किस लिये जिते है हम, किसके लिये जिते है?

मी काही दिवसांपूर्वी एक फिटनेस क्लास सुरु केला. या फिटनेस क्लास चं वैशिष्ट्य म्हणजे तो खास आयांसाठी बनवलेला आहे. थोडक्यात काय तर प्रेग्नन्ट असलेल्या किंवा डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी तो सुरक्षित आहे. तशीही मी कधीच व्यायाम करण्यात उत्साही नव्हते. पण त्यातही डिलिव्हरी झाल्यापासून मला जख्ख म्हातारी झाल्यासारखं वाटावं इतकी वाईट परिस्थिती झाली आहे. उठतांना, बसतांना, चालतांना प्रत्येक स्नायू त्याची स्वतंत्र अस्तित्वाची ओळख सांगतो. क्लास साठी रजिस्टर करतांना त्यांनी काही विशिष्ट त्रास असल्यास लिहिण्यासाठी एक बॉक्स दिला होता, त्यात मी शिस्तीत १ – खांदा, २ – मान, ३  पाठ, ४ – गुडघा…. अशी नम्बरानिशी मोट्ठी यादी दिली. उगाच एखादा अवयव सुटायचा. थोडक्यात काय तर तो बॉक्स भरून झाल्यावर माझे केस आणि नखं सोडून इतर सगळं दुखतंय नाहीतर आखडलंय असं मला लक्षात आलं. साहजिकच क्लास मध्ये मी सगळ्यात मागे असते हे सांगायला नको. धावायला सांगितलं तर इतर बायका तिसऱ्या पोस्ट पाशी पोहोचतात तेव्हा मी पहिल्या पोस्ट वरून निघते. अर्ध्या अधिक व्यायामांना मी निर्लज्जपणे हात वर करून तो करतांना माझ्या कुठल्या कुठल्या भागात दुखतंय हे सांगून त्याचं सोपं व्हर्जन मागते. काल क्लास संपल्यावर त्यातली एक बाई मला बाजूला घेऊन म्हणाली, “तू सॉलिड आहेस!” मला आधी वाटलं ती माझ्या फिटनेस ची चेष्टा करते आहे. मग कळलं की ती माझ्या निर्लज्जपणाची चेष्टा करते आहे. क्लास मधल्या इतर बायका माझ्याबद्दल काय विचार करतील याचा विचार न करता मी “मला हे जमणार नाही, याचं सोपं व्हर्जन दे” असं बिनदिक्कत सगळ्यांसमोर सांगते याचं ती कौतुक?! करत होती.

विचार करतांना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की क्लास मधली एक बाई अति competitive आहे. म्हणजे इतर बायका दिलेल्या वेळेत दहा वेळा एखादा व्यायाम करत असतील तर ती चाळीस वेळा करते, इतर बायका धावतांना दुसऱ्या पोस्टला पोहोचतात तेव्हा ती एक राऊंड पूर्ण करून दुसऱ्या राऊंडला निघते. सुरुवातीला मला त्याचं काही विशेष वाटलं नाही. कारण मी तेव्हा पहिल्या पोस्ट वरून दुसऱ्या पोस्ट कडे जाण्यात मग्न असायचे. पण हळू हळू माझ्या लक्षात आले, की ती प्रत्येक क्लास मध्ये निदान ४-५ वेळा तरी ती किती फास्ट आहे, किंवा तिने इतरांपेक्षा किती जास्त वेळा व्यायाम केला हे अधोरेखित करत असते. आणखी लक्ष दिल्यावर असं लक्षात आलं की एखाद्या व्यायामाचा त्रास होत असला किंवा तो जमत नसला तरी इतर बायका तिच्याकडे बघून तो निमूटपणे करतात किंवा निदान तशी धडपड करतात. मला प्रश्न पडला, प्रेग्नन्ट असलेल्या किंवा नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी हे कितपत चांगलं? क्लास च्या पहिल्या दिवसापासून ट्रेनर सांगते आहे की, प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. कुठल्याच दोन बायका आणि कुठल्याच दोन प्रेग्नन्सी सारख्या नसतात. असं असतांना कुठल्या तरी अति फिट असलेल्या बाईकडे बघून स्वतःच्या शरीराला ताणणे कितपत योग्य? मी या क्लास ला जाण्यामागचं कारणच होतं की मी पूर्वीसारखी फिट नाही हे मला जाणवतंय. मी जर त्या बाईइतकी फिट असते तर या काय कुठल्याच क्लासला गेले नसते. कुरकुरे तोंडात कोंबत निवांत पाय पसरून बसले असते. मी तिथे जाते माझं फिटनेस सुधरवण्यासाठी. त्या ऐवजी मी जर कुठल्या अनोळखी बाईच्या प्रेशर मध्ये झेपेल त्यापेक्षा जास्त माझ्या शरीराला ताणलं तर त्यातून नुकसानच होण्याची शक्यता जास्त.

विचार करतांना हळू हळू जाणवायला लागलं आजकाल प्रत्येक बाबतीत आपलं हेच झालंय. कोणी आपल्या पेक्षा श्रीमंत, कोणाची नोकरी आपल्यापेक्षा भारी, कोणी आपल्यापेक्षा बारीक, कोणी आपल्यापेक्षा सुंदर, कोणी आपल्यापेक्षा तरुण दिसतं म्हणून मनातल्या मनात एक अनामिक स्पर्धा तयार करायची आणि मग त्यात धावत राहायचं. प्रॉब्लेम असा आहे, की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक लोकांसोबत एकाच वेळेस आपण वेगवेगळ्या विषयातली स्पर्धा बनवून त्या सगळ्या स्पर्धांमध्ये धावत असतो. आणि मग कुठेच पहिला नंबर येत नाही म्हणून हताश, निराश होतो. हे सगळं कशासाठी आणि महत्वाचं म्हणजे कोणासाठी? कोणाला काय दाखवायचंय, कोणासमोर स्वतःला सिद्ध करायचं आहे? “किस लिये जिते है हम, किसके लिये जिते है?” सतत इतरांसाठी जगून दमायला होतं. मी श्रीमंत, मी लय भारी, माझी नोकरी लय भारी, माझा नवरा/बायको लय भारी, माझी मुलं तर जगात  भारी. कोणाचंच आयुष्य २४ तास वर्षाचे ३६५ दिवस भारी नसतं. आयुष्य म्हटलं की त्यात चढ-उतार येणार, सुख-दुःख येणार. मग आपल्या आयुष्यात उतार, दुःख कधी येतच नाही असं सगळ्या जगाला (आणि स्वतःलाही) भासवत आभासी आयुष्य जगायचं. एक सुंदर मुखवटा घालून सतत वावरायचं. त्या मुखवट्या आडचा खरा चेहरा कोणालाही दिसू नये म्हणून कसोशीने प्रयत्न करायचे. मग कधीतरी हे सगळं करता करता मन थकतं. त्यातून वैफल्य येऊ लागतं. आजूबाजूचं सगळं पोकळ वाटायला लागतं, कचकड्याच्या बाहुलीसारखं, वरून चकचकीत पण धक्का लागला की पोचे पडणारं. मग ते पोचे कोणाला दिसायला नको म्हणून, अधिक दिखावा करायचा, त्याला अधिक चकचकीत बनवायचं.

मुखवटा वागवत आपण स्वतःपासून इतके दूर निघून जातो की कधी मुखवटा काढून आरशात बघितलं तर समोरचा अपरिचित चेहरा भेसूर वाटतो. कधी मदतीची हाक मारावीशी वाटली तर कोणाला खरा चेहरा दाखवायची भीती वाटू लागते. या कश्या जगात जगतोय आपण, जिथे शेकड्याने मित्र मैत्रिणी असून, अशा वैफल्याच्या क्षणी मनातलं बोलायला एकही नाव आठवत नाही. मनातल्या मनात घुसमटत एकाकीपण खात रहातं पण कोणाला आपला खरा चेहरा, आपलं विद्रुप आयुष्य दिसू देण्यापेक्षा आपल्याला ते एकाकीपण जवळचं वाटतं. आणि ते एकाकीपण एक दिवस आपल्याला गिळून टाकतं आणि मागे राहणाऱ्यांना प्रश्न पडतो याचं/हिचं आयुष्य एवढं भेसूर होतं? मग आपल्याला दिसलं ते काय होतं? भेसूरपणा लोकांना दिसणारच असतो, आधी नाहीतर एकाकीपणाची आपल्याला गिळल्यावर. मग गिळंकृत होण्याआधी एक मदतीची हाक मारून बघायला काय हरकत आहे? कदाचित शंभरातला एकच हात मदतीला पुढे येईल पण तो तुम्हाला गिळण्यापासून वाचवू शकेल.

एकदाच आयुष्य स्वतःसाठी जागून बघा. स्वतःचा खजिना तिजोरीत ठेऊन ती किल्ली दुसऱ्याकडे देऊन का जगायचं? तुमचा आनंद तुमच्याच आत आहे. गरज आहे फक्त स्वतःसाठी जगण्याची. मी अमुक केलं तर लोक काय म्हणतील? माझ्याबद्दल काय विचार करतील? याहीपेक्षा लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझं कौतुक करावं, माझ्या कचकड्याच्या आयुष्याचा हेवा करावा यासाठी मी काय करू? हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेऊन मी अमुक केलं तर मला त्यातून किती आनंद मिळेल? हा विचार केला तर आयुष्य फार सोपं होईल. ज्यांना करायची आहे त्यांना करू दे कि चेष्टा. काय फरक पडतो त्याने? जगात असा कोणीही नाही ज्याची इतरांनी चेष्टा केली नाही. तुम्हाला नाचावंसं वाटतंय तर नाचा, चित्र काढावंसं वाटतंय तर काढा, गावंसं वाटतंय तर गा पण कोणी कौतुक करावं म्हणून नाही तर त्यातून तुम्हाला आनंद मिळतोय म्हणून करा.

माझ्या क्लास मधल्या इतर बायांचं (किंवा आयांचं) मला माहिती नाही. पण मला प्रत्येक क्लास नंतर माझ्या फिटनेस मध्ये येत असलेला बदल जाणवतोय आणि त्या छोट्या छोट्या यशातून किती आनंद मिळतोय हे त्यांना काय माहित? मग त्यासाठी ज्या बायकांना मी ओळखत नाही, ज्यांना हा क्लास संपल्यावर पुन्हा कधी भेटण्याची सुतराम शक्यता नाही, त्यांच्या चेष्टेचा विचार करून मी स्वतःचं नुकसान का करून घेऊ? १० मिनिटं खाली मांडी घालून उठतांना, गुढग्यावर किंवा कमरेवर हात ठेवत “अगं आई गं” म्हणावं न लागणं इसकी किंमत तुम क्या जानो रमेश बाबू? असो, माझ्या क्लास मधल्या कुठल्याच बाईने कधी बॉलीवूड चे सिनेमे बघितले नसल्याने, हे त्यांना सांगायला माझ्याकडे इंग्लिश शब्द नाहीत. पण स्वतःपुरतं मी एवढं ठरवलं आहे की काहीही करण्यापूर्वी स्वतःला विचारायचं ” किस लिये जिते है हम, किसके लिये जिते है?”

Leave a Reply