का कोण जाणे, पण आज त्या लायब्ररीची प्रकर्षाने आठवण झाली. छोटंसं गाव, त्या गावात दोन लायब्ररी, एक मोठ्या माणसांची, एक लहान मुलांची. लहान असतांना मी आणि दादा आईसोबत मोठ्या माणसांच्या लायब्ररीत जात असू. ओळीने मांडलेली आणि आमच्या दृष्टीने आभाळाला टेकलेली कपाटं आणि त्यात काठोकाठ भरलेली पुस्तकं. आईने त्यातले एक पुस्तक काढून बघायला सुरुवात केली की माझा आणि दादाचा अंधारात बुडालेल्या मागच्या बाजूच्या कपाटांमधून लपाछपी किंवा पळापळीचा खेळ सुरु व्हायचा. लायब्ररीत आमच्या शिवाय क्वचितच कोणी दिसे, त्यामुळे आम्हाला तिथे मुक्त वावर होता. दादा थोडा मोठा झाल्यावर येईनासा झाला. मग मी एकटीच त्या कपाटांमागे माझ्या एके काळी लहान असलेल्या दादाला शोधात रहायचे.
लहान मुलांची लायब्ररी मात्र त्याच्या अगदी विरुद्ध, साधी सोपी, निरागस. कुठेही मोट्ठी मोठ्ठी कपाटं नाही, की अंगावर येणारे पुस्तकांचे ढीग नाही. मोठ्या माणसांच्या लायब्ररी सारखे कधीही सुर्यप्रकाश न पोहोचणारे अंधारे कोपरे नाहीत की त्यात लपायला जागा नाहीत. घराच्या पुढच्या खोलीत चालवलेली घरगुती लायब्ररी. खोलीच्या एका टोकाला बाहेरून आत जायचं दार आणि त्याच्या समोर आतल्या खोलीत जायचं दार. आत जायच्या दाराला लागून पूर्वी मुनीम वापरत तसा डेस्क आणि त्या डेस्कच्या मागे साधारण अंगकाठीचे, प्रेमळ चेहऱ्याचे नाईक काका. उरलेल्या खोलीत सगळीकडे सतरंजी अंथरलेली. त्यावर तिन्ही भिंतींना लागून जमिनीवर, एकावर एक रचलेले पुस्तकांचे छोटे छोटे ढीग. साधारण प्रत्येक ढिगात २५-३० पुस्तकं असंत. चंपक, चांदोबा, ठकठक, छावा, गलिव्हर, सिंदाबादच्या सफरी, पोपटात जीव असलेला जादूगार, दुष्ट चेटकीण, अनोख्या राज्यांचे राजकुमार आणि राजकुमारी, अशी अनेक विश्व त्या छोट्याशा खोलीच्या साधेपणात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत. त्या छोट्याशा विश्वात मला हरवून जायला व्हायचं. खाऊच्या दुकानात गेल्यावर जसं काय घेऊन नी काय नको होतं, तसं सुरुवातीच्या दिवसात मला कुठलं पुस्तक घेऊ नी कुठलं नको असं व्हायचं. काकांचा नियम होता, एका वेळेस फक्त दोन पुस्तकं मिळणार. माझ्या अधाशी मनाचं समाधान दोन पुस्तकांवर सहसा होत नसे.
माझ्या बालमनाला प्रश्न पडायचा, एवढ्या खजिन्यातून दोन हिरे कसे निवडायचे? मग त्यावर उपाय म्हणून मी निवडलेल्या पुस्तकांचा सुरुवातीचा भाग वाचून बघायला सुरुवात केली. थोडं वाचल्यावर जे पुस्तक चांगलं वाटेल ते घ्यायचं. पण त्यामुळे प्रश्न न सुटता अधिकच गहन झाला. मग कधीतरी माझ्या व्यतिरिक्त तिथे येणाऱ्या इतर मुलांचं निरीक्षण केल्यावर लक्षात आलं. सहसा सगळी मुलं दाराजवळच्या ढिगाजवळ बसत आणि त्यातूनच एखादं पुस्तक घेत. मग मला सापडलेली दोन पेक्षा जास्त होणारी पुस्तकं मी सगळ्यात कोपऱ्यातल्या ढिगात, इतर पुस्तकांच्या खाली लपवून ठेवायला सुरुवात केली. (बरोबर ओळखलंत, मी लहानपणापासूनच डँबीस होते 😉 ). नंतर कधीतरी दादा देखील हीच युक्ती मोठ्यांच्या लायब्ररीत वापरतो हे कळल्यावर मला गंमत वाटली. इतर सगळ्या बाबतीत आम्ही दोन टोकं असलो तरी या एका विषयावर आमचं एकमत झालं म्हणायचं.
हि युक्ती चांगलीच उपयोगी पडली. त्या दिवसाची दोन पुस्तकं वाचून दुसऱ्या दिवशी ती बदलायला गेले की आदल्या दिवशी लपवून ठेवलेली पुस्तकं बरोब्बर मिळायची. कधी कधी तर मी वाचतांना एवढी मग्न व्हायचे की तासंतास तिथेच वाचत बसायचे, किती वेळ गेला कळायचंच नाही. पण मी कितीही वेळ बसले तरी काकांनी कधी टोकलं नाही. फक्त त्यांची संध्याकाळच्या चहाची वेळ झाली की ते घरात जाऊन चहा घेऊन येत आणि पुन्हा त्यांच्या त्या डेस्क वर येऊन बसत. मी मात्र होते तिथेच असायचे, मंत्रमुग्ध होऊन एका वेगळ्याच विश्वात हरवलेले. असं एखादं पुस्तक वाचून घरी जातांना मी तरंगतच घरी जात असे, शरीराने या जगात पण मनाने त्या दिवशी वाचलेल्या अनोख्या जगात हरवलेले.
त्या लायब्ररीत नक्की कधी जायला लागले आठवत नाही, कदाचित पहिली/दुसरीच्या वर्गात असेन. मला वाटतं मला ज्या दिवशी पूर्ण शब्द वाचता आला त्याच दिवशी आईने मला त्या लायब्ररीत नेलं असेल कारण मला अजूनही सुरुवातीच्या दिवसात मोट्ठ्या अक्षरात छापलेल्या पुस्तकात ‘जा दू गा र – जादूगार’ असं एक एक अक्षर लावत वाचल्याचं आठवतंय. ती लायब्ररी म्हणजे माझ्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतली पर्वणी असे. इतर वर्षभर मला लायब्ररी लावायला परवानगी नव्हती. ती असती तर मी गणित, इतिहास, भूगोल असल्या विषयांच्या वाटेला कधीच गेले नसते. दहा बाय पंधरा फुटाच्या त्या खोलीत मला माझं विश्व सापडलं. माझ्यासाठी ते एक स्वतंत्र जग होतं, माझ्या एकटीचं. तिथे इतर कोणालाही येण्यास मज्जाव होता. त्यातून मला काय काय सापडलं. चंपकमधल्या चिकूची बुद्धिमत्ता बघून, ‘गाजर खाऊन तो एवढा चतुर झाला असेल’ म्हणून मी आवडीने गाजर खायला सुरुवात केली. सिंदाबादच्या सफरी वाचून मला पण साहसी प्रवासावर निघण्याची अनावर ओढ व्हायची.
विशेष म्हणजे नुसती पुस्तकं बदलायला मला एवढा वेळ लायब्ररीत का घालवावा लागतो हा प्रश्न घरी कधी कोणी विचारला नाही. कुठल्या तोंडाने विचारातील? आईला वाचनाचे माझ्यापेक्षा जास्त वेड. घरी सतत पुस्तकं असत. मला वाचायला आवडतं म्हणून वर्षभराची चंपकची वर्गणी भरलेली. शिवाय घरी दर शुक्रवारी लोकप्रभा यायचं. ते कोण आधी वाचणार यासाठी घरात भांडणं व्हायची. मला आठवतंय मी जरा मोठी झाल्यावर एकदा विश्वास पाटलांचं ‘महानायक’ कोणाकडून तरी काही दिवसांसाठी वाचायला मिळालं होतं. जेवणाचे वार वाटून घ्यावेत तसे घरातल्या सगळ्यांनी त्या पुस्तकाचे तास वाटून घेतले होते. झपाटल्या सारखं ते पुस्तक आम्ही सगळ्यांनी वाचलं. गंमत म्हणजे बाबांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या कंपाउंडरला सुद्धा आमच्या या वेडाने ग्रासलं आणि पुस्तक मिळण्यासाठी भांडणाऱ्या नमुन्यांमध्ये अजून एकाची भर पडली. त्या लायब्ररीमध्ये मला त्या वेडाची बाधा पहिल्यांदा झाली. ती नंतर कधीही न शमणारी भूक कधी बनली कळलंच नाही.
लायब्ररीयन काका फार काही बोलत नसत. पण माझं वाचनाचं वेड ते पुरतं ओळखून होते. नवीन आलेलं पुस्तक किंवा मासिक ते खास त्यांच्या त्या डेस्क मध्ये माझ्यासाठी बाजूला काढून ठेवत आणि गेल्या गेल्या माझ्या हातात ठेवत. ते नवंकोरं पुस्तक मला पहिल्यांदा वाचायला मिळतंय या जाणिवेने मला फार भारी वाटायचं. जगाच्या सर्वोच्च जागी बसायचा बहुमान मिळाल्यासारखा वाटायचा. मग त्या दिवशी मी नेहमीपेक्षा दोन फूट अधिक उंचीवरून तरंगत घरी जायचे.
मोठं झाल्यावर कळलं सैन्यात काम करतांना पायाला कायमची दुखापत झाल्याने रिटायर होऊन काकांनी ती लायब्ररी सुरु केली होती. त्या दिवशी काका चालतांना एका पायावर जास्त जोर देऊन का चालतात ते कळलं आणि मनातला त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. गम्मत म्हणजे त्यांच्या पत्नी माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका. त्यांच्याकडे मी चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या शिकवणीसाठी जायचे. ती शिकवणी आतल्या खोलीत व्हायची. हाडं गारठून टाकणाऱ्या त्या थंडीत सकाळी स्वेटर कानटोपीने झाकून त्या आतल्या खोलीत आम्ही ७-८ मुलं बसत असू. बाहेरच्या खोलीतली लायब्ररी त्या वेळेस अंधारात बुडालेली असायची, जणू काही गुलाबी थंडीत डोक्यावरून दुलई गुरफटून गाढ झोपलेली. पण या दोन खोल्या म्हणजे मला दोन वेगळे जग वाटत. आतल्या खोलीत शिस्त, अभ्यास आणि वेळप्रसंगी अभ्यासात चूक झाली तर हाडांना भेदून आत जाणारी खोचक थंडी तर बाहेरच्या खोलीत पाहिजे तेवढा वेळ कल्पनाविश्वात हरवण्याची, काकांच्या चेहऱ्यावरच्या स्मितलकेरीची उब. मला कधी त्या दोन खोल्या एका घराचा भाग वाटल्याच नाहीत.
चौथीपर्यंत माझी तिथली जवळ जवळ सगळीच पुस्तकं वाचून संपली होती. लहान गाव, तिथे गोष्टींचं पुस्तक विकत घ्यायला एकही दुकान नाही, आणि लायब्ररी मध्ये येणारी मुलंही मोजकीच. त्यामुळे काका फार नवीन पुस्तकं घेत नसत. त्यांची सगळी भिस्त मासिकं आणि पाक्षिकं यावरच असे. शेवटी शेवटी तर मी न वाचलेलं पुस्तक सापडायला तासचे तास जायचे. तोपर्यंत मी नकळत आईची मोठ्या माणसांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती. आधी लपून छपून आणि मग आई रागवत नाही हे लक्षात आल्यावर अभ्यास सांभाळून राजरोस, अशी माझी लहान मुलांच्या लायब्ररीतून मोठ्या माणसांच्या लायब्ररीत कधी प्रगती झाली ते कळलंच नाही. पण त्या प्रगतीत त्या दहा बाय पंधरा खोलीतलं काहीतरी हरवलंय याची जाणीवच झाली नाही. ती आत्ता होतेय, इतक्या वर्षांनी.
खरं तर आज तिची आठवण येण्यासारखं काहीच घडलं नाही. पण का कोणास ठाऊक, आज त्या लायब्ररीची मनापासून आठवण येतेय.