व्हाट्सअँप मुक्त विद्यापीठ अस्तित्वात आल्यापासून मोबाईल धारकांसमोर एक नवाच पेच उभा राहिलाय. आणि पूर्वी जिथे नुसत्याच गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस वर भागत असे, तसं न राहता व्हाट्सअँपचा ग्रुप मेंबर म्हणजे समर्थक, विरोधक की प्रेक्षक? असा सवाल उभा राहीला.
कुठलाही ग्रुप घ्या, मग तो फॅमिली ग्रुप असेल, नाहीतर पंचवीस वर्षांपूर्वी शाळा संपलेल्या वर्गमित्र मैत्रिणींचा, मुलांच्या पालकांचा ग्रुप असेल नाहीतर मिसळीवरच्या प्रेमाव्यतिरिक्त इतर काहीही कॉमन नसलेल्या अनोळखी लोकांचा. गाव तिथे उकिरडा तसे व्हाट्सअँप ग्रुप तिथे वाद असं काहीसं झालंय. बरं या वादांना विषय, ओळख, सामाजिक बांधिलकी, विषयाचं महत्व अशा कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही. म्हणजे मोदींची परराष्ट्रनीती चांगली की वाईट इथपासून ते मोदक उकडीचा खरा की तळलेला इथपर्यंत कुठल्याही विषयावर वाद घालता येतात, गरज असते ती फक्त वाद घालण्याच्या खुमखुमीची. मग त्यात धर्म, जात, आजची राजकीय परिस्थिती, मोदींच्या परदेश वाऱ्या, गांधी नेहरूंनी देशाचं भलं केलं की बुरं, मराठीच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार कोण, ‘आज कालचे’ पालक, यासारखे आधीच स्फोटक विषय असतील तर मग बघायलाच नको. एक मात्र आहे, की खऱ्या दर्दी ग्रुप मेम्बरला कुठलाही विषय पुरतो. मग हे लोक ‘राधे’ सिनेमातल्या एखाद्या डायलॉगच्या मागील समीकरणावर देखील वाद घालू शकतात.
आता तुम्हाला समर्थक व्हायचं आहे का? मग तुमचं आयुष्य फारच सोपं झालं म्हणून समजा. येणाऱ्या प्रत्येक मेसेजला सुंदर, टाळ्या, अंगठा (पूर्वी हा अंगठा दाखवणं उद्धटपणाचं लक्षण मानलं जायचं, असो), (पेपरात आपल्याला कधीही न मिळालेले) १००% मार्क्स किंवा हसण्याच्या विविध छटा दाखवणारा पितासूर (पित + असुर) म्हणजे साध्या मराठीत सांगायचं तर इमोजी, यातलं काहीतरी आलटून पालटून टाकत रहावं. ग्रुप मधलं आपलं समर्थन फारच नजरेआड होतंय असं वाटल्यास अधून मधून “या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे” म्हणत आपलं महत्व पटवून देत रहावं. या समर्थनाला कुठलीही बाजू घेण्याची गरज नसते. त्यामुळे सोयीप्रमाणे कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने आपलं समर्थन दाखवत रहावं.
पण हे झालं नाकासमोर चालणाऱ्या, आपलं नाकासमोर फोन धरणाऱ्या लोकांसाठी. मुरलेले समर्थक होण्यासाठी समर्थन देतांना गटबाजी आणि वैयक्तिक राजकारण करता आले पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत सुमी उगाच फुडफूड करत असते, सगळ्या विषयातलं आपल्याला ज्ञान आहे हे दाखवायचा प्रयत्न करत असते किवा दामू काका गेल्या वर्षी माझ्या सोन्याला बिनडोक म्हणाले म्हणून मग त्यांच्या पोस्टला कधीच लाईक न देऊन आपला राग दर्शवता आला पाहिजे. ग्रुपमध्ये वाद उद्भवल्यास (जो नेहमीच उद्भवतो) योग्य अयोग्यतेचा फार विचार न करता आपला मित्र किंवा जवळच्या माणसाला समर्थन करता आले पाहिजे. कारण समर्थन देण्यासाठी योग्य अयोग्यतेचा विचार करायला आपण काय संत थोडीच आहोत?
मात्र समर्थन दाखवतांना एका गोष्टीची काळजी घ्यावी. खऱ्या आयुष्यातले नातेसंबंध टिकवायचे असल्यास आलटून पालटून ग्रुप मधल्या सगळ्या लोकांच्या फोटोला एखादा अंगठा किंवा जोकला डोळ्यातून पाणी काढणारा पितासूर टाकून द्यावा. तो जोक वाचल्यावर तुमच्या ओठांच्या कडा काही मिलीमीटर हलल्या नसल्या तरी सुद्धा. नाहीतर उगाच तू फक्त सुमीच्याच मेसेजेसना लाईक करतोस म्हणत यमी रुसून बसायची आणि नातेसंबंधांत उगाच वितंडवाद यायचे. अशा समर्थक बनण्याच्या प्रथमा, द्वितीया परीक्षा पास करत, बघता बघता तुम्ही मानाच्या यादीत पोहोचाल. एखाद्या दिवशी जर ग्रुप वरच्या एखाद्या वादात “माझी बाजू घेऊन उतर” अशी विनंती करणारा मेसेज आला तर तुम्ही आता समर्थकांच्या सर्वोच्च श्रेणीला पोहोचला आहेत असे समजून जावे.
आता तुम्हाला विरोधक व्हायचे आहे का? तर त्याची कंबर कसून तयारी करावी लागेल. नुसतंच हे मला काही पटलं नाही असं म्हणणं म्हणजे जवळ जवळ समर्थन केल्यासारखंच आहे. प्रत्येक विरोध हा जाज्वल्य असला पाहिजे. यात कुठल्याही विषयाचा अभ्यास असण्याची अजिबात गरज नाही, उलटपक्षी अभ्यास जेवढा कमी, तेवढा विरोध प्रखर! त्यामुळे कुठल्याही विषयावर अधिक माहिती घेणे टाळावेच. म्हणजे मग ऐकीव माहितीच्या आधारे, आडमुठे धोरण घेऊन वाद घालणे सोपे जाते. मग प्रेशर कुकरच्या शिट्या करणं योग्य की अयोग्य यात महाभारतातील अन्न शिजवण्याच्या पद्धतीपासून ते भौतिकशास्त्राच्या नियमांपर्यंत कुठल्याही मुद्द्याचा आधार घेता येतो. वादाच्या मुद्द्यात आपले ज्ञान तोकडे पडत असल्यास मुद्दा आपल्या सोयीच्या दिशेने भरकटवावा. म्हणजे आधुनिक शेतकऱ्याच्या समस्या या विषयावर वाद सुरु असल्यास, आपण स्वतः कधी सहलीसाठी देखील कुठल्या शेतात गेलो नसलो तरी “माझा जवळचा मित्र शेतकरी आहे आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे ….” असं म्हणत आपले वैयक्तिक मत ठोकावे. भरकटवायला अजिबात कुठली दिशा न सापडल्यास, “छे, असं कधी होतंच नाही” म्हणत कुठलं तरी फालतू खुसपट काढून वाद चिघळवता आला पाहिजे. मुळ मुद्दा कितीही भरकटला तरी चालेल पण आपला शब्द खाली पडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.
ग्रुप मधील प्रत्येक सदस्याने आपली नोंद घेऊन आपल्या कुठल्याही मुद्द्याला चॅलेंज करणं टाळावं या दिशेने वाटचाल सुरु ठेवावी. विषय कुठलाही असो, त्यावर ठणकावून विरोध करता आला पाहिजे. शक्य झाल्यास आपले मत प्रकट करतांना त्या मताच्या समर्थनार्थ दोन चार लिंक पण टाकता आल्या पाहिजे. मात्र विषयाचा सखोल अभ्यास करण्याच्या फंदात पडू नये नाहीतर आपलं मत प्रगट करेपर्यंत ग्रुप मध्ये वादाचे तीन-चार नवीन मुद्दे सुरु झालेले असतील आणि जुन्या वादावरील तुमच्या मताकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही. कुठलेही पोस्ट आले की त्यात शास्त्रीय, भौगोलिक, वैज्ञानिक, तार्किक लूप होल मिळतात का हे चौकस बुद्धीने न्याहाळता आले पाहिजे. म्हणजे मग प्रेशर कुकर ची शिट्टी होऊ देऊ नये सांगणारी पोस्ट आली की ती भौतिकशास्त्राच्या नियमानुसार ती कशी चुकीची आहे हे दाखवून देता येते. किंवा भारताने घेतलेल्या नवीन बॉम्बर विमानांच्या लँडिंगच्या व्हिडिओ मध्ये पायलट ने भारतीय सैन्याची नियमावली कशी पाळली नाही हे नमूद करता येते.
वादाच्या मुद्द्याशी संबंधित कोणी तज्ञ आपल्या ओळखीत असल्यास ताबडतोब ती पोस्ट त्यांना पाठवून त्यांचा सल्ला मागावा. म्हणजे रोज बडीशेप खाल्ल्याने कॅन्सर होत नाही अशी पोस्ट आल्यास लगेच ती रुबी क्लिनिक मध्ये ऑनकॉलॉजिस्ट असलेल्या आपल्या मेहुण्याला पाठवून त्याच्या खरेपणाची शहानिशा करून ताबडतोब ते मत ग्रुप मध्ये प्रदर्शित करता आले पाहिजे. शक्य असल्यास लगोलग त्या मेहुण्याची परवानगी वगैरे मागण्याचा भानगडीत न पडत त्याला ग्रुप मध्ये परस्पर सामील करून त्याचे मत तिथल्या तिथे मागावे. म्हणजे मग ‘हा जयद्रथ आणि हा सुर्य’ हा आपला बाणा सिद्ध होतो. मेहुण्याला तसेही विशेष काय काम असते?
एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवावी, काहीही झालं तरी वादात आपला पराजय होता कामा नये. वाद घालण्यासाठी भात्यातले सगळे बाण संपले की मग “आपली उज्ज्वल आणि प्राचीन भारतीय संस्कृती” नावाचं ब्रम्हास्त्र बाहेर काढावं. या शस्त्रासमोर भले भले हार मानतात. “अरे आपली भारतीय संस्कृती.. हजारो वर्षांची महान परंपरा… आपल्या गीतेत/उपनिषदांत/पुराणात असं म्हटलंय…” या वाक्याने सुरुवात करून आपल्याला सोयीस्कर ते मत ठोकून द्यावं. कारण यातलं काहीच ग्रुप मधल्या कोणी वाचलेलं नसतं आणि ‘आपली श्रेष्ठ परंपरा’ या मुद्द्याला कोणीच भारतीय आव्हान करण्याचं धाडस दाखवणार नाही. कारण या विरोधात बोलायचं ठरवलं तर ग्रुप मधले सगळे मेंबर्स विरोधात जाण्याचा धोका असतो, त्यामुळे समोरचा हार पत्करतो आणि आपल्या शिरपेचात एक भर पडते. त्यातून कोणी हे धाडस दाखवलंच तर ताबडतोब त्याला ‘देशद्रोही’ म्हणून घोषित करून टाकावं. वादाच्या मुद्द्याशी या सगळ्याचा काहीही संबंध नसला तरी. किंबहुना तो नसलेलाच बरा. कारण इथे मुद्दा वादाचा नसून आपल्या प्रतिष्ठेचा असतो आणि ती कुठल्याही परिस्थितीत जपली पाहिजे. पण या उपरही एखादा महारथी आपल्याला वरचढ ठरल्यास वैयक्तिक शत्रुत्वाचा दावा करत ग्रुप सोडता आला पाहिजे. वेळोवेळी हे करता यावे म्हणून आधीच पाच पन्नास ग्रुपचे सदस्य व्हावे. ग्रुप सोडल्यावर ग्रुप मधील कोणी सदस्य मनधरणी करायला आल्यास आपली ग्रुप मधील जागा अबाधित सिद्ध होते.
यातल्या कुठल्या गटात आपण बसतो हे आपण आपलं ठरवावं आणि त्या त्या गटातील रथी महारथी होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु ठेवावे.
या विषयावर मत प्रदर्शन करण्यासाठी आम्ही लवकरच आमचा एक व्हाट्सअँप ग्रुप सुरु करत आहोत. इच्छुकांनी संपर्क साधावा.