How to Ikigai – Book Review

“तुम्ही यशस्वी आहात का?” असा प्रश्न तुम्हाला जर कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? आणि ते उत्तर जर “हो” असेल तर तुम्ही तुमचं यश कुठल्या परिमाणात मोजलं? तुमची नोकरी? तुमच्याजवळ असलेले पैसे? बँक बॅलन्स? तुमच्या नावावर असलेली प्रॉपर्टी? तुमची आलिशान कार? की अजून काही? असं समजा की तुमच्या जवळ हे सगळं मुबलक प्रमाणात आहे, मग महत्वाचा प्रश्न हा की तुम्हाला त्यांतून आनंद, समाधान मिळतंय का?

तुम्हाला सकाळी जाग आल्यावर काम सुरु करण्याचा उत्साह ओसंडून वाहत असतो की तुमचे  कामाचे  दिवस रविवारची वाट बघण्यात जातात? हे आणि असे अनेक प्रश्न “How to Ikigai” हे पुस्तक आपल्यासमोर उभे करतं. दुर्दैवाने शिक्षणाचे निर्णय घेतांना आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर महत्वाचा प्रश्न असतो “हे शिकून मला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल का?” नोकरी घेतांना सुद्धा पैसे आणि पोझिशन याकडेच आपलं लक्ष असतं पण हे काम करण्यात मला आनंद मिळेल का हा प्रश्न फार थोडे लोक स्वतःला विचारतात. आयुष्यभर आपण अधिक पगार मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण मिळणाऱ्या अधिक पगारात सुख समाधान मिळतं का?

मी कॉलेजला असतांना मला दर महिन्याच्या खर्चासाठी दोन हजार रुपये मिळत असत. कॉलेजची आणि हॉस्टेलची वर्षाची फी आधीच भरलेली असायची. मिळणाऱ्या दोन हजार रुपयांत वरचा खर्च, क्लासची फी, स्कुटीसाठी पेट्रोल, मधल्या वेळेतलं खाणं पिणं भागायचं. माझ्या बरोबर हॉस्टेलला राहणाऱ्या इतर मुलींना थोड्याफार फरकाने अशीच रक्कम मिळायची. एकदा एक मित्र म्हणाला की त्याला घरून दर महिन्याला सहा हजार रुपये मिळतात. हे ऐकून आमचे डोळे विस्फारले होते. मनातल्या मनात मी हिशोब केला की एवढ्या पैशात केवढी चैन करता येईल, नाही? पण नोकरी लागल्यावर जेव्हा मला जास्त पैसे मिळायला लागले तेव्हा ते कमी वाटायला लागले. मग दर १-२ वर्षाला पगार वाढला किंवा अधिक पगाराची नोकरी घेतली तरीही ‘सहा हजार रुपये मिळणारा मित्र किती चैन करत असेल’ त्या कल्पनेएवढी चैन प्रत्यक्षात केलीच नाही. सांगण्याचा मुद्दा असा, की पैसा कितीही मिळाला तरी तो कायम कमीच पडतो. कारण येणारा पैसा वाढतो तशा गरजा पण वाढत जातात. मग कधीतरी गरज आणि चैन यातली रेखा धूसर होते आणि आपण उर फाटेस्तोवर धावत राहतो. पण कधीतरी मनात प्रश्न डोकावल्याशिवाय रहात नाही, हे सगळं कशासाठी? खरंच मी सुखात आहे का? नक्की सुख म्हणजे तरी काय? महागड्या वस्तू, ब्रँडेड कपडे, मोठी कार? पण मग हे असूनही आयुष्यात कसली तरी कमतरता का वाटते? हे सुख मिरवतांना सतत मुखवटा घालून वावरत असल्यासारखं का वाटतं? बाहेरून सगळं चकचकीत असून सुद्धा आतून पोकळ का वाटतं?

“मी कोण, माझ्या जन्माचं ध्येय/हेतू काय?” असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला असेल तर टिम तामाशिरो यांचं “How to Ikigai” हे पुस्तक नक्की वाचा. शिक्षण, व्यवसाय निवडतांना पुढे त्यातून किती पैसे मिळतील यापेक्षा त्या कामातून किती समाधान मिळेल याचा विचार केला तर आपोआपच पुढचे मार्ग मिळत जातात, प्रगती होते पण त्याच वेळेस ते करण्यातून आनंद पण मिळतो.

इकिगाई म्हणजे काय तर

१. तुम्हाला काय करायला आवडतं? (Do what love)

२. तुम्हाला काय चांगलं येतं? (Do what you are good at)

३. जगाला कशाची गरज आहे? (Do what the world needs)

४. काय काम केलं तर तुम्हाला त्याची परतफेड मिळेल? (Do what you can be rewarded for)

 

या चार प्रश्नांचं उत्तर मिळेल तेव्हा तुम्हाला आयुष्याचं उद्दिष्ट्य सापडेल. पण हे एका क्षणाचे, दिवसाचे किंवा काही दिवसांचे प्रश्न नाहीत तर हा एक प्रवास आहे, स्वयंशोधाचा. अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून, वेगवेगळ्या प्रयोगातून तुम्हाला  शोध लागत जातील आणि या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होतील.

चार वर्तुळांच्या व्हेन डायग्रॅम मधून हे सहजपणे समजू शकतं.

 

लेखक स्वानुभव सांगत त्याचा इकिगाईचा प्रवास आपल्याला दाखवतो. बारावीनंतर त्याला सर्व्हे असिस्टंटची चांगल्या पगाराची नोकरी असतांना त्याला एक दिवस जाणीव झाली की त्या कामातून त्याला आनंद मिळत नाहीये. आठवडाभर रविवारची वाट बघायची आणि रविवार आला की सोमवारच्या विचाराने हताश व्हायचं असं त्याचं आयुष्य त्याला खटकत होतं. त्याला प्रश्न पडला की आता त्याचं उरलेलं आयुष्य असंच असणार आहे का? रिटायर होईपर्यंत असं जगायचं ही कल्पना त्याला असह्य झाली. त्याने त्याच्या वडिलांना असंच आयुष्य जगतांना बघितलं होतं, दिवसाचे १२-१४ तास काम करत.

त्या क्षणी त्याने त्याचं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकणारा निर्णय घेतला – कॉलेजला जाऊन संगीत शिकण्याचा. त्याला जाणवलं की संगीताविषयी शिकल्यावर त्याला रेकॉर्ड कंपनी किंवा संगीताच्या मॅनॅजमेण्ट मध्ये नोकरी करता येईल. चांगला पगार देणारी नोकरी सोडून देऊन हे करणं सोपं नव्हतं. त्याला कळत होतं की अशी नोकरी सोडून संगीतात शिक्षण घेणं हे लौकिकार्थाने वेडेपणाचं होतं. तो म्हणतो की आपण आयुष्य हे एका सरळ रेषेसारखं आहे असं समजतो. शिक्षण पूर्ण करून तुम्हाला नोकरी मिळेल, जगण्यासाठी पुरेसा पैसा मिळेल, मग एक दिवस तुम्ही रिटायर व्हाल आणि मग तुम्हाला ज्यात आवड आहे ते करण्याची संधी मिळेल. या सगळ्यात आपण कामातून मिळणाऱ्या समाधानाचा, आयुष्याच्या उद्देश्याचा विचार करायला विसरतो. पण त्याच्या दृष्टीने आयुष्य एक सरळ रेष नसून त्यात वेडीवाकडी पावलं, नागमोडी वळणं कधी दोन पावलं मागे जाऊन परत काही पावलं पुढे जाणं हे सगळं येतं आणि यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुम्हाला तुमची दिशा मिळत जाते. पण त्यासाठी मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष ठेवायला हवं.

एकदा हा जगापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारल्यावर त्याला पुढचा मार्ग आपोआप मिळत गेला. आधी HMV या नामांकित रेकॉर्ड कंपनीच्या दुकानात आणि मग रिजनल रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून त्याला नोकरी मिळाली. त्या सोबतच तो एका जॅझ बँडमध्ये काम करत होता. यातून त्याला भरगोस पगाराची नोकरी तर मिळालीच पण त्याचसोबत काम कारण्यातलं समाधान देखील मिळालं. त्याला रोजचं काम करण्यात आनंद मिळाला.

लेखक सांगतो की एखाद्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट येत असेल तर लक्षपूर्वक त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या गोष्टीच तुम्हाला तुमच्या इकिगाईकडे घेऊन जातील. त्याच्या मते समाज “आपण आपल्या वीक पॉईंट्स वर मेहनत केली पाहिजे” असं शिकवतो. पण त्याऐवजी आपण जर आपल्याला जे चांगलं येतं त्यावर लक्ष दिलं तर यश मिळण्याची शक्यता वाढते. प्रत्येकाला आपली स्ट्रेंग्थ ओळखता आली पाहिजे कारण ती प्रत्येकाची वेगळी असते. कोणाला खेळात गती असते तर कोणाला एखाद्या कलेत.

त्याचे वडील या जगातून गेले तेव्हा त्यांनी एक खूप मोलाचा सल्ला त्याला दिला. मरण्याची प्रत्येकाला संधी मिळते, पण त्याआधी प्रत्येकाला आयुष्य जगण्याची संधी मिळायला हवी. आपण कधी मरू हे कोणालाच माहित नसतं पण ती वेळ येण्याआधी आपण देवाने दिलेल्या या जगण्याच्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. हे पुस्तक वाचतांना डोळ्यासमोरून आत्ता पर्यंतचं आयुष्य जातं आणि त्यातून धागे दोरे गावसायला लागतात. आत्तापर्यंत लक्षात न आलेली  आवड ध्यानात येते. आत्ता पर्यंत मी हे पुस्तक तीन वेळा वाचलं आणि दर वेळेस मी माझी इकिगाई शोधण्याच्या प्रवासात एक पाऊल पुढे सरकले. आयुष्यात आनंद, समाधान या गोष्टी महत्वाच्या वाटत असतील तर एकदा तरी हे पुस्तक नक्की वाचा.

Leave a Reply