वैष्णोदेवी

मी पहिल्यांदा वैष्णोदेवी ला गेले तेव्हा खूप लहान होते, जेमतेम ६-७ वर्षांची असेन. एका लोकल टुरिस्ट कंपनी सोबत आम्ही १५ दिवसांच्या वैष्णोदेवी, जालंधर, दिल्ली, आग्रा आणि आणखीही काही शहरं असलेल्या मोठ्या ट्रिपला गेलो होतो. पण वैष्णोदेवी माझ्या विशेष लक्षात राहिली.  त्या टूर कंपनीने ट्रेनचा एक डब्बाच बुक केला होता. १५ दिवस आमचं तेच घर होतं. त्यामुळे आम्हाला कधीही रात्री बेरात्री ट्रेन पकडण्यासाठी जागावं  लागलं नाही किंव्वा धावपळही करावी लागली नाही. आम्ही आमच्या जागेवर आरामात झोपलेलो असायचो. रात्री केव्हा तरी आमची ट्रेन आली की आमचा डबा तिला जोडला जायचा आणि पुढचा प्रवास सुरु व्हायचा. मुक्कामाचं शहर आलं की त्या शहरात तो डबा वेगळा काढून ठेवला जायचा. त्या काळी कोणालाच लक्झरी हॉटेल्सची सवय नसल्याने कोणालाही त्यात गैरसोय वाटली नाही. उलट १५ दिवस एकत्र असल्याने, ट्रिप संपेपर्यंत सगळे एक मोठ्या जॉईंट फॅमिली सारखेच झाले होते.

आमच्या कंपार्टमेंट मध्ये आमच्या सारखीच अजून एक चौकोनी फॅमिली होती, आई, वडील, माझ्या भावाच्या वयाचा मोठा भाऊ, आणि माझ्या पेक्षा २ वर्षांनी लहान बहीण. माझ्या भावाची आणि त्या फॅमिलीतल्या मुलाची लगेचच गट्टी जमली. माझ्यासारख्या, आई जवळ झोपण्याच्या वयाच्या लहान मुलांसाठी कंपनी ने खास सोय केली होती. रोज रात्री ते खालच्या दोन्ही बर्थस च्या मध्ये एक लाकडी फळी टाकत आणि त्याची  टोकं दोन बाजूच्या बर्थ वर घातलेल्या गाद्यांखाली दाबत. मग खालच्या बर्थ वर मोठ्ठा डबल बेडच तयार व्हायचा. दोन्ही बर्थ वर आया आणि मध्ये आपापल्या आई च्या जवळ आम्ही दोघी चिमण्या. मला फार गम्मत वाटायची. नंतर अनेक वर्ष ट्रेन ने प्रवास करतांना मला प्रश्न पडायचा की रेल्वे डिपार्टमेंट अशी कायमचीच सोय का करत नाही?

वैष्णोदेवीला पोहोचेपर्यंत आमच्या दोन्ही फॅमिलीजची चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे एकत्रच वर चढायचं ठरलं. सकाळी लवकर उठून आम्ही पायथ्याशी जाऊन घोडे ठरवलेत. आयुष्यात पहिल्यांदा घोड्यावर बसत असल्याने सुरुवातीला जीव मुठीत धरून बसलो होतो. पण थोड्या वेळाने सवय झाली. घोडेवाले पोरगेलेसे होते. आमच्याशी भरपूर गप्पा मारत होते. आजूबाजूला हिरवागार डोंगर आणि पुर्ण रस्ता एका बाजूला असलेल्या खोल दरीतून येणारा वाहणाऱ्या पाण्याचा आवाज. पायथ्यापासून वर पोहोचेपर्यंत रस्त्यात एकही चहाची टपरी किंव्वा दुकान नसल्याने आम्ही खाण्या पिण्याच्या जय्यत तयारीनिशी निघालो होतो. सगळीकडे शांत होतं. मधूनच पक्षांची किलबिल आणखीच प्रसन्न करून जायची.

वर पोहोचल्यावर आम्ही दर्शनासाठी लायनीत उभे राहिलो. आमच्या टूर कंपनी शिवाय बाकी कोणीही नसल्याने १०-१५ मिनिटातच आम्ही दर्शनासाठी आत शिरलो. मात्र गाभाऱ्यात पोहोचण्यासाठी वरून आणि खालून आलेल्या दोन दगडांच्या मधून आडवे होऊन सरपटत जायचे होते. आमच्या सोबत असलेल्या फॅमिलीतल्या काकू  त्यांच्या शरीरयष्ठीमुळे त्यात अडकून बसल्या आणि काही वेळ आम्हा मुलांची करमणूक झाली. मग बाहेरून त्यांना एक दोघांनी ढकलून आणि आतल्या  बाजूने ओढून एकदाचे आत घेतले. आत उतरल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता  “बाहेर पण इकडूनच जावं लागतं का?”. पण बाहेर पडण्याचा रस्ता वेगळा असल्याने आम्हाला ती गम्मत पुन्हा बघायला मिळाली नाही.

गाभाऱ्यात पुजारी एकेका फॅमिलीला एकत्र देवीच्या बाणांसमोर बसवून (वैष्णोदेवीला मूर्ती नाही, दगडाचे बाण आहेत) काही मंत्रोच्चार करत होते. ५-१० मिनिटं मनभरून दर्शन घेतल्यावर आम्ही बाहेर पडलो. आमच्या मागून आमच्याच टूर कंपनी मधले अजून एक जोडपे आले. ते सकाळी खूप लवकर पोहोचल्याने त्यांचं दर्शन कधीच झालं होतं. बाकीची मंडळी येईपर्यंत काय करायचं म्हणून पुन्हा एकदा लायनीत उभे राहून ते आमच्यासोबत दुसऱ्यांदा दर्शन घेऊन बाहेर पडत होते.  वर जेवणं करून आम्ही उतरायला सुरुवात केली. उतरतांना वजन बॅलन्स करण्यासाठी घोड्यावर सतत मागे वाकून बसावे लागते, म्हणून दोन्ही फॅमिलीतल्या मोठ्यांनी पायी उतरायचा निर्णय घेतला. जवळ जवळ २० एक किलोमीटर अंतर असेल. पण मला नाही वाटत तेव्हा कोणालाही ४-६ वर्षाच्या मुली एवढं अंतर उतरू शकतील का असा कोणालाही प्रश्न पडला. उलट आम्ही मुलांनी उतरणं जास्त एन्जॉय केलं. उतार असल्याने पुढे धावत सुटायचं, थोड्या थोड्या अंतराने मोठे येण्याची वाट बघत ब्रेक घ्यायचा मग पुन्हा धावत सुटायचं. फक्त समोरून येणाऱ्या घोडे आणि पालखी वाल्यांकडे लक्ष ठेवायचं, एवढंच. उतरतांना आम्हाला काही उशिरा चढणारे भेटू लागले, मग भेटणाऱ्या प्रत्येकाला “जय माता दी”  ओरडून ग्रीट करायचं उत्तरादाखल समोरच्यांनी पण “जय माता दी” ओरडायचं. एकूणच हसत खेळत आमचा उतरण्याचा प्रवास झाला.

जवळ जवळ १३-१४ वर्षांनी आम्हाला वैष्णोदेवीला जाण्याची पुन्हा संधी आली. गेल्या वेळेसच्या आठवणी ताज्या असल्याने, पुन्हा तिथे जायला मिळणार म्हणून आम्ही खूप खुश झालो. पण पायथ्याच्या गावात पोहोचलो तेव्हा आम्हाला काहीच ओळखीचं वाटेना. एके काळचं ते छोटंसं गाव आता प्रवाश्यांनी गजबजलेलं होतं. हॉटेलला पोहोचल्यावर कळलं की गावात पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे थोडा वेळच पाणी मिळतं.  हॉटेल वाल्याकडून कळलं की वर चढतांना खोल दरीतून ऐकू येणारी ती नदी कधीच आटली होती. त्यांच्याचकडून हे देखील कळलं की दर्शन घ्यायचे असेल तर सकाळी खूप लवकर जाऊन तिकीट घ्यावे लागते. उशीर झाला तर  तिकीट मिळत नाही. आम्हाला कळतंच नव्हतं की गेल्या वेळेस आम्ही वैष्णोदेवी म्हणून वेगळ्याच कुठल्या ठिकाणी गेलो होतो, की या वेळेस चुकून भलतीकडेच आलो आहोत. एकही ओळखीची खूण दिसेना. सक्काळी लवकर उठून पायथ्याशी गेलो तर लांबलचक लाईन. तिकडे तिकिटं मिळवून आमची घोडेसवारी सुरु झाली. पण रस्त्यात प्रचंड गर्दी आणि घाण. बरेच लोक रात्रीचे रस्त्याच्या कडेला झोपले होते. तिथेच त्यांनी फेकलेला बराच कचरा अस्ताव्यस्त पसरला होता. डोंगर सगळे उजाड होते. हिरवळीचा लववेषही नव्हता. नदी कधीच आटली असल्याने पाण्याच्या आवाजाचा प्रश्नच नव्हता. पायथ्यापासून ते वर पोहोचेपर्यंत डोंगराच्या बाजूने सतत दुकानं होती, आणि प्रत्येक दुकानातून ऐकायला येत होती गुलशन कुमार ची गाणी!

मी त्या दिवसापर्यंत गुलशन कुमारचं एकही गाणं पूर्ण ऐकलं नव्हतं. काही गाणी असतात ना की ती सुरु होताक्षणीच डोक्यात जातात, गुलशन कुमारची सगळी गाणी मला तशीच डोक्यात जायची. या सगळ्या प्रवासात त्या गाण्यांनी जीव नकोसा करून सोडला. डोंगरातली ती पूर्वीची शांतता आता औषधाला सुद्धा उरली नव्हती. पण त्या दिवशी फक्त त्याची गाणीच नाही तर खुद्द गुलशन कुमार पण माझ्या डोक्यात गेला. त्याने वैष्णोदेवीला वारेमाप प्रसिद्धी दिल्याने या सुंदर जागेची हि अशी दैनावस्था झाली असे मत मी माझ्यापुरते बनवले.

वर पोहोचल्यावर पुन्हा लांबच्या लांब रांगा. गाभाऱ्यात जातांना कळलं की सरपटत जाण्याच्या रस्त्यातले ते दगड काढून टाकून, तिथे चालत जायला सरळ रस्ता बनवण्यात आला आहे. प्रत्येक माणसामागे सरपटत जाण्याचे ३०-४० सेकंद  कदाचित आता परवडत नसावे. आत गेल्यावर जेमतेम हात जोडण्याएवढाच वेळ मिळाला आणि लगेच पुढे सरकायला सांगण्यात आलं. सगळ्या फॅमिली ला बसवून मंत्रोच्चार करण्याचा प्रश्नच आता उरला नव्हता. 

काहीशा विमनस्क अवस्थेतच आम्ही पायी उतरायला सुरुवात केली. रस्त्यात लोकांची एवढी तौबा गर्दी होती की कोणाकोणाला “जय माता दी” म्हणणार? आणि खरं सांगायचं तर त्या पवित्र आणि सुंदर जागेची झालेली दुरावस्था बघून आम्ही सगळेच हतबल झालो होतो. जुन्या आठवणींना उजाळा देऊन ओळखीच्या खुणा शोधायचा निरर्थक प्रयत्न करत होतो. त्यानंतर बरेच वर्षं मी गुलशन कुमारला शिव्या देत राहिले.

पण मग लक्षात आलं की त्या जागेला प्रसिद्धी मिळायला जरी तो आणि त्याची गाणी कारणीभूत असली तरी तिथे गर्दी आणि घाण करणारा तो नव्हता, ते तुमच्या माझ्यासारखे लोक होते. पायथ्यापासून टोकापर्यंत नं संपणारी दुकानांची रीघ लावणारा आणि त्यांना परवानगी देणारा तो नव्हता. त्या जागेचा नाश करण्यात जेवढा तो जबाबदार होता तेवढाच जबाबदार होता हाती लागलेली प्रत्येक गोष्ट ओरबाडून घेण्याचा माणसाचा स्वभाव. आणि त्या स्वभावामुळे अजून अशा किती सुंदर जागा नाश पावणार आहेत हे ती वैष्णोदेवीच जाणे. 

Leave a Reply