आजी तिला सतत नवीन नवीन गोष्टी शिकवत असायची, कुठल्या कुठल्या क्लासना रिक्षेने सोडायला आणि घ्यायला जायची. मला खूप कौतुकही वाटलं आणि गळाही भरून आला. एवढ्या दिवसांत मला कधीच तन्वीमध्ये आईच्या कमतरतेची खिन्नता, दुःख कणभरही दिसलं नव्हतं. दिसायची ती फक्त स्वच्छंद बागडणारी आनंदी मुलगी.

मुलांचं खाणं आटपून मी तन्वीच्या ‘आई’ जवळ जाऊन बसले. मनभरून त्यांच्याशी बोलले. तन्वीच्या सगळ्या गुणांचं कौतुकही केलं. त्यांच्या नजरेतला आनंद आणि समाधान ओसंडून वाहात होतं. आईची कमी भरून काढण्यात त्या कुठेही कमी पडल्या नव्हत्या. त्यांच्या सगळ्या आवडी निवडी त्या तन्वीला देण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांची वाचनाची आवड, हाताने वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची आवड. “मुळात तिलाच एवढ्या गोष्टींची आवड आहे, की मला वेगळं काही करावंच लागत नाही. मी फक्त तिला प्रोत्साहन देते” त्या कौतुकाने तन्वी कडे बघत म्हणाल्या.

आज अनेक वर्षं झालीत या गोष्टीला. आजही तन्वी आणि आयुषी जिवलग मैत्रिणी आहेत, आणि तन्वी तशीच आहे, हसरी, आनंदी, हॅपी गो लकी!

Leave a Reply