The Green Bull (द ग्रीन बुल)

मधुरा उठून खाली आली तेव्हा सकाळचे ९ वाजून गेले होते. सौरभ कधीच ऑफिसला गेला होता. ती चहाचा कप घेऊन डायनिंग टेबल वर बसली. काचेच्या दरवाजातून दिसणाऱ्या मलूल गार्डनकडे बघून तिने दीर्घ सुस्कारा सोडला. आर्यन आणि रिया युनिव्हर्सिटी ला जाऊन एक महिना झाला तरी अजूनही तिला मुलं घरात नसण्याची सवय होत नव्हती. सौरभ ऑफिस ला गेला की दिवसभर तिला सगळं घर खायला उठायचं. रोज सकाळी मुलांची धावपळ, त्यांना त्यांच्या शाळेत, वेगवेगळ्या क्लासना नेणे आणि आणणे, दोन वेळचा स्वयंपाक आणि वीकएंड चे त्यांचे शेड्युल्स यात तिचा दिवस कुठे जायचा तिला कळायचेच नाही. ‘दिवसभरात एक कप भर चहा सुद्धा शांतपणे बसून पिता येत नाही’ अशी नेहमी तक्रार असायची तिची.

पण आता एकदम सगळा दिवस मोकळा मिळाल्यावर तो कप भर चहा पण गोड वाटत नव्हता तिला. आर्यन आणि रिया ही जुळी मुलं झालीत तेव्हा मधुरा गमतीने म्हणायची, चला एका वेळच्या वेदनेत दोन्ही मिळाले, एक मुलगा आणि एक मुलगी, पुन्हा त्या सगळ्यातून जाणं नको. लग्न झालं तेव्हा सौरभकडून तिने ऐकलं होतं, US मध्ये डिलिव्हरी करणं किती खटाटोपाचं असतं ते. कामाला बाई नसते, सगळं घरातल्या लोकांनाच मॅनेज करावं लागतं. पण त्यावेळेस खुश होतांना तिच्या मनात कधी हा विचारच आला नाही, की शिकायला बाहेर पडतील तेव्हा दोघं मुलं एकदमच बाहेर पडतील.

लग्नाच्या वेळेसच सौरभने सांगितलं होतं की त्याला भारतात परत यायची इच्छा नाही.मुलं दीड वर्षाचे असतांना त्यांनी हे घर विकत घेतलं. सौरभला खरं तर साधंसं घर घ्यायचं होतं, पण तिच्या हट्टापायी हे गार्डन असलेलं मोठं घर त्याने घेतलं. “गार्डन ची देखभाल कोण करेल? मला जमणार नाही आणि आवडही नाही” त्याने निक्षून सांगितलं होतं. त्यावेळेस तिने मोठ्या तोंडाने त्याची जबाबदारी घेतली खरी, पण विशेष कधी काही करायला जमलंच नाही. आधी मुलं लहान म्हणून, मग मुलांना दिवसातून १० वेळा पिक-अप, ड्रॉप करून थकते म्हणून. २-३ वर्षं तिने कॉन्ट्रॅक्ट देऊन गार्डन बनवून घेतलं पण खूप महाग पडतं म्हणून तेही बंद केलं. नाही म्हणायला दर वर्षी mowing करायला ती २ आठवड्यातून एका मुलाला बोलवायची. आता दिवसभर मोकळा वेळ असून सुद्धा तिची गार्डन मध्ये काम करायची इच्छाच होत नव्हती. खरं सांगायचं तर तिची काहीच करायची इच्छा होत नव्हती. सुरुवातीला थकवा बाहेर पडत असेल, थोडे दिवस तिला आराम मिळावा म्हणून सौरभने ऑफिस मध्येच जेवण घ्यायला सुरुवात केली. “अनेक वर्षं उशिरापर्यंत झोपायला मिळालं नाहीये तुला, छान झोप काही दिवस” म्हणत त्याने तिचे सकाळचे उरले सुरले कामही कमी करून टाकले होते. रात्रीच्या जेवणातच ती थोडं जास्त बनवून दुसऱ्या दिवशी सकाळी तेच खात होती.

मुलं पण केवढे हट्टी. खरं तर रियाला १ तासावरच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली होती, तिला वरचेवर भेटता आलं असतं, पण तिला ऑस्टिनलाच जायचं होतं आणि आर्यन MIT ला. इन मिन चार माणसांचा परिवार तिचा पण तीन टोकांना.

पण आज वेळ जाण्याचा प्रश्न नव्हता. निधीकडे आज सत्यनारायण होता, म्हणून तिने सगळ्या मैत्रिणींना जेवायलाच बोलावलं होतं. निधीच्या घरी पोहोचल्यावर आत शिरण्यापूर्वी मधुराच्या नजरेत भरली नवीकोरी, चकचकीत लाल Audi A8L, अगदी तिला हवी होती तशी, लेदर सीट्स सह. तिचा जीव खाली वर झाला. गेले ४ महिने ती सौरभ च्या मागे लागली होती या कार साठी. तिची आत जाण्याची इच्छाच मेली. जड पावलाने ती आत गेली. सगळ्या आधीच जमल्या होत्या. नवीन कारच्या तोंड भरून चाललेल्या कौतुकात निधी न्हाऊन निघाली होती. आत गेल्यावर कळलं, निधीचा नवरा रवी गेल्या महिन्यात डायरेक्टर झाला म्हणून त्या आनंदाप्रीत्यर्थ ही कार घेतली.

नेहमीप्रमाणे खाण्याची रेलचेल होती. पण मधुराचं कशातच मन नव्हतं. एक दोघींनी विचारलं सुद्धा, पण मुलं गेल्यापासून करमत नाही म्हटल्यावर कोणी फार खोलात शिरलं नाही. नवरा नसला तरी निदान मुलं तरी अँबीशियस निघालेत, एवढंच काय ते सुख तिला होतं. दोघांनीही टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन मिळवली म्हणून केवढा अभिमान वाटला होता तिला, त्यांचा आणि स्वतःचाही. त्यांच्या अभ्यासाकडे आणि इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये बारीक लक्ष घातलं होतं तिने. मुलांनी कष्टाचे चीज केले. नवरा मात्र आहे त्याच्यावर समाधान मानायचा, याचा तिला फार राग होता. त्याने मनात आणलं असतं तर कधीच त्याच्या कंपनीत डायरेक्टर झाला असता. खरं म्हणजे रवी त्याला ३ वर्षं जुनिअर, US मध्ये सुद्धा तो सौरभ नंतर ५ वर्षांनी आला होता, सौरभनेच तर मदत केली होती त्याला सुरुवातीच्या दिवसात, आणि आता तो सौरभच्या पुढे निघून गेला. मधुरा मनातल्या मनात चरफडतच घरी आली.

नेमीप्रमाणे सौरभ ऑफिस मधून येऊन त्याच्या स्टडी मध्ये काहीतरी करत होता. रात्री जेवणाच्या टेबल वर दोघं गप्पच होते. मुलं असतांना त्यांचा अभ्यास, दिवसभराच्या गमती जमती असं बरंच काही बोलण्यासारखं असायचं. पुर्ण वेळ आर्यन आणि रिया जेवणाच्या टेबल वर अखंड बडबडत असायचे. मुलं गेल्यापासून त्यांच्यातला संवादच खुंटला होता. बोलायला काही विषयच उरले नव्हते. मधुराने रवीचा जॉब, त्यांची नवीन कार या बद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण सौरभकडून ‘हम्म’ या पलीकडे काहीच उत्तर आले नाही. शेवटी तिनेही नाद सोडला. सौरभने पुढच्या तिच्या नेहमीच्या कटकटीतून सुटका मिळाली म्हणून सुटकेचा निश्वास सोडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती उठेपर्यंत सौरभ ऑफिस ला गेला होता. मधुरा चहा घेऊन बसली आणि तिचा फोन वाजला. “काय करतेयेस? लोणचं बनवलंस? मी येऊ थोड्या वेळाने?” सुचित्राने तिच्या नेहमीच्या  स्टाईल मध्ये तिला बोलायची संधी नं देता प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मधुरा पूर्णपणे विसरली होती. सुचित्राला तिच्या हातचं गाजराचं लोणचं फार प्रिय. दर ४-५ महिन्यांनी ती मधुराकडून बरणीभरून लोणचं बनवून घेऊन जायची. मधुरा झटपट चहा संपवून लोणच्याच्या तयारीला लागली. दोन तासात सुचित्रा आलीच. आल्या आल्याच तिने मधुराचा नूर ओळखला. मग आदल्या दिवसाच्या सत्यनारायण पूजेचं आणि त्या निमित्ताने नवीन कार, रवीची नवीन पोझिशन, सौरभला काही अँबिशन कशी नाही याचं साद्यसंग्रीतवर्णन झालं.

“तुला ना empty nest syndrome झालाय” लोणच्याची चव बघत सुचित्रा म्हणाली. “काही तरी सुरु कर, स्वतःला बिझी ठेवायला. देवाने बुद्धी दिलीये, आई वडिलांनी एवढं शिक्षण दिलंय त्याचा काहीतरी सदुपयोग कर”. मधुरा आणखीच उदास झाली. “काहीतरी कर” असं तिला गेल्या काही दिवसात बऱ्याच जणांनी सुचवलं होतं, कोणी आडून आडून तर कोणी डायरेक्ट. पण ती काय करणार? तिने कधीच नोकरी केली नव्हती. पोस्ट ग्रॅजुएशन झालं आणि लग्न करून US ला आली. सगळं आयुष्यं नवरा आणि मुलांभोवतीच गेलं. “आता काय करणार?” या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पैश्यांची गरज नव्हती, पण रिकामा वेळ तिला खायला उठत होता. मुलांना वीकएंड शिवाय तिच्याशी बोलायला वेळ नसायचा आणि सौरभ घरात असला तरी घुम्यासारखा असायचा.

सुचित्रा इरेला पेटली. कागद पेन घेऊन बसली. मधुराचं शिक्षण, छंद, आवडी निवडी सगळं लिहून काढलं. पण तिलाही काही सुचेना. “तू इकॉनॉमिक्स मध्ये पोस्ट ग्रॅड केलंस ना? मग त्यातच काही का करत नाहीस? मी बघू का माझ्या freelancing website वर इकॉनॉमिक्स साठी काही मिळतं का ते?” फिरून ती शिक्षणावरच आली. मधुराने बराच वेळ विचार केला, पण तिला डिग्री घेऊन आता २० वर्षं होतील. त्यातून तिला एवढे वर्षं US मध्ये राहून सुद्धा, इंग्लिश बोलण्याचा आणि लिहिण्याचा कॉन्फिडन्स नव्हता.

शेवटी हो नाही म्हणता त्यांना एक उपाय सुचला. मधुराने आत्ताच्या इकॉनॉमिक सिचुएशन चा अभ्यास करून, तिला आवडेल त्या विषयावर काहीतरी लिहायचं आणि सुचित्राने ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं. दोघींनी मिळून या विषयावर ब्लॉग सुरु करायचं ठरवलं. मधुराला अनेक प्रश्न होते, “मला जमलं नाही तर? कोणाला ते वाचण्यात इंटरेस्ट असेल का? सौरभ हो म्हणेल का? ओळखीचे लोक ते वाचून हसतील का? मैत्रिणी बालिश म्हणतील का?” एक ना अनेक. मग असं ठरलं की दोघींनीही खरं नाव टाकायचं नाही, तर ‘The Green Bull’ नावाने ब्लॉग बनवायचा. आणि सध्या कोणालाच सांगायचं नाही, अगदी आपापल्या नवऱ्यांना आणि मुलांनाही नाही. हसं व्हायचंच असेल तर ते दोघीतच राहू देत.

“गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर लोणचं करून खाल्ली” सुचित्रा डोळे मिचकावत म्हणाली. 

पुढचे काही दिवस मधुरा चांगलीच बिझी झाली. सौरभ ऑफिस ला गेला की ती वेगवेगळ्या न्यूजपेपर्सच्या वेबसाईट वाचायला लागली. धूळ जमली असली तरी तिचं ज्ञान अजून तसंच होतं. मना पासून आवडायचं तिला इकॉनॉमिक्स. ग्रॅजुएशन आणि पोस्ट ग्रॅजुएशन ला फर्स्ट क्लास होता तिला. तिच्या सरांनी तिला इंटर्नशिप पण देऊ केली होती. पण त्याच दरम्यान सौरभचं स्थळ सांगून आलं आणि “झट मंगनी पट ब्याह” म्हणतात तसं , आई बाबांशी इंटर्नशिपचं बोलण्याआधीच ती लग्न होऊन US ला येऊन पोहोचली होती. 

हळूहळू तिला विषय सुचायला लागले, नवीन नवीन ट्रेंड जाणवून यायला लागले. सुचित्रा पार्ट-टाइम इंग्लिश रायटिंग चे फ्रीलान्सिंग काम घेत असल्याने, तिला सवय होती इंग्लिश मध्ये लिहिण्याची. बघता बघता ८ महिने निघून गेलेत. दोघींच्या सोयीने त्या दर आठवड्याला एक आर्टिकल पब्लिश करत. ब्लॉग वर दर महिन्याला येणाऱ्यांची संख्या आता हजारांच्या घरात गेली होती.

त्यातच मधुराला कळलं की लवकरच इकॉनॉमिक्सची एक मोठी कॉन्फरन्स शिकागोला होणार आहे. मधुराच्या मनाने घेतलं की ती अटेंड करायची. त्यांना ब्लॉगर म्हणून खास डिस्काउंट मध्ये तिकीट मिळत होतं. पण सौरभ समोर विषय काढल्यावर “तुला काय करायचंय कॉन्फरन्स अटेंड करून?” म्हणत त्याने तिला पुढे काही बोलू नं देता विषय उडवून लावला.

“आपण असं केलं तर?” सुचित्रा विचार करत म्हणाली. “तू सौरभला कॉन्फरन्स ची तारीख आणि शहर सांगितलं नाहीस ना?” मधुराने नकारार्थी मान हलवली. “सौरभला सांग, तुला मैत्रिणींसोबत ट्रिप ला जायचंय. मग तो पैसे पण देईल आणि पुढे काही प्रश्नही नाही विचारणार.” “पण कोण मैत्रिणी विचारलं तर?” मधुराने शंका काढली. “माझं नाव सांग, आणि माझ्या अजून काही मैत्रिणी आहेत म्हणून सांग”. सुचित्राचा अंदाज खरा ठरला. सौरभने सुरुवातीला जरा कुरकुर केली, पण मग मुलांशिवाय करमत नाही, ४-५ दिवस जरा चेंज मिळेल म्हटल्यावर लगेच तयार झाला. पैसे द्यायला फार काही कुरकुर केली नाही, उलट हॉटेल शोधायला मदत केली. सुचित्राला तिच्या नवऱ्याला पटवायला फारसं जड गेलं नाही. ती अधून मधून नवरा आणि मुलांना सोडून २-३ दिवसांसाठी जायची, त्यामुळे नवऱ्याला आणि मुलांना त्याची सवय होती.

मधुरा, सौरभ आणि मुलांशिवाय कधीच कुठे गेली नव्हती. पहिल्यांदाच ती आणि सुचेता अश्या दोघीच जणी एवढे  दिवस कुठेतरी जाणार होत्या, आणि ते ही सौरभशी खोटं बोलून. नाही म्हटलं तरी तिला दडपण येत होतं, मनातल्या मनात अपराधी वाटत होतं. दोन तीन वेळा तिला वाटलं की सरळ सौरभला सगळं सांगून टाकावं. पण तो ट्रिप कॅन्सल करायला लावेल या भीतीने ती गप्प राहिली. निघण्याच्या आदल्या रात्री तर तिला रात्रभर झोप लागली नाही. “काही गडबड झाली तर? कोणी ओळखीचं भेटलं तर? सौरभला खरं कळलं तर? मुलांना कळलं तर ते काय म्हणतील?” डोकं प्रश्नांनी भंडावून गेलं होतं. सौरभने एअरपोर्टला सोडायला येऊ नये म्हणून, सुचित्राने टॅक्सी बोलावली आणि मधुराला रस्त्यात पिक-अप केलं. ती खुश होती. तिला फिरायला आवडायचं आणि तिच्या शब्दांत “नवरा आणि मुलं सोबत नसले की तर सोने पे सुहागा!”

फ्लाईट शिकागोला लँड करेपर्यंत मधुराचं दडपण जरा कमी झालं. हॉटेल ला पोहोचल्यावर तर तिची कळी चांगलीच खुलली. कोणाची काळजी करायची नाही की कुठल्या गोष्टीची चिंता करायची नाही. रात्री दोघीजणी मस्तपैकी जेवायला बाहेर गेल्या. जेवण झाल्यावर लांबवर चक्कर मारून आल्या. हॉटेलला परत आल्यावर पण उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्या. रात्री उशिरा कॉफी बनवून प्यायल्या. कोणाचं बंधन नाही, उशीर झाला तर कोणाला उत्तर द्यायचं नाही की घरातलं कुठलं काम ‘आ’ वासून वाट बघत नाही. तिला एकदम हलकं हलकं वाटत होतं. किती दिवसांनी ती मनमोकळं हसली. रोज संध्याकाळी कॉन्फरन्स संपल्यावर त्या बाहेर जेवायच्या, मस्तपैकी आईसक्रीम खायच्या.

बघता बघता कॉन्फरन्स चे ३ दिवस संपले. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या. इंग्लिश बोलतांना अजूनही भीती वाटत असली तरी आता मधुरा चुकत चुकत का होईना इंग्लिश बोलायला लागली होती. ब्लॉगर म्हणून तिला खास मुभा होती, काही एक्स्पर्ट स्पीकर्सशी बोलण्याची. तिने एकही संधी वाया जाऊ दिली नाही. सुचित्रा मात्र कंटाळली. तिला या विषयातलं काहीच कळत नसल्याने बराचसा वेळ ती खाण्यापिण्यात किव्वा आजूबाजूला भटकण्यात घालवत होती. मधुराला पुर्ण कल्पना होती की सुचित्रा फक्त तिला सोबत म्हणून आली होती. कॉन्फरन्स संपल्यावर एक दिवस दोघी मनसोक्त भटकल्या.

परत आल्यावर मधुरा फ्रेश मनाने नवीन आर्टिकल्स लिहिण्याच्या मागे लागली. कॉन्फरन्स मध्ये तिला बरंच नवीन मटेरियल मिळालं होतं. त्यातून गेल्या काही दिवसात तिने तिच्या आधीच्या आर्टिकल्स मध्ये पब्लिश केलेले काही इकॉनॉमीचे प्रेडीक्शन्स खरे झाले होते, त्यामुळे तिला नवीन हुरूप आला होता. लवकरच मुलं सुट्टीसाठी काही दिवस घरी येणार म्हणून ती पण गडबड सुरु होती. सौरभ सध्या कामात बुडून गेला होता. कोणीतरी नवीन क्लायंट मिळणार म्हणून त्याचं काम खूप वाढलं होतं. मधुरा मात्र स्वतःवरच खुश होती. आज तिने खुप इंटरेस्टिंग आर्टिकल पब्लिश केलं होतं.

रात्री जेवतांना सहज सौरभच्या तोंडातून  क्लायंटचं नाव निघालं आणि मधुराला ठसकाच लागला.रात्रभर तिला झोप लागेना. काय करावं काही कळेना. तिने त्याच दिवशी पब्लिश केलेल्या आर्टिकल मध्ये सौरभ ज्या नवीन क्लायंट बद्दल बोलत होता, त्यांच्याबद्दल प्रेडिक्ट केलं होतं की फक्त ती कंपनीच नाही तर ती सगळी इंडस्ट्री लवकरच गोत्यात येणार. या क्लायंट वर सौरभचं पुढचं प्रोमोशन डिपेंड होतं. त्याला सांगितलं नाही तर क्लायंट सोबत त्याची कंपनी पण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकत होती. पण सांगावं कसं? तिला काहीच कळेना.

शेवटी हिम्मत करून तिने दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या टेबलवर सौरभ जवळ विषय काढला, “मला वाटतं या कंपनीचं अकाउंट तू घेऊ नयेस”. सौरभ चमकला. इतक्या वर्षांत मधुराने त्याच्या कामात कुठलाही रस घेतला नव्हता आणि आज ती त्याला त्याचा  आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा क्लायंट सोडून द्यायला सांगत होती, तेही कुठल्याही रास्त कारणाशिवाय. “बारीक सारीक गोष्टींत लक्ष घालायला मुलं नाहीत म्हणून आता माझ्या कामात अति लक्ष घालायला सुरुवात केली वाटतं” असं स्वतःशी म्हणत त्याने मधुराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मधुराने दोन तीनदा सांगून सुद्धा सौरभने फारसं मनावर घेतलं नाही.

पण दोनच दिवसांनी सौरभला बॉसने बोलावून घेतलं. त्याच्यासमोर बरेच ग्राफ्स, डॉक्युमेंट्स आणि फायनान्शिअल स्टेटमेंट्स होते. गेल्या दोन दिवसात काही आर्टिकल्स पब्लिश झाले होते. इंडस्ट्री एक्सपर्टसच्या मते ती कंपनी आणि एकूणच सगळं सेक्टर कोलॅप्स होणार अशी चिन्हं दिसत होती. कोणीतरी ‘The Green Bull’ नावाच्या ब्लॉगरने पहिल्यांदा २ दिवसांपूर्वी त्याबद्दल लिहिलं आणि आता बऱ्याच लोकांनी त्या आर्टिकल मध्ये इंटरेस्ट घेऊन त्यावर आणखी स्टडीज पब्लिश करायला सुरुवात केली होती. सौरभ आणि त्याच्या बॉसने पटापट पुढचे निर्णय घेतले. पण राहून राहून सौरभला दोन दिवसांपूर्वीचं मधुराचं बोलणं आठवत होतं. जर हे सगळं दोन दिवसात घडलं तर घडण्यापूर्वी मधुराला कसं कळलं? तिने कुठे वाचलं असूच शकत नाही.

संध्याकाळी घाईने काम आटपून सौरभ घरी आला. त्याला शूज काढेपर्यंतही धीर नव्हता. आल्या आल्या मधुराला हाका मारत सुटला. मधुरा किचन मधून धावत आली, “काय रे, काय झालं? ठीक आहेस ना?” “तू मला परवा क्लायंट सोडून द्यायला सांगत होतीस ते का?” मधुरा क्षणभर बावरली. मग सारवासारव करत म्हणाली “अरे मी वाचलं कुठेतरी”. “कुठे वाचलंस?” सौरभने तिच्याकडे संशयाने बघत विचारलं. “आठवत नाही. किंव्वा न्यूज मध्ये बघितलं असेल” ती कचरत बोलली. “शक्यच नाही. आत्ता हे सगळं न्यूज मध्ये यायला लागलंय, तुला त्या आधीच माहिती होतं!”.

आता मात्र मधुराला काही सुचेना. सौरभची रोखलेली नजर तिला अस्वस्थ करत होती. शेवटी नं राहवून तिचा धीर सुटला आणि ती रडायला लागली “I am sorry सौरभ”. सौरभ गडबडला. रडण्यासारखं काय झालंय ते त्याला कळेना. रडणं कमी झाल्यावर मधुराने त्याला सांगितलं की कसं तिने आणि सुचित्राने ब्लॉग सुरु केला होता. सौरभ ऑफिस ला गेल्यावर ती काम करायची आणि हे सगळं त्याच्यापासून लपवून ठेवलं. “आम्ही शिकागोला गेलो ते कुठल्या ट्रिपसाठी नाही तर ती इकॉनॉमिक्स ची कॉन्फरन्स अटेंड करायला, जिला तू नाही म्हणाला होतास. पण आय स्वेअर फक्त मी आणि सुचित्राच होतो, तिसरं कोणीही आमच्यासोबत नव्हतं. मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं आणि काही लपवूनही ठेवायचं नव्हतं. माझं चुकलं”. अनेक दिवसांचं ओझं तिच्या मनावरून उतरत होतं. सौरभला काय बोलावं सुचेनासं झालं. अजूनही त्याला मधुरावर विश्वास बसत नव्हता. “मधुरा त्याच्याशी खोटं बोलली? एवढी मोठी गोष्टं ती लपवून कशी ठेऊ शकते?”

नं राहवून तो म्हणाला “दाखव तुझा ब्लॉग मला”. मधुराने ‘The Green Bull’ ची वेबसाईट उघडल्यावर तर त्याची खात्रीच पटली की ती खोटं बोलतेय. “हा ब्लॉग तू लिहिला आहेस? वेडा समजतेस का मला? माझा बॉस फॉलो करतो या ब्लॉगला” आता त्याच्या रागाचा पारा वर चढला. मधुराला कळेना की काय केलं की त्याची खात्री पटेल. “तू सुचित्राला विचार हवं तर.” ती शेवटी म्हणाली. “हे बरंय, उंदराला मांजराची साक्ष” तो वैतागत म्हणाला. “मी तुला या ब्लॉगच्या ऍडमिन पॅनलला लॉगिन करून दाखवते, मग पटेल?” मधुराला सुचलं. तिने डायरी उघडून त्यातले डिटेल्स घातले आणि ब्लॉगच्या ऍडमिन पॅनलला लॉगिन केलं.सौरभचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. “खरंच तू हा ब्लॉग लिहितेस?” त्याने पुन्हा पुन्हा मधुराला विचारून खात्री करून घेतली. त्यातल्या दोन तीन गोष्टी तिला विचारल्या. मग मात्र त्याची खात्रीच पटली. त्याला अजूनही पचवायला जड जात होतं.

“एवढ्या दिवसांत मला सांगितलं का नाहीस?” शेवटी त्याने विचारलं. “मला वाटलं मला सगळे हसतील, तू रागावशील. बालिश म्हणून मुर्खात काढशील.” मधुरा खाली बघत म्हणाली. सौरभला तिच्या वेडेपणाचं हसू आलं, आणि स्वतःच्या पण. त्याने मग बॉसशी झालेलं सगळं बोलणं सविस्तर सांगितलं. तिच्या एका आर्टिकल मुळे आता बरेच एक्सपर्टस आता या विषयावर अजून कसं लिहीत आहे तेही सांगितलं.  “मला माहितीये. मला ३-४ इमेल्स आल्या आहेत, या विषयावर अजून डिटेल मध्ये माझ्याशी बोलायचंय म्हणून”.

सौरभला पहिल्यांदा आपल्या बायकोचा अभिमान वाटला आणि स्वतःची चूकही लक्षात आली.

या गोष्टीला आता एक वर्ष होईल. मधुरा आणि सुचित्राचा ब्लॉग मस्त चाललाय आणि या वर्षीच्या कॉन्फरन्सला मधुराला स्पीकर म्हणून आमंत्रण आहे.

Leave a Reply