राणीची लढाई

मिट्ट काळोखी रात्र

सावल्या गडद येती चाल करुनी

ना कोणी सेनापती ना कुठला शिपाई

एकटीच लढते राणी तिची लढाई

 

तीच हत्ती घोडे, तीच प्यादी

कधी दिडक्या चालीचे आक्रमण

कधी देते स्वतःचा बळी

एकटीच लढते राणी तिची लढाई

 

राजाचे साम्राज्य, त्याची महत्वाकांक्षा

परी राजा न सोडी कधी त्याची कक्षा

राजासाठी जाई रणांगणी

एकटीच लढते राणी त्याचीही लढाई

 

तक्रार करी उंट, म्हणे राणीचा जाच भारी

राजाची जनता राजाची प्यादी

राणी परकी तिच्याच घरी

एकटीच लढते राणी तिची लढाई

 

थोपवले शत्रूला, गाजवले शौर्य

ठेवला देह रणांगणी

राजा बोले तिची ना जागा पटावरी

एकटीच लढली राणी तिची लढाई

Leave a Reply