Bigg Boss – Masterchef


शेवटचा अर्धा तास!!! बिग बॉस ने आवाज दिला. 

बिग बॉस – मास्टरशेफ या नवीन शो मध्ये येऊन त्यांना सगळ्यांना आता २ आठवडे झाले होते. सगळ्यांना एका घरात बंद करून ठेवलं होतं आणि रोज तिथे कूकिंग competition चे नवीन नवीन राऊंड्स सुरु होते.

आज त्यांचा ओपन किचन राऊंड होता. थोडक्यात आज त्यांना हवं ते साहित्य वापरून हवे ते पदार्थ बनवण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि ते बनवायला ४ तास देण्यात आले होते. गौरी मेक्सिकन पद्धतीचा पास्ता आणि त्यासोबत मिडल ईस्टर्न स्टाईल चे पिटा ब्रेड बनवत होती. झेलम रसगुल्ले आणि गुलाबजाम यांचे थर करून, त्याचा फ्युजन स्टाईल केक बनवत होती. समीर ऑम्लेट पाव बनवत होता, ३ वेळा अंडी जमिनीवर सांडून, २ वेळा ऑम्लेट जाळून झाल्यावर आता तो घामेघूम होऊन घड्याळाकडे बघत होता. आता त्याच्याकडे शेवटची २० मिनिटे उरली होती, त्याचं पाक कौशल्य सिद्ध करायला. रोहित ने सहज सोपी म्हणून भेळ बनवायला घेतली होती. पण कांदा चिरतांना त्याने बोटाला जखम करून घेतली होती.

रावी ने तर ५ कोर्स brunch बनवायला घेतला होता. तिची लगबग सुरु होती. अनय ने चायनीज पद्धतीचा फ्राईड राईस आणि मंचुरियन बनवून सगळ्यांना अचंबित केलं होतं. तो उरलेला अर्धा तास प्रेसेंटेशन वर काम करत होता. सगळ्यात चांगल्या दिसणाऱ्या ३ डिशेस चे फोटो बिग बॉस च्या इन्स्टा अकाउंट वर शेअर केले जायचे. 

सायली तिच्या  कूकिंग स्टेशन च्या एका टोकाला तिचा लॅपटॉप घेऊन काम करत बसली होती. ३ तास स्टूल वर बसून तिची पाठ दुखायला लागली होती. पण kitchen एरिया मध्ये खुर्च्या allowed नसल्याने तिचा नाईलाज होता.

४ तास संपले. बिग बॉस एकेकाला समोर बोलावून त्यांची डिश टेस्ट करून त्यांना मार्क्स देत होते. समीर च्या ऑम्लेट पावात मीठ कमी पडलं होतं पण पुरुष असूनही त्याचा प्रयत्न स्तुत्य आहे म्हणून त्याला उत्तेजनार्थ ५० मार्क्स एक्सट्रा देण्यात आलेत. शेवटी सायली चा नंबर आला. “२ मिनिट हं, एवढं सेव्ह करून येते”. बिग बॉस च्या कपाळावर आठ्या पसरल्या. गौरी आणि झेलम ने एकमेकींकडे बघून “होपलेस आहे” अशा अर्थाची मान हलवली.  सायली तिचा ट्रे घेऊन समोर आली.

“हे काय आहे?” नाक वाकडं करत बिग बॉस ने विचारलं. “भेंडीची भाजी, पोळी आणि कोशिंबीर” सायलीने उत्तर दिलं. तिचं लक्ष भलतीकडेच होतं. बिग बॉस ने ही “हि होपलेस आहे” अशा अर्थाची मान हलवली. “हा प्रश्न नव्हता” बिग बॉस ने जरा आवाज चढवला. “तू इथे आल्यापासून आम्ही बघतोय, तुला कॉम्पिटिशन मध्ये काही इंटरेस्टच नाही. कधी ३ तास देऊन नुसतं सॅलॅड मध्ये रेडिमेड ड्रेसिंग घालून आणतेस, कधी ३ कोर्स डिनर साठी खिचडी, पापड, लोणचं आणून त्यांना ३ कोर्सेस काय म्हणतेस”. “बरं मग मला एलिमिनेट करा” सायली आशेने म्हणाली. बिग बॉस चा चेहरा पडला. “आम्ही तुम्हाला वर्ल्ड क्लास शेफ बनवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला त्याची काही किंमतच नाही. गेम च्या  नियमाबाहेर  जाऊन  तुला तुझा लॅपटॉप सुद्धा ठेवायची परवानगी आम्ही दिली. पण तू तुझा किचन मधला सगळा वेळ लॅपटॉप वर काम करण्यात घालवतेस. असं कसं चालेल? उत्तर दे. सगळा देश तुझ्याकडे आशेने बघतोय”

कॉम्पिटिशन सुरु झाल्यापासून सायलीने स्वतःवर संयम ठेवला होता. खरं म्हणजे या घरात बंद असलेल्यातले काही लोक स्वतःहून भाग घ्यायला आले होते तर काही लोकांना जबरदस्तीने पकडून आणलं होतं. कोणालाही लॅपटॉप, मोबाइल किंव्वा दुसरे कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, करमणुकीचे साधन आणि बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवायची परवानगी नव्हती. सायलीला डोक्यावर पोतं घालून, व्हॅन मध्ये कोंबून इथे आणलं होतं. पण तिला तिच्या ऑफिस च्या बाहेरून उचललं असल्याने चुकून तिचा लॅपटॉप हि आत आला होता.

त्यांची चूक लक्षात आल्यावर गेम च्या आयोजकांनी तो काढून घेण्याचे बरेच प्रयत्न केले. तिच्या अपरोक्ष लॅपटॉप काढून नेतील या भीतीने सायली पूर्ण वेळ लॅपटॉप तिच्या जवळच ठेऊ लागली, जेवतांना, झोपतांना आणि शेवटी कहर म्हणजे टॉयलेट ला जातांना पण लॅपटॉप न्यायला लागली. घरातली भांडणं, कॉम्पिटिशन मध्ये एकमेकांना हरवण्यासाठी चाललेली चुरशीची लढत आणि पहिल्या सिझन चा बिग बॉस – मास्टरशेफ बनण्याची महत्वाकांक्षा या सगळ्यात सायली कुठेच नव्हती. बघावं तेव्हा एका कोपऱ्यात बसून लॅपटॉप बडवतांना दिसायची. त्यात काय मजा. तिला काम करता येऊ नये म्हणून घरातल्या इतर सदस्यांनी तिला बराच त्रास दिला.

मग शेवटी तिने धमकीच दिली की, “मला एकतर घरी पाठवा नाहीतर लॅपटॉप ठेऊ द्या. तसं नाही केलं तर मी दिवसभर ‘मला इथे जबरदस्तीने बंद केलंय’ असा मेसेज लिहिलेला टी-शर्ट घालून फिरेन”. आयोजकांनी विचार केला तसेही इंटरनेट शिवाय सायली काय करणार आहे. पण तिच्याकडे इंटरनेट शिवाय करण्यासारखं बरंच काम होतं जे तिला एक आठवडा पुरलं. आणि ते संपल्यावर तर तिने नवीन नॉव्हेलच लिहायला घेतलं. आता मात्र बिग बॉस आणि सायली, दोघांचाही पेशन्स संपायला लागला होता.

सायलीने विचार केला बिग बॉस च्या बापाचं काय जातंय एक डेझर्ट बनवायला चार तास द्यायला. त्याचं  स्वतःचं gourmet रेस्टॉरंट आहे. हाताखाली मदत करायला १० लोक आहेत. तिथल्या एका जेवणाचं बिल भरायला लोकांना त्यांचा iPhone आणि उरलेली दुसरी किडनी विकावी लागते. त्याने एक पदार्थ बनवायला २४ तास घेतले तरी काही बिघडत नाही.

“अर्ध्या तासात जे बनतं, तेच मी बनवणार. अर्ध्या तासापेक्षा कमी आयुष्य असलेल्या पदार्थांसाठी ४ तास किचन मध्ये घालवणं मला पटत नाही. त्यापेक्षा तेवढ्या वेळात मी त्याच्या पेक्षा अनेक पटींनी जास्त आयुष्य असलेल्या गोष्टी बनवेन. ज्यांना आवड आहे त्यांनी हे करावं, माझ्यावर का ही जबरदस्ती? देशातल्या ज्या लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत त्यांना माझी जागा द्या, मी घरी जाते” सायलीने निग्रहाने सांगितलं.

बिग बॉस ने पुन्हा मान हलवली आणि सांगितलं “एलिमिनेशन राऊंड मध्ये लोकच ठरवतील तुला घरी पाठवायचं की नाही ते”. सायलीने ने लॅपटॉप उचलला आणि तिच्या नेहमीच्या कोपऱ्यात जाऊन बसली. आधीचं नॉवेल लिहून संपल्याने तिने आज पासून नवीन नॉवेल लिहायला घेतलं.

Leave a Reply