“घांग्रेकर सर” या दोन शब्दांत एवढा उत्साह भरलेला होता की कोणीही म्हणावं “बस नाम ही काफी है”. सरांनी एका हाती यावल आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये सांस्कृतिक सुवर्णकाळ आणला असं मी म्हटलं तर त्यात कोणालाही अतिशयोक्ती वाटणार नाही. आयुष्यात काहीतरी वेगळा बदल आणणारे फार थोडे लोक आपल्याला भेटतात. आणि आयुष्याला पूर्णपणे नवीन कलाटणी देणारी एखादीच व्यक्ती आयुष्यात भेटते. माझ्यासारख्या लहान गावातल्या अनेक लहान मुला मुलींसाठी ती व्यक्ती घांग्रेकर सर होते. आमचं आयुष्य त्यांनी अमुलाग्र बदलून टाकलं. आम्हाला बाहेरच्या जगाची ओळख करून दिली आणि बाहेरच्या जगाला आमची.
एका कोपऱ्यात वसलेलं, बाहेरच्या जगाशी विशेष काही संबंध नसणारं आमचं गाव. लहानपणी मला खुप राग यायचा, मी एवढ्या लहान गावात जन्माला आले म्हणून, आई बाबा ते गाव सोडून शहरात स्थायिक झाले नाही म्हणून. पण सर तिकडे आले आणि सगळं चित्र बदललं. आजही मी कोणाला यावलचं नाव सांगितलं तर कोणीही त्या गावाचं नाव फारसं ऐकलेलं नसतं. अशा छोट्याशा गावातल्या मुला मुलींना टी. व्ही. पर्यंत घेऊन जाणे ही काही खाऊची गोष्ट नव्हती. एके काळी कोणी फारसं नाव न ऐकलेल्या या गावातल्या विद्यार्थ्यांनी रेडिओ, टी. व्ही. सगळीकडे झेंडे रोवले, सरांमुळे.
आम्ही शाळेत असतांना कुठल्या तरी दुर्मिळ ग्रहांचा योग्य जुळून आला होता. योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्याचं भाग्य मला लाभलं. मी चौथीत असतांना पहिल्यांदा सरांना भेटले. सर त्या भागात नवीनच आले होते. तसं म्हटलं तर कुठल्याच शाळेत ते नोकरी करत नव्हते. पण सगळ्या शाळांना आणि शाळांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी बघता बघता आपल्या पंखांखाली घेतले. माझ्या भावाच्या शाळेत सर आठ दहा दिवसांचं शिबीर घेत होते. दादाला त्या शिबिराला पाठवण्याचा आग्रह त्याच्या एका मॅडमने आईकडे केला. आईने सांगितलं की त्याला विशेष इंटरेस्ट नाही पण धाकट्या मुलीला इंटरेस्ट आहे, तिला येऊ देणार का? तसं म्हटलं तर मी वेगळ्या शाळेची विद्यार्थिनी. शिबीर दादाच्या शाळेचं होतं. त्यातले सगळे मुलं मुली पाचवी ते दहावी या वयोगटातले होते, म्हणजे माझ्यापेक्षा एक ते सहा वर्ष मोठे. सर ही चर्चा सर ऐकत होते आणि त्यांनी आनंदाने मला शिबिरात घेण्याची तयारी दाखवली. लहान गावात रहात असल्याचे फायदे, दादाच्या मॅडमनी किंवा त्याच्या शाळेने देखील कुठला आक्षेप घेतला नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून मी शाळा बुडवून त्या मोठ्या मुलांच्या शिबिराला जायला लागले.
ते शिबीर म्हणजे माझ्यासाठी सोन्याची खाण होती. काय नव्हतं त्याच्यात? अभिनय, नृत्य, लोककला, गाणं, मानवी नेपथ्य, ध्यान आणि व्यक्तिमत्व विकास करणाऱ्या इतर अनेक गोष्टी. दहा दिवस हसत खेळात भुर्र्कन उडून गेले. दहाव्या दिवशी सरांनी शिबिरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावलं होतं. आम्ही शिबिरात शिकलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर सादर केल्या. मी शिबिरात जायला लागल्यावर पुढच्या एक दोन दिवसात माझ्या वर्गातली अजून एक मैत्रीण यायला लागली. त्या शिबिरानंतर सरांनी त्यांचं लक्ष माझ्या शाळेकडे वळवलं.
त्यानंतरची वर्षं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. जवळ जवळ पाच वर्ष सर त्या भागात कार्यरत होते. त्या काळात इतर शाळा कधी कधी आरोप करत की आमची शाळा त्यांच्या खास मर्जीतली होती. मला वाटतं आज हे मान्य करायला हरकत नाही की खरंच आम्ही सरांचे लाडके होतो. सरांचं आसपासच्या कुठल्याही गावात शिबीर असो, आम्ही शाळा सोडून, एस. टी. चा प्रवास करून उत्साहाने त्याला हजेरी लावायचो. आमच्या नशिबाने शाळा आणि शाळेतल्या सगळ्या शिक्षिका देखील आमच्या एवढ्याच उत्साही होत्या. त्या आनंदाने आम्हाला शिबिराला घेऊन जायच्या. दिवसभर तिथे थांबून संध्याकाळी एस. टी. ने परत घेऊन यायच्या. शिबीर साधारण आठ ते दहा दिवस चालायचं तरी त्या न कंटाळता, न थकता, विनातक्रार रोज आम्हाला घेऊन जायच्या आणि आणायच्या. आमचे पालक देखील तेवढेच उत्साही. घांग्रेकर सरांचं शिबीर म्हटल्यावर पुढे कुठलाच प्रश्न यायचा नाही. आनंदाने शाळा बुडवून आम्हाला शिबिरांना पाठवायचे. आता विचार करतांना लक्षात येतं ती सगळी सरांच्या नावाची जादू होती. त्या वयातही सरांचा उत्साह इतका दांडगा असायचा की त्याची लागण झाल्याशिवाय राहायची नाही.
सर या नावाचा दबदबा आम्हाला त्यांच्यासोबत कधी जाणवला नाही. मुलांत मुल होऊन सर आमच्यातलेच एक होऊन जायचे. हसत खेळत किती संस्कार त्यांनी आमच्यावर केलेत याची गणना नाही.
सरांनी त्या भागात बालनाट्याच्या स्पर्धा सुरु केल्या. सगळ्या शाळांमधल्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक सर स्वतःच असत. ते आमच्याकडून दिवस दिवस, न थकता प्रॅक्टिस करून घेत. स्पर्धेत मात्र लेखक, दिग्दर्शक म्हणून त्या त्या शाळेतल्या शिक्षकांची नावं टाकत. त्या नाटकांच्या लेखक दिग्दर्शकांना बक्षिसं दिली जायची तेव्हा मला गम्मत वाटायची की ही सगळी बक्षिसं खरं तर सरांना मिळायला हवीत. कुठल्याही नवीन गोष्टीसाठी सर ज्या उत्साहाने पुढे सरसावत, क्रेडिट घ्यायची वेळ आली की त्याच गतीने मागे सरकत. काम करून प्रसिद्धी पासून दहा हात लांब राहणारे माझ्या बघण्यात ते एकमेव.
नाटकांच्या पाठोपाठ सरांनी गरबा दांडियाची शिबिरं सुरु केलीत. त्यासाठी खास त्यांच्या मुलाला, सुनेला आणि त्यांच्या मित्रमंडळींना मुंबईहून बोलावून घेतलं. तो पर्यंत माझ्या गावातल्या लोकांनी कधी गरबा दांडियाचं फारसं नावही ऐकलं नव्हतं. त्या शिबिरांमधून विद्यार्थ्यांना तयार करून मग त्यांनी गरबा दांडियाच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. त्यातही त्यांचा आमच्या शाळेवर विशेष जीव असल्याने दर स्पर्धेच्या वेळेस ते नवीन नवीन प्रयोग करत, ते आमच्याकडून बसवून घेत. नवीन स्टेप्स शिकवत. त्यामुळे दर वर्षीच्या स्पर्धेत आमच्या नृत्यात परीक्षकांना काहीतरी नवीन मिळायचं आणि मग पहिल्या नंबरचं बक्षीस आमचं असायचं.
फैजपूरचा साखर कारखाना त्या काळात सगळ्या सांस्कृतिक घडामोडींचा केंद्र बिंदू बनला होता. सरांना साखर कारखान्याच्या संचालकांनी त्या भागाचा सांस्कृतिक विकास करण्यासाठी नोकरी दिली होती. सगळ्या स्पर्धा, कार्यक्रम हे कारखान्याच्या एका भागात बांधलेल्या स्टेज वर होत. बऱ्याचदा रात्री उशिरा या स्पर्धा संपत. तो पर्यंत एस. टी. ची सेवा संपलेली असायची. मग सर प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांची सोय कारखान्यात ऊस घेऊन आलेल्या आणि रिकाम्या परत जाणाऱ्या ट्रक मध्ये करून देत. आमच्या शिक्षिका उत्साहाने आमच्यासोबत रात्री उशिरा पर्यंत असत. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारात पालक कधीही आमच्यासोबत येत नसत. आम्हाला सरांच्या आणि शाळेतल्या शिक्षकांच्या हवाली करून ते निर्धास्त असत. आजच्या पालकांना कदाचित या गोष्टी पचणार नाहीत. पण त्या काळाचे आणि लहान गावात राहण्याचे ते फायदे होते.
लहान गावात जन्माला आले म्हणून वाईट वाटणाऱ्या मला माझ्या सगळ्या आत्ये मामे भावंडांमध्ये सगळ्यात जास्त संध्या मिळाल्या, आणि त्या सगळ्या फक्त सरांमुळे. सरांनी आमचे रेडिओवर कार्यक्रम आयोजित केले, त्यांची तयारी करून घेतली. शंकराचार्यांसमोर गाण्याची संधी आम्हाला मिळवून दिली. यावल नावाच्या छोट्याशा गावात यशवंत देव आणि करुणा देव यांच्यासारखी मोठी माणसं आणलीत. एकदा पंडित बिरजू महाराजांकडे कथक शिकणारी सरांची एक माजी विद्यार्थिनी काही दिवसांसाठी घरी आली होती, त्यात दोन दिवसांसाठी तिला यावलला आणून सरांनी दोन दिवसात आमचं ओंकार स्वरूपा या गाण्यावर कथकच्या धाटणीतलं नृत्य बसवून घेतलं.
आमचं पहिलं नाटक – “विघ्नहर्ता” बसवलं तेव्हापासून सरांनी आम्हाला टी. व्ही. वर न्यायाचा ध्यास घेतला होता. त्यासाठी कुठल्याही सोयी नसतांना देखील त्यांनी त्या नाटकाच्या शुटिंगचे दोनदा प्रयत्न केले पण ते तांत्रिक कारणांमुळे फसले. शेवटी त्यांनी आम्हाला स्वप्नातही खरी वाटणार नाही अशी संधी मिळवून दिली. नाट्यदर्पण रजनी या मराठी नाट्यसृष्टीतील बक्षिस समारंभात नृत्य सादर करण्याची. त्या कार्यक्रमाचे प्रेक्षक असणार होते मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतले सगळे दिग्गज. त्या कार्यक्रमाचे टी. व्ही. वर थेट प्रक्षेपण देखील होणार होते. आमच्यासाठी एवढी सगळी धडपड करणारे सर आमचे कोण होते? तसं म्हटलं तर कोणी नाही, आणि तसं म्हटलं तर बरंच काही. हि संधी जेवढी मोठी तेवढीच कठीणही होती. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही संपुर्ण दिवस फक्त त्या तीन नृत्याची प्रॅक्टिस करायचो. सर देखील भूक तहान विसरून दिवसभर आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेत.
नृत्य देखील अनोखं – शांती क्रांती भ्रांती. शांती या विषयावर – ओंकार स्वरूपा हे गाणं. क्रांती या विषयावर – जयोस्तुते हे गाणं आणि भ्रांती या विषयावर – उषःकाल होता होता हे गाणं. सगळी मिळून आम्ही जवळ जवळ वीस एक मुलं मुली या तीन नृत्यांत होतो. त्याची प्रॅक्टिस करतांना चुकलो नसतो तर नवल. पण वीस पैकी एकाचीही चूक झाली तर सर ते गाणं पुन्हा पहिल्यापासून सुरु करत. म्हणजे शेवटच्या ओळीत चूक झाली तर परत पूर्ण गाण्याची प्रॅक्टिस करायची. कधी कधी सरांचा खुप राग यायचा.
पण जेव्हा रात्री एक वाजता आम्ही अर्धवट झोपेत एकही चूक न करता ते नृत्य सादर केलं तेव्हा त्या प्रॅक्टिसचं महत्व कळलं. या सगळ्यातून आम्हाला सरांनी कला शिकवली यात वादच नाही. पण त्यापेक्षा खुप महत्वाच्या गोष्टी शिकवल्या ज्या आज मागे वळून बघतांना जाणवतात. नाट्यदर्पण रजनी मध्ये आजूबाजूला एवढे मोठे कलाकार बघून आम्ही हरखून गेलो होतो. पण सरांनी आम्हाला सक्त ताकीद दिली की तुमचं नृत्य स्टेज वर झाल्याशिवाय कोणालाही स्वाक्षरी मागायला जायचं नाही. आम्ही सगळे हिरमुसलो. पण सरांचा पटकन चढणारा राग माहित असल्याने निमूटपणे ते पाळलं. आमचं नृत्य संपल्यावर आम्ही स्वाक्षरी घेण्यासाठी ज्या ज्या कलाकारांकडे गेलो त्या सगळ्यांनी तोंड भरून आमच्या नृत्याचं कौतुक केलं. या कलाकारांना एवढ्या जवळून बघू असं स्वप्नात देखील वाटलं नसतांना तत्यांच्या तोंडून आमचं कौतुक ऐकणं ही आमच्यासाठी किती मोठी गोष्ट होती हे शब्दांत सांगता येणार नाही. यातून सरांनी आमचा आत्मविश्वास किती पटींनी वाढवला! लहान गावात मोठं होतांना नकळत मुलांच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होतो. या आणि अशा प्रसंगांनी सरांनी तो आमच्या मनातून कायमचा मिटवला, त्याची आम्हाला जाणीवही होऊ न देता. त्या कार्यक्रमासाठी आमच्यापैकी अनेक जण मुंबईत पहिल्यांदा आले होते. पण त्या एका रात्रीने आम्हाला शिकवलं की शहरातल्या मुलांपेक्षा आमच्यात काही कमी नाही. उलट शहरात राहणाऱ्या भावंडांना माझा हेवा वाटायचा.
आम्ही हिरे होतो की नाही माहित नाही पण मला वाटतं सरांना प्रत्येक लहान मुलात एक हिरा दिसत असावा. गावोगावच्या कोळशांच्या खाणींमधून माझ्यासारख्या अनेक मुलांना त्यांनी घडवलं, हिरा असल्याचा आत्मविश्वास दिला. आता विचार येतो सर कधी त्या भागात आलेच नसते तर? मी त्यांच्या शिबिराला गेलेच नसते तर? विचार करूनही अंगावर काटा येतो. आयुष्यातल्या कितीतरी गोष्टींना आम्ही मुकलो असतो. माझ्या गावातल्या इतर अनेक शेकडो मुलामुलीं सारखं अतिसामान्य आयुष्य जगलो असतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी जन्माला घातल्याबद्दल मी आजही देवाचे आभार मानते. कारण आमच्या इतक्या संध्या आमच्या आधी किंवा नंतर कोणत्याच पिढीला त्या गावात मिळाल्या नाहीत. आम्ही नववीत गेलो आणि सरांनी ती नोकरी सोडून कोकणात त्यांच्या गावी रहायला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पहिल्यांदा जाणवलं आयुष्यातलं एक मोठं पर्व संपलं. त्यानंतर आयुष्यात अभ्यास, शिक्षण, करिअर हे वाळवंट उरलं.
पण सर आमच्यासारख्या शेकडो, हजारो मुलांच्या आयुष्याला कलाटणी देताहेत हे अधून मधून कळायचं. महाराष्ट्रातल्या गावागावातून हिरे घडवताहेत हे कळायचं आणि छान वाटायचं. ते पर्व गेल्या आठवड्यात खऱ्या अर्थाने संपलं. वयाच्या ऐंशी वर्षानंतर देखील सर त्याच उत्साहाने गावागावात शिबिरं घेत होते, एकटे एस. टी. ने प्रवास करत होते. चार वर्षांपूर्वी मी त्यांना भेटले तेव्हा मला जाणवलं की मी वयाने वाढले असले तरी सरांसाठी काळ गोठला होता, सर अजूनही यावलला यायचे तसेच दिसत होते आणि तेवढाच उत्साह होता. पण अचानक काही दिवसांपूर्वी ते आजारी पडले आणि अनपेक्षितरित्या मागच्या आठवड्यात देवाघरी गेले. अजूनही विश्वास बसत नाही.
सरांच्या जाण्याने मनात एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. भविष्यातल्या हिऱ्यांचं काय? पुढच्या पिढ्यांमधल्या हिऱ्यांना आता कोण घडवणार?