सिव्हिक सेन्स?!!!??! म्हणजे काय रे भाऊ?

मी कडाक्याच्या थंडीत, बँफ (Banff) मध्ये एका बर्फाळलेल्या ट्रेल वर चालत होते. इथे कॅनडा मध्ये बरेच दिवस तापमान शुन्य सेल्सिअस च्या खाली असते. पण खरी कसोटी असते तापमान शुन्य सेल्सिअस च्या वर खाली जाते तेव्हा. दिवस तापमान शून्याच्या जरा वर जाते त्यामुळे आणि उन्हामुळे असल्याने जमिनीवर पडलेला स्नो वितळतो. पण ते तापमान अनेक दिवस पडलेला सगळा बर्फ वितळून त्याचं पाणी वाहून जायला पुरेसा नसतो. त्यातच दिवस फार लहान असल्याने बर्फाच्या वरचा थर थोडा वितळून बर्फाचा चिखल होण्याइतका पातळ होतो तोपर्यंत सूर्यास्त होतो, तापमान शून्याच्या खाली उतरते आणि थोड्याश्या वितळलेल्या त्या बर्फाची गुळगुळीत लादी तयार होते जी अत्यंत निसरडी असते. स्नो मध्ये चालणं तुलनेत बरंच सोपं असतं. कधी कधी तर अशा गुळगुळीत लादीवर फ्रेश स्नो पडतो आणि त्यामुळे चालायला सोपं असल्याचा भ्रम तयार होतो. पण चालायला सुरुवात केली की त्या स्नो खाली लपलेल्या त्या गुळगुळीत लादीवरून पाय घसरण्याची शक्यता असते. थोडक्यात काय तर कधीही पाय घसरून पडू शकते अशा वातावरणात मी एकटीच एक एक पाऊल जपून चालत होते. ज्या टूर कंपनी सोबत त्या पार्कमध्ये गेले होते त्यांनी शूज ना लावायला cleats दिले होते. पण ते लावून सुद्धा प्रत्येक पाऊल टाकतांना भीती वाटत होती. दोन्ही बाजूला उंच उंच बर्फाच्छादीत खडे पर्वत आणि त्यातून जाणारी दरी. त्या दरीत मध्ये पाण्याचा (त्या वेळेस गोठलेला) प्रवाह, आणि त्या प्रवाहाच्या एका बाजूने रेलिंग लावून बनवलेला वळणा वळणाचा चालण्याचा रस्ता. आजूबाजूला किती डोळ्यात साठवू आणि किती कॅमेऱ्यात असे पावलोपावली दिसणारे मनोहारी दृश्य. त्या रस्त्यावर चालणाऱ्या अनेक वेड्यांमधली मी एक. ऐकतांना जीवावर उदार असं जरी वाटत असलं तरी तिथे सतत लोकांची रहदारी सुरु होती, त्यात अनेक लोकं त्यांच्या लहान मुलांना देखील घेऊन आले होते. कॅनडातल्या लोकांना बर्फाची भीती घालणे म्हणजे मुंबईतल्या माणसाला लोकलची भीती घालण्यासारखं आहे. इथली लहान लहान मुलं सुद्धा बर्फात लीलया खेळत बागडत असतात.

असं एक एक पाऊल टाकत असतांना अचानक समोरून एक सहा – सात वर्षाचा मुलगा धावत आला (हो, बर्फावरून धावत आला). त्याची फॅमिली कदाचित थोडी मागे होती आणि वळणाच्या रस्त्यामुळे आमच्या नजरेआड होती. मला रेलिंग धरून एक एक पाऊल टाकतांना बघून तो थबकला, एका बाजूला शांत उभा राहिला आणि मला जाण्यासाठी रस्ता मोकळा सोडला. मी त्याच्यासमोरून जात असतांना त्याच्याकडे हसून बघितलं आणि थँक यू म्हटलं. तोपर्यंत मागून त्याच्या आईचा आवाज आला “बाळा, समोरून कोणी येत असेल तर त्यांना आधी जायला दे”. मला त्याचं आणि त्याच्या आई वडिलांचं कौतुक वाटलं. ते समोर आल्यावर मी हसून त्यांना सांगितलं की तुम्ही सांगण्या आधीच त्याने बाजूला उभं राहून मला जायला जागा दिली होती आणि त्यांचा मुलगा गुणी आहे हे देखील सांगायला विसरले नाही. मला अचानक मुंबई आणि ठाण्यात फूटपाथ वरून “रस्ता माझ्या बापाचा” अशा थाटात  घोळक्यात चालून अक्खा फूटपाथ अडवणारे अनंत लोकं आठवलेत. समोरून किंवा मागून येणाऱ्यांचा रस्ता आपण अडवत आहोत याची तसूभर देखील जाणीव त्यांना नसायची. त्यांना जायला रस्ता मागितला तर त्यांचा iPhone महिनाभर वापरण्यासाठी मागितल्यासारखा चेहरा करायचे.

काही दिवसांपूर्वी मी मुलीला स्ट्रोलर मध्ये ठेऊन एकटी बाहेर गेले होते. इथे बऱ्याचशा ठिकाणी दरवाजा उघडायला बटण असते, ते दाबले की व्हील चेअर आणि स्ट्रोलर न्यायला दार आपोआप उघडते. काही कारणाने मी गेले होते तिथलं दार उघडण्याचं बटण काम करत नव्हतं. तेवढ्यात मागून दोन टीनएजर मुली आल्या. त्यातली एक लगबगीने पुढे झाली आणि मला जायला दरवाजा उघडून धरला. हे एकुलतं एक उदाहरण नाही. गेल्या सहा सात महिन्यात स्ट्रोलर घेऊन फिरतांना हा अनुभव अनेकदा आला. काही वर्षांपूर्वी मी मुंबईत कॅपजेमिनी नावाच्या नावाजलेल्या मल्टी नॅशनल कंपनीत काम करत असतांना एका मैत्रिणीच्या हाताला लागलं होतं म्हणून तिच्यासाठी दरवाजा उघडा धरला तर तिच्या पाठीमागून येणाऱ्या आठ दहा जणांनी पटपट स्वतःचा आत शिरकाव करून घेतला. रोज प्रदेशातील क्लायंट सोबत काम करत असलेल्या या माझ्या सहकाऱ्यांनी  मान वर करून मला साधं थँक यू म्हणण्याची देखील तसदी घेतली नाही. पण स्ट्रोलर किंवा व्हील चेअर नसतांना देखील इथे सहसा कोणी दार उघडलं की ते मागून येणाऱ्या व्यक्तीसाठी उघडं धरून ठेवायची पद्धत आहे. कधी कधी त्यासाठी दार धरणारी व्यक्ती काही सेकंड थांबायला देखील तयार असते. हा अनुभव देखील मी अनंत वेळा घेतला आहे.

परदेश स्वच्छ आणि आपल्याकडे सगळीकडे घाण यावरचं वक्तव्य तर आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकलं वाचलं आहे. मी तीन वर्ष UK ला राहिले आणि आता साडे पाच वर्ष कॅनडाला राहते आहे. इतक्या वर्षात मी जेमतेम एका हाताच्या बोटांवर मोजण्या एवढ्या लोकांना कुठेही कचरा टाकतांना बघितलं असेल. भारतात मात्र माझ्या सोबत काम करणाऱ्या, स्वतःला सुशिक्षित आणि सुसंकृत म्हणणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना बघितलं आहे.

थुंकण्याची कथा तर काय वर्णावी! काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने तिच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी इथल्या एका वॉटर पार्क मध्ये ठेवली होती. सहा महिन्याच्या आमच्या मुलीला त्या पाण्यात न्यावं अशा विचारात आम्ही असतांना तिथल्या एका मुलाला त्याच पाण्यात थुंकतांना बघितले आणि त्या पाण्यात आपणही उतरू नये ये निर्णयाला आम्ही पोहोचलो. थुंकणारा सात आठ वर्षाचा मुलगा भारतीय वंशाचा होता हे सांगणे न लगे.

इथे अनेक वेळा मी कित्येक किलो मीटर खोळंबलेला ट्रॅफिक बघितला आहे, पण त्या खोळंबल्या ट्रॅफिक मधलं  एक देखील वाहन विरुद्ध दिशेच्या मोकळ्या रस्त्यावर किंवा दोन लेन च्या मध्ये घुसतांना बघितलं नाही. कुठल्याही बाजूने सायरन ऐकू आला की सगळी वाहनं थांबून अंदाज घेतात आणि वेळ पडल्यास रस्त्याच्या बाजूला थांबून त्या पोलीस किंवा ऍम्ब्युलन्स ला जायला मार्ग मोकळा करून देतात. विशेष म्हणजे त्या इमर्जंसी वाहनाला मिळत असलेल्या मोकळ्या रस्त्याचा फायदा करून घ्यायला त्याच्या मागे एकही वाहन जात नाही. पुण्यात आणि मुंबईत मी अनेकदा खोळंबल्या रस्त्यावर कोणीच मागे हटत नाही हे बघून कार मधून उतरून दोन चार वाहन आणि रिक्षा चालकांना चार शिव्या घालून, त्यांना मागे सरकायला लावून रस्ता मोकळा करण्याची पार्ट टाइम, बिन पगारी ट्रॅफिक हवालदाराची नोकरी केलेली आहे.

या परिसरात स्थलांतरित पक्षी बघण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका पार्कमध्ये आम्ही रस्त्यावरून चालणाऱ्या त्या पार्कच्या छोट्याश्या ट्रेन मध्ये बसलो होतो. पक्षी दिसण्यासाठी शांतता आवश्यक असते. मोठा आवाज किंवा गोंगाट झाला तर पक्षी उडून जातात. आमच्या ट्रेन मध्ये बसलेला एक घोळका मोठमोठ्या आवाजात गप्पा मारत होता आणि त्यांच्या आवाजाच्या वरताण त्यांची मुलं किंचाळत होती. वळून पाहिले तर भारतीय. काय बोलणार आपलेच दात आणि आपलेच ओठ. याच प्रवासात एक दिवस , याच ट्रेन मध्ये आमच्या मागच्या बाकावर बसून दोन भारतीय बायकांनी, “माझं घर किती मोठं आहे, किती श्रीमंत, उच्चभ्रू परिसरात आहे” याची आपसात मोठ्या आवाजात, भारतीय accent मधल्या इंग्लिश मध्ये चढाओढ लावली होती. पक्षांशी किंवा आजूबाजूच्या निसर्गाशी त्यांना काही घेणंदेणं नव्हतं. हीच चर्चा त्यांनी एकमेकींना आपापल्या श्रीमंती घरात बोलावून का केली नाही हा मला न कळलेला मुद्दा होता.

एक दिवस एका पार्कमध्ये चालत असतांना एका बाजूला खुप सुंदर वासाच्या फुलांची झाडं ओळीने पसरली होती. एक लहान मुलगी धावत धावत त्यांच्या जवळ गेली. मला वाटलं आता ही त्यातली काही फुलं तोडून घेईल. पण तिने थांबून श्वासभरून त्या फुलांचा वास घेतला आणि वडिलांकडे वळून म्हणाली, आपण आपल्या बागेत या फुलांची झाडं लावूयात का? म्हणजे मला रोज त्या फुलांचा वास घेता येईल. हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यांसमोर कास पठारावरील प्रसंग उभा राहिला. पंचवीस तीस जणांच्या ट्रिप सोबत मी आणि नवरा कास पठार बघायला गेलो होतो. आमच्या बस मधल्या शिक्षिका असलेल्या एक बाई, कास च्या त्या फुलांवर आडव्या पडून त्यांच्या मैत्रिणीला त्यांचे फोटो काढायला सांगत होत्या. त्यात त्यांच्या अंगाखाली आणि पायाखाली चुरडल्या गेलेल्या फुलांशी आणि झाडांशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. इथे स्प्रिंग आणि समर मध्ये ठिकठिकाणी सुंदर फुलं लावलेली असतात. लोकांच्या घराबाहेरच्या बाग, मॉल आणि दुकानांचे परिसर एवढंच काय रस्त्याच्या कडेला असलेल्या सरकारी जागेतली फुलं देखील कोणीही तोडून नेत नाही.

येणाऱ्या जाणाऱ्यांना एका बाजूला होऊन रस्ता देणे हा किंवा असे अनेक सिव्हिक सेन्स फक्त आई वडीलच नाही तर शाळेत आणि त्याही आधी डे केअर पासूनच शिकवतात. गेल्याच आठवड्यात मुलीसाठी एक डे केअर बघायला गेले असतांना शिक्षिकेच्या सांगण्यावरून, अडीच तीन वर्षाची पाच चिमुरड्यांनी एका बाजूला भिंतीशी उभे आम्हाला जायला जागा करून दिली. रस्ता दिल्याबद्दल त्यांची शिक्षिका आणि मी त्यांना थँक यू म्हणायला विसरलो नाही. पण या आणि अशा छोट्या छोट्या प्रसंगातून इथले पालक आणि शिक्षक मुलांमध्ये सिव्हिक सेन्स घडवत असतात. “नीट वाग” असं सांगून शिकवण्यापेक्षा मुलांसमोर स्वतः नीट वागून त्यांच्यासमोर उदाहरण ठेवत असतात.

हे सगळं आठवण्याचं आणि मुळात “आपल्याला (भारतीयांना) सिव्हिक सेन्स आहे का?” हा प्रश्न पाडण्याचं मुख्य कारण. काल रात्री अडीचच्या सुमारास खुप मोठ्या आवाजात हसण्याच्या आवाजाने आमची झोप मोड झाली. बराच वेळ हसण्याचे आवाज तसेच सुरु राहिल्याने मी शेवटी आवाज कुठून येतोय हे बघायला उठले. आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये एका बाल्कनीत आठ दहा जणांचा घोळका मोठ्या आवाजात गप्पा मारत होता आणि जोरजोरात हसत होता. खरं तर त्या बिल्डिंग आणि आमच्या बिल्डिंग मध्ये बरंच अंतर आहे. त्यामुळे एवढं अंतर कापून आमची झोप डिस्टर्ब करण्याची ताकद असेलेले आवाज पिऊन टल्ली तरी असावेत किंवा हाय तरी असावेत असा आम्ही तात्पुरता निष्कर्ष काढला. त्याची तक्रार करण्यासाठी मी जमिनीपासून कितवा मजला आणि कुठलं घर याची नोंद करून ठेवली. (हो, या देशात कोणी रात्री उशिरा मोठ्या आवाजात शेजाऱ्यांना त्रास देत असेल, तर त्याची रीतसर तक्रार करता येते. ज्यांची तक्रार केली त्यांना पोलीस जाऊन वॉर्निंग देतात आणि तक्रारीचं पुढे काय झालं हे देखील तुम्हाला कळवतात. त्या लोकांचा गोंधळ सकाळी सहा पर्यंत सुरु होता. दिवस निघाल्यावर परत आवाज सुरु झाल्याने आम्ही डोकावून बघितलं आणि भारतीय चेहरे बघून कपाळावर हात मारून घेतले.

आता तुम्हाला वाटेल की मला फक्त भारतीयच वाईट वागतांना दिसतात का? नाही. काही अभारतीय देखील असे बेशिस्त वागतांना दिसतात. पण खेदाची गोष्ट अशी की अश्या प्रसंगात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वेळा भारतीय दिसले आहेत.

मला माहिती आहे की आता नेहमीची कमेंट येईल की “परदेशात जाऊन त्यांचं सगळं चांगलं आणि आपलं सगळं वाईट ही टिपिकल एन आर आय मानसिकता मी दाखवते आहे.” पण ज्यांचं जे चांगलं आहे ते मान्य करून त्यातून चांगलं शिकण्यात कसला कमीपणा? दुसऱ्याची एखादी गोष्ट चांगली आहे हे मान्य केल्याने आपलं सगळं वाईट ठरत नाही. पण आपलं सगळं चांगलं आणि दुसऱ्याचं सगळं वाईट आपली दुबळी मनोवृत्ती नक्कीच दाखवतं.

Leave a Reply