मंगळ

अक्षय भाषा कथा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालेली कथा.

वैदेहीची बोटं पुस्तकांवरून फिरत होती. मध्येच थांबून ती एखादं पुस्तक काढायची. त्याच्या मागचं वर्णन वाचून परत ठेवायची. अचानक तिची नजर मिशेल ओबामाच्या ‘बिकमिंग’ पुस्तकावर गेली. मिशेल ओबामा, एवढी उच्च शिक्षित असून सुद्धा शेवटी नवऱ्याच्या राजकारणातील महत्वाकांक्षेसाठी स्वतःच्या करिअरवर पाणी सोडलं. वैदेही स्वतःशीच खिन्नपणे हसली. तिला अनावर इच्छा झाली ते पुस्तक विकत घेण्याची. पण एवढं गलेलट्ठ पुस्तक वाचायला तिला एक वर्षापेक्षा जास्त लागेल म्हणून परत ठेवलं. गेल्या वर्षी घेतलेलं पुस्तक अजून अर्धच वाचून झालं होतं. पुस्तक वाचायला तिला वेळ कुठे मिळायचा. घरी सतत काही ना काही सुरु असायचं. गार्गीचा शाळेचा अभ्यासही आता वाढला होता. गार्गीची आठवण होताच तिने पुस्तकांच्या शेल्फ मधून डोकावून बघितलं, ती मोबाइल वर गेम खेळण्यात गुंतली होती. तिने घड्याळ बघितलं. अनिकेतला यायला आता फक्त १५ मिनिटं होती.

तिने मोठा निश्वास सोडला. खरं तर त्यांना सहा वाजता घरातून निघालेलं चालणार होतं. ट्रॅफिक जमेला धरून  जेमतेम एक तास लागला असता एअरपोर्टला पोहोचायला. पण आईंनी चार वाजताच निघायला लावलं. चारनंतर ग्रहांची स्थिती प्रवास सुरु करायला प्रतिकूल होती म्हणून. तसं बघितलं तर त्यांचा प्रवास रात्री नऊ वाजताच सुरु होणार होता, घरातून कितीही वाजता बाहेर पडलं तरी. पण वैदेहीला अनेक वर्षांच्या सवयीने कळलं होतं की वाद घालून काही उपयोग नव्हता. त्यापेक्षा एअरपोर्टवर दोन तास जास्त घालवणं सोयीचं होतं. गेले दोन तास ती तिथल्या एका पुस्तकांच्या दुकानात टाईमपास करत होती आणि गार्गी त्याच्या कॅफे मध्ये बसून गेम खेळत होती. खरं तर वैदेही अगदी पारंपारिक वातावरणात वाढली होती. तिच्या घरीदेखील सततचे पूजापाठ, उपास आणि महत्वाच्या कामांसाठी मुहूर्त बघितला जायचा. पण रोजच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मुहूर्त बघून करायची हे तिला जरा अतीच वाटायचं. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात जरा जड गेलं. पण कितीही त्रास झाला तरी ती गप्प राहायची. तिच्या घरची तशी शिकवणच होती. मग हळू हळू अंगवळणी पडलं. आता तर ती सासूच्या हाताखाली चांगलीच तयार झाली होती.

त्यांच्या सोसायटीमधल्या बायका कौतुकाने म्हणायच्या ‘अगदी सासूला साजेशी सून मिळाली हो!’ पण ‘अनिकेतला साजेशी बायको मिळाली’ हे मात्र कधीच ऐकायला मिळायचं नाही. त्यांच्या पत्रिकेतले बत्तीस गुण जुळले होते. पण मनांचं काय? पत्रिकेतले गुण जुळलेत म्हणून मनं जुळतात? जुळणं तर दूर, लग्नाला एवढी वर्षं झालीत तरी तिला अजून अनिकेतचं मन ओळखता यायचं नाही. एक नंबरचा लहरी. डोक्यात कधी काय येईल कळायचं नाही.

त्यांचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा हट्टाने एका रात्री आकाशदर्शनाला घेऊन गेला. त्या दिवशी ग्रहांचा  काहीतरी दुर्मिळ योग होता म्हणे. तिचे तेव्हा नवरात्रीचे उपास चालले होते. ती अगदी थकून गेली होती पण त्याचा हिरमोड नको म्हणून इच्छा नसतांना त्याच्यासोबत गेली. जेमतेम एक तास जागल्यावर तिला गाढ झोप लागली. केवढा भडकला होता तो दुसऱ्या दिवशी. त्या रात्री आकाशात काय दिसणार होतं ते तिला अजूनही कळलं नव्हतं. गार्गी पण अगदी त्याच्यावर गेली होती, तशीच लहरी आणि तसंच ग्रहताऱ्यांचं वेड. वैदेहीचा हात अनाहूतपणे पुन्हा एकदा ‘बिकमिंग’ वरून फिरला.

इकडे गार्गी गेमच्या फायनल स्टेजला पोहोचली होती. आज ती नक्की जिंकणार. मोबाईलने पुन्हा एकदा बॅटरी लो झाल्याचा मेसेज दिला आणि बंद पडला. “श्या! या बॅटरीला पण आत्ताच संपायचं होतं!” गार्गीने वैतागून फोन शॉर्टच्या खिशात ठेवला. तिने समोरचा कोकचा ग्लास उचलला आणि स्ट्रॉ मधून एक घोट प्यायली. कोक कधीच संपलं होतं. आता फक्त वितळलेल्या बर्फाचं थंडगार पाणी लागत होतं. एवढा वेळ गेमच्या नादात तिच्या लक्षातच आलं नव्हतं. शेवटी कंटाळून ती बाहेरची लगबग बघण्यात रमली. काही एअरहोस्टेस एका तालात त्यांच्या स्टयलिश बॅग्स ओढत गेल्या. तेवढ्यात पलीकडच्या गेटला फ्लाईटच्या बोर्डिंगची अनाउन्समेंट झाली. बघता बघता त्याची लाईन गार्गीच्या टेबल पर्यंत येऊन पोहोचली. गार्गीला विमानाच्या प्रवासापेक्षा एअरपोर्ट मध्येच जास्त इंटरेस्ट असायचा. विमानात तिला पहिल्या पाच मिनिटात बाहेर बघण्याचा कंटाळा यायचा. तेच ते आकाश, तेच ढग. किती वेळ बघायचं? मग ती मम्माच्या फोन मध्ये डोकं घालून बसायची. खरं तर तिच्या मैत्रिणींकडे स्वतःचे मोबाईल होते.  पण गार्गीला फोन घेऊन द्यायला आजीने परवानगी दिली नव्हती. डॅडाकडे अनेकदा हट्ट करूनही काहीच फरक पडला नव्हता. मम्माकडे हट्ट करून तसाही काही उपयोग नव्हता. मम्माचं आजीसमोर काही एक चालायचं नाही.

गार्गीचा आणि आजीचा छत्तीसचा आकडा होता. दोन मिनिट एकमेकींशी पटायचं नाही. आजी सतत तिच्या वागण्या बोलण्यावर ताशेरे ओढत असायची. मग गार्गी पण हट्टाला पेटून मुद्दाम आजीला आवडणार नाही असं वागायची. मधल्या मध्ये मम्माची मात्र कोंडी व्हायची. गार्गीने ऐकलं नाही की आजी मम्माला दोष द्यायची. गार्गीला मम्मासाठी वाईट वाटायचं, पण आजीला तिच्या वागण्याचा त्रास होतो याचं समाधान पण व्हायचं. डॅडा फारसा घरात नसायचा. ऑफिसच्या कामानिमित्त सतत बाहेरगावी असायचा. गार्गीला कधी कधी त्याचा हेवा वाटायचा.

तेवढ्यात समोरची लाईन भराभर पुढे सरकली आणि अचानक समोर काही क्षण शांतता पसरली. नुकत्याच रिकाम्या झालेल्या पॅसेज मधून एक बाई केबिन बॅग ओढत गेली. “प्रज्ञा मॅम?” गार्गी डोळे विस्फारून बघत होती. “हो, प्रज्ञा मॅमच!” साधी कॉटनची कुर्ती, खांद्यापर्यंतचे केस मागे सैलसर बांधलेले आणि डोक्यावर त्यांचा तो फ्रेम नसलेला चष्मा. तिला धावत त्यांच्या मागे जायची इच्छा झाली. पण ती दिसली नसती तर मम्माला टेन्शन आलं असतं. तिची नजर आता घाईने मम्माला शोधायला लागली. एकीकडे प्रज्ञा मॅमकडे लक्ष ठेवत ती दुकानात शिरली. तिला मम्मा बिलाच्या रांगेत उभी दिसली.

“मम्मा, तुझं काम झालं कीं इकडेच थांब. मी आलेच पटकन” असं म्हणत मम्माला काही बोलण्याची संधी न देता ती बाहेरच्या गर्दीत मिसळली. प्रज्ञा मॅम ज्या दिशेला गेल्या होत्या तिकडे धावत सुटली. इकडे तिच्या मम्माला घाम फुटला. अनिकेत यायची वेळ झाली होती. एअरपोर्टच्या या गर्दीत जर गार्गी हरवली तर भडका उडेल त्याचा. कधी नव्हे ते सुट्टीला निघाले होते तिघं, ती सुरु होण्याआधीच संपेल. पुस्तक विकत घेऊन ती पुढच्या पाच मिनिटात गार्गीला घेऊन गेट नंबर वीसकडे जायला निघणार होती. तिने एकदा  हातातल्या ‘बिकमिंग’ कडे बघितलं आणि तिच्या पुढे असलेल्या लांबलचक लाईनकडे बघितलं. नाईलाजाने तिने पुस्तक तिथेच ठेवलं आणि गार्गीला आवाज देत तिच्यामागे निघाली. दुकानातून जेमतेम बाहेर पडली आणि तिला लक्षात आलं की गार्गीच्या हातात बॅग नव्हती. ती धावत दुकानात परत आली. गार्गी बसली होती त्या टेबलच्या बाजूला त्यांची बॅग तशीच होती. घाईघाईने तिचं हॅन्डल बाहेर काढत ती गर्दीतून जमेल तशी घाई करत गार्गीच्या मागे निघाली. तरी अनिकेतला तिने सांगितलं होतं आपण एअरपोर्टच्या बाहेर भेटू म्हणून. तो क्लायंट मीटिंग आटोपून परस्पर येणार होता. आताशा तिच्याकडून गार्गी आवरत नव्हती. या मुलीच्या डोक्यात कधी काय येईल सांगता यायचं नाही. एकीकडे गर्दीमध्ये गार्गीला शोधता शोधता दुसरीकडे तिच्या डोळ्यांसमोर अनिकेतचा भडकलेला चेहरा तरळायला लागला. तिला एअरपोर्टच्या गर्दीने भांभावून जायला झालं.

प्रज्ञा कोपऱ्यावरच्या सीटवर येऊन बसली. तिची आधीची फ्लाईट लेट झाली होती त्यामुळे धावपळच झाली होती जरा. पण अजून दिल्लीची फ्लाईट निघायला अर्धा तास होता. तिने ताबडतोब लॅपटॉप उघडला आणि डोक्यावरचा चष्मा डोळ्यावर चढवून दिल्लीच्या मीटिंगची तयारी सुरु केली.

तिकडे गार्गी धावत गेट नंबर सातला पोहोचली. तिला समोर प्रज्ञा मॅम दिसल्या. दोन सेकंद गार्गी त्यांच्याकडे बघत तशीच उभी राहिली. तिची छाती धडधडत होती, पण ती धावत आल्याने की त्यांच्याशी बोलण्याच्या विचाराने, हे तिला सांगता आलं नसतं. शेवटी मनाचा हिय्या करून ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. “प्रज्ञा मॅम!” त्यांनी नाकावर घसरलेल्या चष्म्याच्या वरून तिच्याकडे बघितलं. काही सेकंद त्या बघत राहिल्या. “मी…  फॅन…. शाळेत… तुमचं…. स्पीच… मार्स…” माळ तुटून त्यातून सगळे मोती अचानक सैरावैरा सांडावे तसे तिच्या तोंडातून शब्द सांडले. ती गडबडली आणि एकदम गप्प झाली. मॅम हसल्या. बाजूच्या खुर्चीवरची त्यांची पर्स उचलत म्हणाल्या “बस” आणि त्यांची पाण्याची बाटली पुढे केली. गार्गीने बाटली तोंडाला लावली आणि आठ दहा घोट पाणी प्यायल्यावर ओशाळली. बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याच्या तिच्या या सवयीवर आजी चिडते म्हणून ती मुद्दाम तसं करायची. पण आज तीच सवय नडली. बाटली परत द्यावी की नाही या विचाराने काही क्षण ती तशीच रेंगाळली.

शेवटी हिम्मत करून म्हणाली, “मी गार्गी. तुमची फॅन आहे. तुम्ही आमच्या शाळेत लेक्चर दिलं होतं तेव्हा मला तुमच्याशी बोलायचं होतं पण तुम्ही घाईत होत्या. मी तेव्हापासून तुमचं मार्स मिशन फोल्लो करते आहे, मी आणि डॅडा. मी आणि डॅडाने रात्री जागून मार्स मिशनचं लाईव्ह ब्रॉडकास्ट बघितलं, टेक ऑफ आणि लँडिंग दोन्ही. मी लास्ट वीकमध्ये न्यूज मध्ये तुम्हाला बघितलं, मार्सवर आपलं स्पेस शटल लँड झाल्याचं तुम्ही अनाऊन्स केलं तेव्हा. एकदम सॉलिड! तुम्हाला ग्रेट वाटलं असेल ना, मंगळावर व्हिक्टरी मिळवून! मला पण तुमच्यासारखं सायंटिस्ट व्हायचंय आणि इसरो मध्ये काम करायचंय.” गार्गी उत्साहात बडबडत होती. प्रज्ञाला गम्मत वाटली. याचसाठी तर ती कितीही काम असलं तरी कुठल्याही शाळेचं आमंत्रण आलं की नाकारायची नाही. तिला तिच्यासारख्या अनेक मुली सायंटिस्ट म्हणून इसरो मध्ये बघायच्या होत्या.

तेवढ्यात मागून आवाज आला “गार्गी! अगं किती पळवलंस! आणि कोणाशी बोलते आहेस?” वैदेही तिथे येऊन पोहोचली. “चल लवकर, डॅडा आपली वाट बघत असेल.” “सॉरी हं, तुम्हाला त्रास दिला हिने” वैदेही प्रज्ञाला म्हणाली. प्रज्ञाने गार्गीकडे रोखून बघितलं “तू मम्माला न सांगता आलीस माझ्यामागे?” “मी सांगितलं होतं तिला, तिकडेच थांबायला” गार्गी एवढंसं तोंड करत म्हणाली. “मम्मा, या प्रज्ञा मॅम. मार्स मिशनवाल्या” गार्गीने दोघींची ओळख करून दिली. “हि माझी मम्मा”. पण वैदेहीचं लक्षच नव्हतं. ती पर्समध्ये तिचा फोन शोधत होती. तेवढ्यात तिला आठवलं की दुकानात असतांना गार्गी फोनवर गेम खेळत बसली होती. “अरे देवा! म्हणजे फोन तिकडेच राहिला की काय?” कुठल्या मुहूर्तावर घरातून निघालो असं वैदेहीला झालं. आज बहुतेक एअरपोर्ट आणि अनिकेतचा भडका बघून त्या घरी परत जाणार असं तिला वाटायला लागलं. “गार्गी, माझा फोन कुठे आहे?” वैदेहीने विचारलं. गार्गीने दोन सेकंद तिच्याकडे ब्लँक चेहऱ्याने बघितलं. “गेला फोन” वैदेही पुटपुटली. गार्गीने तिचे खिसे तपासले.  नशिबाने तिला फोन सापडला. वैदेही तो वापरायचा प्रयत्न करू लागली. “बॅटरी संपली त्याची” गार्गी म्हणाली. वैदेहीने रागाने तिच्याकडे बघितलं. कार्टीला हजार वेळा सांगितलंय, बाहेर असतांना बॅटरी संपवत जाऊ नकोस म्हणून. ऐकेल तर शप्पथ! पण प्रज्ञासमोर तिला गार्गीला रागावणं रास्त वाटेना. “कुठे जाऊ नकोस. इथेच थांब. मी फोन चार्ज करून डॅडाला फोन करते.” गार्गीने मान डोलावली. प्रज्ञा अलिप्तपणे त्यांची गम्मत बघत होती. गार्गी पुन्हा प्रज्ञाशी बोलण्यात मग्न झाली.

नुकतंच इसरोच्या मार्स टीमने यशस्वी रित्या पहिलं यान मंगळावर उतरवलं होतं. प्रज्ञा त्या प्रोजेक्टची टीम लीडर होती. गेली चार वर्ष तिची टीम अहोरात्र काम करत होती. गेले सहा महिने तर ती जवळ जवळ चोवीस तास ऑफिस मध्येच रहात होती. तिथेच तिच्या केबिन मध्ये सोफ्यावर दोन-चार तास आडवी पडायची. बाकी पुर्ण वेळ कामात बुडालेली असायची. आठवड्यातून एक-दोनदा घरी जायची. एवढ्या मोठ्या मिशनला प्रॉब्लेम आले नसते तरच विशेष. पाच वेळा यानाशी संपर्क तुटला. एकदा तर तीस तास ते संपर्काच्या बाहेर होतं. एक ना दोन. पण गेल्या आठवड्यात यान यशस्वी रित्या मंगळावर उतरलं. टी. व्ही. वर त्याचं लाईव्ह प्रक्षेपण लाखो लोकांनी बघितलं. आज त्यांच्या अथक परिश्रमांमुळे भारत मंगळावर पोहोचणारा जगातला तिसरा देश ठरला होता.

प्रज्ञाला खरं तर विमानात बसण्याआधी दिल्लीतल्या मिटींग्सची तयारी करायची होती. पण गार्गीचा उत्साह बघून तिने तो विचार बाजूला सारला. गार्गीला मिशन बद्दल अनेक प्रश्न होते. “तुमचा शटलशी तीस तास कॉन्टॅक्ट तुटला होता तेव्हा तुम्ही काय केलं? असं झाल्यावर पुन्हा कॉन्टॅक्ट कसा एस्टॅब्लिश करतात? शटलमध्ये काही बिघाड झाला तर तो इथून कसा दुरुस्त करतात?” अशा अनेक शंका तिला होत्या. “मॅम, मार्सवर जर नुसते दगड आणि माती आहेत तर तो आपलं नशीब कसं काय ठरवतो?” गार्गीने विचारलं. जेमतेम तेरा चौदा वर्षांच्या मुलीचा तो प्रश्न ऐकून प्रज्ञाला आश्चर्य वाटलं. “नाहीच ठरवत. तेच तर सिद्ध करायचंय आपल्याला” प्रज्ञा म्हणाली. गार्गीचा चेहरा उजळला. “म्हणजे असं काही नसतं? आजी म्हणते, की मला कडक मंगळ आहे. सारखी बोलून दाखवते. काही झालं की नशिबाला दोष लावते, तिच्या घरात मंगळाची मुलगी का जन्माला घातली म्हणून.” गार्गी तोंड फुगवत म्हणाली. प्रज्ञाला ऐकून कमाल वाटली. “ते काही नाही, मी मोठी होऊन ऍस्ट्रोनॉट बनणार आणि मंगळावर पाय ठेवणारी पहिली मुलगी बनणार. मग मी आजीला दाखवेन की माझ्या पत्रिकेत मंगळ नाही, मंगळाच्या पत्रिकेत मी आहे म्हणून.” गार्गी ठामपणे म्हणाली. प्रज्ञाला हसू आलं ते दाबत ती म्हणाली “That’s the spirit!”

इकडे गार्गी प्रज्ञाशी बोलत होती तोपर्यंत तिच्या मम्माने डॅडाला फोन करून गेट नंबर सातला बोलावलं. “काय हे! तुम्हाला सांगितलं होतं ना गेट नंबर वीसला भेटा म्हणून! आणि फोन का बंद आहे तुझा? वेंधळी कुठली” थोड्याच वेळात गार्गी आणि प्रज्ञाच्या कानांवर त्रासलेला आवाज पडला. “आता काही काम होत नाही”, म्हणून प्रज्ञा लॅपटॉप ठेवायला वाकली. गार्गीने जाऊन “डॅडा, हे बघ कोण?” म्हणत त्याला हाताला धरून ओढत प्रज्ञासमोर आणलं.

प्रज्ञाचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. “अनिकेत? हो अनिकेतच! पोट जरा सुटलंय आणि केस मागे गेलेत. कपाळावरच्या आठ्या इस्त्री केल्यासारख्या कोरल्या गेल्या आहेत. पण तोच तो गोल मटोल चेहरा आणि त्रासल्यावर उजव्या भुवईवर अंगठ्याने चोळायची सवय.” त्यांची नजरानजर झाली आणि क्षणात दोघं स्थळकाळाचं भान विसरले.

प्रज्ञाचं मन भुर्र्कन उडून मागे गेलं. वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. कॉलेजमध्ये दर महिन्याला सायन्स ग्रुपचे डिबेट व्हायचे. प्रज्ञा B.S.C. च्या शेवटच्या वर्षाला असतांना एकदा विषय होता “Astronomy vs Astrology”. ती Astronomy टीम मध्ये होती आणि अनिकेत Astrology टीम मध्ये. दोघं हिरीरीने वाद घालत होते. शेवटी वेळ संपली पण त्यांचं डिबेट नाही. दोघांना विभागून बक्षीस दिलं. मग दोघांच्या टीम्स पार्टी करायला एकत्रच कॅन्टीनमध्ये गेल्या. तो तेव्हा M.S.C. च्या शेवटच्या वर्षाला होता. दोघांचं ग्रहताऱ्यांवर प्रेम. भरपूर वेळ गप्पा रंगल्या. कॅन्टीन बंद करायची वेळ झाली तेव्हा लक्षात आलं, सोबतचे मुलंमुली कधीच निघून गेलेत. गाठीभेटी होऊ लागल्या. दर महिन्याला आकाशदर्शनाला एकत्र जायला लागले. सुरुवातीला मित्र मैत्रिणींसोबत. मग दोघंच. बघता बघता प्रेमात रूपांतर झालं.

तिचं M.S.C. होईपर्यंत अनिकेतला छानशी नोकरी लागली. एकदा दोघं आकाशदर्शनाला गेले होते. शास्त्रज्ञांना  एका नवीन धूमकेतूचा शोध लागला होता, तो बघायला. चारशे तीस वर्षांनी दिसणारा हा धूमकेतू म्हणजे अभूतपूर्व सोहळा होता. दोघं डोळे विस्फारून धूमकेतू बघत होते. अचानक अनिकेतच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. त्याच्या हातात सात आठ अंगठ्या होत्या, कुठल्या कुठल्या ग्रहांच्या. त्यातली हाताला लागेल ती अंगठी काढत त्याने धूमकेतूवरची नजर काढली आणि प्रज्ञाला काही कळायच्या आत गुडघ्यावर बसून ती पुढे केली. “माझ्याशी लग्न करशील?” प्रज्ञा मोहरली. धूमकेतूच्या साक्षीने ते त्यांचं नवीन आयुष्य सुरु करणार, किती रोमँटिक!

दोघांच्या घरचे भेटले. खरं तर प्रज्ञाच्या बाबांना तिने एवढ्या लवकर लग्नं करणं पसंत नव्हतं. त्यांची इच्छा होती, तिने अजून शिकावं, स्वतःच्या पायावर उभं रहावं. पण दोघांची थांबण्याची तयारी नव्हती. दोघांनी मनातल्या मनात लग्नाची तयारी सुरु देखील केली होती. एक दिवस अनिकेतच्या आईने तिची पत्रिका मागितली. प्रज्ञाच्या घरात या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसल्याने तिची कधी पत्रिकाच बनवली नव्हती. तिच्या बाबांचा नाराजीचा सूर आला. पण “जाऊ द्या ना बाबा, त्यांचा खुप विश्वास आहे या गोष्टींवर. असते एकेकाची श्रद्धा” असं म्हणत तिने त्यांना समजावलं. पत्रिका नाही हे ऐकल्यावर त्यांना मुलगी अंगठाछाप आहे सांगितल्यावर बसावा तेवढा धक्का बसला. शेवटी त्यांनी तिच्याकडून जन्म तारीख, वेळ, ठिकाण हे सगळं घेतलं आणि पत्रिका बनवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. तिथेच माशी शिंकली. पत्रिका बनवल्यावर कळलं की प्रज्ञाला मंगळ आहे म्हणून. अनिकेतने अनेक विनवण्या करून सुद्धा त्याच्या आईने लग्नाला परवानगी दिली नाही.

तिकडे प्रज्ञाच्या वडिलांचा राग अनावर झाला “बघ, मी सांगत नव्हतो ते लोक तुझ्यासाठी योग्य नाहीत म्हणून. असल्या अंधविश्वासू लोकांमुळेच आपला देश मागे पडलाय” म्हणत त्यांनी देखील तो मुद्दा संपवला. प्रज्ञाला आशा होती की अनिकेत काहीतरी करेल म्हणून. पण लवकरच तिच्या लक्षात आलं की त्याची आईसमोर तोंड उघडण्याची हिम्मत नव्हती. त्यांच्या घरात आईचा निर्णय अंतिम होता. कोणाचं काही चालायचं नाही. प्रज्ञाला कशातच रस उरला नाही. तिने एक वर्ष अनिकेतची वाट बघितली. तिला कशातच रस उरला नव्हता. शेवटी बाबांनी तिला बळजबरीने Ph.D. ला ऍडमिशन घ्यायला लावली. सुरुवातीची एक दोन वर्ष चालढकल केल्यावर तिला इंटरेस्ट येऊ लागला. गोल्ड मेडल घेऊन ती Ph.D. झाली. तिच्या थिसीस मध्ये इंटरेस्ट घेऊन इसरोने तिला आधीच नोकरी दिली होती. बघता बघता तिने स्वतःला कामात झोकून दिलं. लग्नाचा विषय तिने डोक्यातून कायमचा काढून टाकला.

काही सेकंदांच्या नजरभेटीत सगळा भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरून गेला. “डॅडा, say something, you are embarrassing me” गार्गी त्याच्या कानात कुजबुजली. अनिकेत भानावर आला. “नाईस तो मीट यू” म्हणत तो कसनुसं हसला. प्रज्ञाने आता वैदेहीकडे नीट निरखून बघितलं. अनिकेतने चार चौघांसमोर टाकून बोलल्याने ती जरा दूर जाऊन उभी राहिली होती. डोळ्यातलं पाणी लपवत फोन बघत असल्याचं भासवत होती. प्रज्ञाच्या पत्रिकेत मंगळ नसता तर आज ती वैदेहीच्या जागी असती! विचाराने तिच्या अंगावर शहारा आला. अनिकेतची नजर प्रज्ञाच्या हातातल्या त्या अंगठीकडे गेली. अनेक वर्षांपूर्वी धूमकेतूच्या साक्षीने घातलेली पोवळ्याची अंगठी अजून तिच्या हातात तशीच होती. एवढ्या वर्षांत अनिकेतची आठवण मागे पडली असली तरी अनेकदा ठरवून देखील तिला ती अंगठी काढता आली नव्हती.

मंगळ असल्याने लग्न झालं नाही, म्हणून ती Ph.D. झाली. इसरो मध्ये नोकरी मिळाली आणि त्याच मंगळावर भारताचं यान पोहोचवण्याचं भाग्य तिला मिळावं. नियतीच्या या खेळाचं तिला हसू आलं. अनेक वर्षं ती अंगठी तिच्यासाठी एक प्रश्न होती, “पत्रिकेत मंगळ नसता तर?” आज तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. शेवटी ग्रहताऱ्यांचा नशिबावर काही फरक पडत नाही म्हणता म्हणता त्या मंगळानेच तिचं मंगल केलं होतं. तेवढ्यात तिच्या फ्लाईटच्या बोर्डिंगची अनाउन्समेंट झाली. ती सामान उचलत उठली. गार्गीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली “चल बाळा, मला आता जायला हवं. तुला ऑल द बेस्ट. तुझी सगळी स्वप्नं पुर्ण होतील. माझं एक काम करशील?” गार्गीने खुशीने मान हलवली. “तू जेव्हा ऍस्ट्रोनॉट बनून मार्स वर जाशील तेव्हा तिथे ही अंगठी सोडून येशील?” असं म्हणत तिने ती अंगठी काढून गार्गीच्या हातात दिली. गार्गीने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघितलं. “तुला माहितीये? मला पण मंगळ आहे. आज मी जे काही आहे ते त्या मंगळामुळे. माझ्याकडून थँक यू म्हणून ही अंगठी त्याला भेट दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पत्रीकेतला मंगळ तुझं पण मंगलच करेल.”

सामान उचलून प्रज्ञा तिच्या फ्लाईटच्या दिशेने निघून गेली.

Leave a Reply