स्वप्नं

आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित कधी ताजं स्वप्नं आलंच बघण्यात तर लगेच मनात शंका दाटून येतात, ते विकणारा फसवत नाही कशावरून? एकंदर काय, स्वप्नांचा व्यवहार दिवसेंदिवस कठीणच होत चाललाय. डोळ्यात तेल घालून चिकित्सा करावी लागते. नाहीतर पदरचा वेळ खर्च केल्यावर लक्षात येतं फसवणूक झाली म्हणून.

मी फेरीवाल्यांना  भाव विचारला. दिवसाचे २ तास, नाहीतर आठवड्याचे १५ तास. जरा महाग वाटतंय नाही. मी पर्स उघडून बघितलं तर त्यात १०-१५ मिनिटांची काही सुट्टी नाणी पडली होती. मला नाणी मोजताना बघून त्यातला एक म्हणाला “सुट्टी नाणी  नाही चालणार, २ तासांची बंदी नोट हवी.” मी दीर्घ सुस्कारा सोडला आणि ती नाणी सोशल मीडियासाठी ठेवलेल्या पिग्गी बँकेत सरकवली. ती तिकडून बघता बघता नाहीशी होतील तो भाग निराळा. मला तर कधी कधी वाटतं ही पिग्गी बँक माझी नाणी खाते. कितीही नाणी टाका, तरी सदानकदा रिकामीच. २ तासांची बंदी नोट सापडत नाही म्हणून जरा भाव करून बघितलं, म्हटलं दीड तासाला दे, हवं तर वरची ही झालर जरा कमी कर. तर लगेच फेरीवाला म्हणतो कसा, आमची स्वप्नं काय स्वस्त वाटली का तुम्हाला? पहाटे पहाटे उठून, ताजी ताजी निवडून, घरी आणून, धुवून, घासून पुसून, त्यावर कशिद्याची कारागिरी करून आणली आहे. मी त्याला सांगितलं गेल्या आठवड्यातल्या फेरीवाल्याकडची स्वप्नं पण अशीच दिसत होती, फक्त कशिदा नव्हता त्यांना. लगेच फणकाऱ्याने म्हणला “त्यातच तर सगळं कसब आहे, एक एक रेष आखायला काही तास दिलेत. कोपऱ्यावरच्या मोऱ्याने तुमच्या नावाची शिफारस केली म्हणून खास तुमच्याकडे आलो. नंतर शोधून कुठे सापडणार नाही कुठे अशी स्वप्नं.”

अच्छा, हा मोऱ्या माझा पत्ता देतोय तर या फेरीवाल्यांना, बघतेच नंतर त्याला. फेरीवाल्याने हातात दिलेल्या स्वप्नाचा मोह सोडवेना. शेवटी नाईलाजाने मी उठले आणि कपाटात ठेवलेला वेळ आणायला गेले. बघितलं तर कपाटात जेमतेम दिवसातला एक तास केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होता, “मला तुझ्याजवळच रहायचं” असा हट्ट करत. आता आली का पंचाईत. बचतीचा कप्पा उघडला. त्यात घसघशीत ८ तास सापडले, पण ते वापरायला झोपेची FD मोडावी लागेल. मन धजेना. अजून थोडी शोधाशोध केल्यावर अजून एक तास सापडला पण त्याचा आधीपासून त्याच्यासोबत राहणाऱ्या छंदावर जीव जडलेला. त्यांना वेगळं करण्याचा दुष्टपणा जमणं शक्य नाही. डोळ्यांसमोर स्वप्नावरचा तो सुंदर कशिदा तरळला. जीव कासावीस झाला. तो विकत घ्यायला कपाटात वेळ शोधता शोधता मी तर कधीच मनातल्या मनात मनोरे रचायला सुरुवात केली होती, त्याचं काय काय करायचं, कोणासमोर मिरवायचं याची.

शेवटी हिम्मत करून विरोधाला न जुमानता पडलेला एक तास आणि छंदाशी फारकत घ्यायला लावून त्याच्या मनाविरुद्ध दुसरा तास असे एकत्र केले आणि त्यांच्या रडण्या, विनवण्याकडे दुर्लक्ष करत हाताला धरून खेचत बाहेर आणलं. छंदाच्या आठवणीने दुसरा तास मुसमुसत होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत टोपलीतून मला आवडलेलं स्वप्नं हातात घेतलं. माझे दोन तास त्यांच्या हवाली करण्याआधी मनात काय आलं कोणास ठाऊक. पुढे केलेला हात आखडता घेत विचारलं “याला सोबत घेऊन संध्याकाळी मित्रमंडळींमध्ये जाऊ शकते ना?” फेरीवाला “हे काय अघटित?” असा चेहरा करत म्हणाला “छे! छे! काहीतरीच काय? नाजूक आहे ते खूप. दिवसाचं ऊन आणि रात्रीचं चांदणं यातलं काही सोसायचं नाही त्याला” “ऑ? मग घेऊन करायचं काय?” मी त्याला विचारलं. एक काचेची पेटी विकत घ्या, आणि एक लखमली कापड. त्या कापडात लपेटून काचेच्या पेटीत जपून ठेवा. कुठलाही प्रकाश त्याच्यावर पडू देऊ नका. आणि इतर कोणाची नजर तर अजिबात नको, नुसत्या नजरेने देखील तडा जाईल त्याला.” “असलं स्वप्न काय करायचंय?” मी ते त्याच्या हातात परत देत म्हटलं तसं सारवासारव करत त्याचा जोडीदार म्हणाला, असं कसं, त्याच्यासोबत एक फोटो देऊ आम्ही, तो फोटो वाट्टेल त्याला दाखवा. आमच्या हातचं स्वप्नं तुमच्याकडे असणं हा मानाचा विषय आहे तुमच्यासाठी.”

आता मात्र छंदाचा तास धाय मोकलून रडायला लागला. मला त्याच्याकडे बघवेना. खिशाला चिमटा काढून स्वप्नं परवडतंय खरं पण खरंच त्या किंमतीचं असेल का?

मनाचा निर्णय झाला. दोन्ही तासांना परत खिशात ठेवत मी म्हटलं “नकोच मला. घेऊन जा तुमचं स्वप्नं.” “बघा हं, नंतर पस्तावाल. तुमच्या गल्लीतल्या प्रत्येकाने घेतलंय, तुमच्याचकडे नाही. आज डिस्काउंट मध्ये विकतोय, नाहीतर त्याची खरी किंमत चार तासांच्या खाली नाही.” फेरीवाल्यातला सेल्समन जागा झाला. “असू दे सगळ्या शेजाऱ्यांकडे, मला नको. जा तुम्ही आता इथून” म्हणत मी उठले आणि त्यांना पुढे काही बोलायची संधी न देता दार लावून घेतलं. न जाणो, पुन्हा मोह व्हायचा. खिशातून बाहेर काढलं तर दोन्ही तास माझ्याकडे बघून खुद्कन हसले आणि मला येऊन बिलगले. त्यांना परत ठेवायला कपाट उघडलं तर खालच्या कप्प्यात काहीतरी लकाकलं. वाकून बघितलं तर तिथे माझं अर्धवट बनवलेलं स्वप्नं अनेक वर्ष धूळ खात पडलं होतं. काढून हातात घेतलं. आकाराने जरा ओबड धोबड, दिसायला बेढबच. त्याच्यावर त्या फेरीवाल्याकडच्या स्वप्नासारखी लकाकी नव्हती की कशिदा  नव्हता. अनेक वर्ष ठेऊन रंग विटला होता, काही ठिकाणच्या खपल्याही पडल्या होत्या. पण ते माझं स्वप्न होतं, मी माझ्या हातांनी बनवलेलं. एके काळी पंधरा मिनिटांची सुट्टी नाणी सुद्धा उरू नये अशा गरिबीच्या काळात बनवायला घेतलेलं. आणि मग परवडत नाही म्हणून ठेऊन दिलेलं. माझ्या डोळ्यात पाणी जमा झालं. स्वप्नं म्हणालं “इतक्या सहज विसरलीस मला? पंधरा पंधरा मिनिटांची असंख्य नाणी त्या पिग्गी बँकेला दिलीस, एकदाही माझी आठवण आली नाही? कोणीतरी खरंच म्हटलंय, श्रीमंती आली की माणसाला स्वतःची पण किंमत उरत नाही.” मी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला पण स्वप्नं काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हतं.

तेवढ्यात छंदाबरोबरच्या तासाने माझ्या हातातून उडी  मारली आणि अलगद स्वप्नाला कवेत घेतलं. त्याचं मन आता स्वप्नावर जडलं होतं. “त्यांना वेगळं करण्याचा दुष्टपणा मी कसा करणार?” म्हणत मी परिस्थितीला शरण गेले.

Leave a Reply