मरगळलेली सकाळ

डोळे उघडून वेळ बघितली, सकाळचे सव्वा आठ. सोमवार ते शुक्रवार साडेआठच्या अलार्मला सुद्धा न उघडणारे डोळे शनिवारी सकाळी कसे अचूक लवकर उघडतात म्हणून चिडचिड झाली. हट्टाने थोडा वेळ तशीच पडून राहिले. गेले काही महिने ऑफिसमध्ये भरपूर काम असल्याने शनिवार उजाडेपर्यंत बॅटरी संपलेली असते. पण त्यातही मागचा आठवडा आणखीच धावपळीत गेला होता. स्टार्टअप मध्ये काम करण्याचे चॅलेंजेस. तसं म्हटलं तर घरातून पाय देखील बाहेर ठेवत नाही. पण वर्क फ्रॉम होम च्या या काळात आम्ही बसल्या जागी ताशी २०० किमी च्या वेगाने पळतो. वेग पुरेसा नाही म्हणून की काय, येता जाता सिनियर मॅनेजमेंट “आता यावरून उडी मारून दाखवा” म्हणत रस्त्यात दहा बारा फुटी भिंती अडथळे म्हणून आणून ठेवतात. वेग मात्र कमी होता कामा नये. मग वेग तसाच ठेवत अडथळे पार करतांना दमछाक होते. मागचा आठवडाही तसाच काहीसा गेला होता. शनिवारी जरा झोपायला मिळेल असं वाटलं होतं तर अलार्मशिवाय जाग आली. दहा पंधरा मिनिटं पडून राहूनदेखील झोपेची चिन्ह दिसेनात. डोक्यात कामाच्या विचारांच्या माश्या भुणभुण करायला लागल्यावर मात्र त्यांना झटकून देत मी उठले. “आठवडाभर धावपळ करायचा पगार देताहेत, शनिवारी कामाची चिंता करण्याचा नाही” असं स्वतःला बजावलं. वाटलं, आता उठलेच आहे लवकर, तर शहराच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या मित्राच्या मित्राकडून त्याचं सामान तरी घेऊन यावं. गेले अनेक दिवस ठरवत होते पण वेळ मिळत नव्हता.

पडदे उघडले पण खोलीतल्या प्रकाशात फार काही फरक पडला नाही. दिवसा सुद्धा घरात लाईट लावावा लागेल एवढे अंधारून आले होते.  एकही सुरकुती नसलेल्या बर्फाच्या दुलईत बाहेरचं जग विसावलं होतं. पण जमलेल्या बर्फाने समाधान न झाल्याने अजून बर्फ कोसळतच होता. बर्फ कोसळणे हा शब्दप्रयोग मनाला कुठेतरी चुकीचा वाटला. पाऊस कोसळतो, पण बर्फाच्या फ्लेक्स एवढ्या हलक्या असतात की त्यांचा आवाजदेखील होत नाही. लगोलग मनात विचार आला पावसाचा देव इंद्र, मग बर्फाचा देव कोण? ते पण डिपार्टमेंट इंद्र देवाकडेच असेल का?  वाऱ्याने हलणाऱ्या पडद्याच्या घड्यांप्रमाणे पडणाऱ्या बर्फावर हवेतल्या हवेत लाटा तयार होत होत्या. त्यातून मला जायचं होतं ब्रॅम्पटनला. तिथे म्हणजे चांगल्या हवामानाच्या दिवशी सुद्धा दोन – चार मुर्खासारखे चालवणारे रस्त्यात भेटतात. मग आजच्या सारख्या दिवशी तर कल्पनाच न केलेली बरी. उगाच ताशी शंभर किमीच्या वेगात, बारा – पंधरा मीटरच्या पलीकडचं दिसत नसतांना तश्या मुर्ख ड्राइव्हर्सच्या बाजूने गाडी चालवण्याच्या विचाराने देखील अंगावर काटा आला. लगोलग मी जायचा विचार रद्द केला.

किचन मध्ये पाय ठेवल्याबरोबर अति उत्साही कुत्र्याच्या पिल्लांनी सगळ्या बाजूंनी “मला उचल, मला उचल” म्हणत पायाशी उड्या माराव्या तशी सगळी कामं “मला उचल, मला उचल” म्हणत लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू लागले. कामाच्या विचारांना हात हलवत झटकलं तसं त्यांना झटकायचा प्रयत्न करत कॉफी बनवून सोफ्यावर येऊन बसले. बर्फात बाहेर जायचं नसेल तर घराच्या उबेत बसून तो पडतांना बघायला मस्त वाटतं. कॉफी त्या उबेत भर घालत होती. आता काय करायचं हा प्रश्न एकीकडे सतावत असतांना दुसरीकडे काहीही करण्याचा कंटाळा आला होता. माझ्या एका मित्राच्या भाषेत सांगायचं तर मसाल्याच्या भाजीला तेल सुटतं तसा मला “कंटाळा सुटला होता”. थोडा वेळ बर्फ बघून झाल्यावर फोनने माझं लक्ष वेधून घेतलं. रेंगाळत मी व्हाट्सअँपचे मेसेजेस बघायला घेतले. पण आज त्यातही मन रमत नव्हतं. दोन चार ग्रुप्स बघून झाल्यावर फोन खाली ठेवला. आज काहीतरी वेगळं वाटत होतं. मग लक्षात आलं आज दोन वर्षात पहिल्यांदा मी घरात एकटी होते. दोन वर्षांपासून कोरोनाच्या कृपेने दोघंही घरातून काम करत असल्याने आणि बाहेर पडण्यावर बंधनं असल्याने, दोन वर्षात एकही दिवस एकटीला निवांत घरात मिळाला नव्हता. नवरा स्वतः शोधलेला असो, नाहीतर आई वडिलांनी, दिवसाचे चोवीस तास डोक्याशी नको नको होतो. आज पहिल्यांदा तो ऑफिस मधून काम करणार होता. उठल्यावर सुरुवातीला अस्वस्थ करणारी शांतता आता आतपर्यंत झिरपत होती.

तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वाजला, कोणीतरी राहुल देशपांडेंचा नवीन व्हिडिओ पाठवला होता. त्यांच्या सुराने पसरलेल्या शांततेवर फुलांचा शिडकावा झाला. अचानक लक्षात आलं की नवीन टी. व्ही. वर युट्युब लागतं. ताबडतोब फोन वरचं गाणं बंद करून टी. व्ही. वर लावलं आणि तो घेतल्याबद्दल भरून पावले. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या नवीन पेन्सिल कलर्सनी साद घातली. कपाट उघडून त्यात स्केचबुक शोधायला घेतलं आणि त्यात कोंबलेल्या पसाऱ्याने मांडीत उडी मारली. मग पुढचा तासभर ते आवरण्यात गेला. त्यातून काय काय बाहेर पडलं. पेंटिंगचे ब्रश, कॅनवास, वॉटर कलर्स, ऍक्रिलिक कलर्स, ऑइल कलर्स, नवीन घेतलेले पेन्सिल कलर्स, कॅनडातल्या ऍबओरिजिनल लोकांच्या बीडवर्कचे कापड आणि बीड्स, पॉटरीचे टूल्स, पॉटरी करायला भट्टी मिळत नाही म्हणून हौसेने घेतलेली एअर ड्राय क्ले, त्या क्ले चे दागिने करता येतील म्हणून दागिने बनवायच्या गोष्टी, दागिन्यांच्या आकारांचा साचा, कलरींग बुक, स्केच बुक, जर्नल, जर्नल लिहिण्यासाठी घेतलेले वेगवेगळ्या रंगांचे जेल पेन्स, कॅन्डल्स बनवण्याचा वॅक्स आणि वाती. क्राफ्ट च्या किती गोष्टी हौसेने घेऊन नुसत्याच जमवून ठेवलेल्या. कधीतरी एकदा वापरलेल्या आणि ठेऊन दिलेल्या. खरं तर यातली प्रत्येक गोष्ट मला अगणित आनंद देते. पण कामांच्या धबडक्यात आनंदाला कुठलं प्राधान्य मिळायला! त्या सगळ्या सामानाच्या मागून कपाटाच्या आणि आठवणींच्या कोपऱ्यात गेलेली एक चंदनाच्या वासाची कॅन्डल पण सापडली. कधी तरी चांगल्या प्रसंगी लावू म्हणून ठेऊन दिलेली.

“आजच तो ‘कधीतरी येईल असा चांगला दिवस'” म्हणत ती कॅन्डल लावली. आता घरात राहुल देशपांडेंच्या स्वराला चंदनाच्या वासाची यथायोग्य साथ मिळाली. मग मनात विचार आला घरात स्वतःसाठी एक प्लेजर कॉर्नर बनवावा का? ताबडतोब कामाला लागले, कपाटातलं उरलं सुरलं सामान काढून कपाट नीट लावून ठेवलं. ते करतांना या सगळ्या आनंद देणाऱ्या गोष्टी काळजीपूर्वक वेगळ्या काढल्या. सोफ्यासमोरची सगळी जागा भरून गेली. त्याच्या मधोमध जाऊन बसल्यावर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी मला अशीच पसारा करायची सवय होती. घराच्या मधोमध असलेल्या खांबाला टेकून बसून शाळेच्या क्राफ्टच्या तासाचा होमवर्क करायला घ्यायचे. त्याचा माझ्या आजूबाजूला दोन फुटांच्या परिघात पसारा मांडून ठेवायचे. ते करून झालं की उठून खोलीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सोफ्याला टेकून बसायचे आणि तिथे नवीन काहीतरी काढायचे. ते करून झालं की खोलीच्या तिसऱ्या भागात नवीन कसला तरी पसारा मांडायचे. तीन खोल्यांच्या छोट्या घरात पण बराच पसारा करता यायचा त्या काळी मला. मग आई घरी आली की त्या पसाऱ्याच्या प्रमाणात तिच्या कपाळावर आठ्या पसरायच्या. मग पुढचा काही वेळ तिची बोलणी ऐकण्यात आणि तिला मदत करण्याची ऍक्टिंग करण्यात जायचा. तेव्हा ती नेहमी म्हणायची “तुझं लग्न झालं की तुझ्या घरी येऊन मी पसारा करत जाईन आणि तुला आवरावं लागेल.” माझ्या लग्नानंतर ती पहिल्यांदा माझ्या घरी राहायला आली तेव्हा मी खोलीतल्या आधीच असलेल्या पसाऱ्याकडे बघत तिला खोचकपणे म्हणायचे “आता करून दाखव पसारा!”

त्या पसाऱ्याच्या मध्ये बसून मनाला समाधान मिळेपर्यंत स्केच बनवले. आणि मग खेळून दमलेल्या लहान मुलाला खेळता खेळता झोप यावी तशी स्केच काढून झाल्याबरोबर मला झोप अनावर झाली. बर्फ पडतच होता. दुपारचे साडेतीन वाजून गेले होते. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. तो पसारा तसाच टाकून मी उठले आणि दोन तास झकासपैकी झोप काढली. उठल्यावर पसाऱ्या बद्दल ओरडा पडणार नाही याची खात्री होती. उठून घरातला एक कोपरा निवडून तिथे सगळं सामान नीट रचून ठेवलं रोज वेळ मिळेल तेव्हा आनंदाच्या त्या कोपऱ्यात फेरफटका मारण्यासाठी.

आणि जाणवलं की “कधीतरी” असं म्हणत अश्या किती तरी गोष्टी आपण कोपऱ्यात ठेऊन देतो. छोटे छोटे आनंद सुद्धा “नंतर कधीतरी” या खात्यात जमा करत राहतो. ‘आनंद’ कधी प्रायोरिटी लिस्ट वर येतच नाही. एक कामविरहित स्वतःच्या आनंदाला दिलेला दिवस आणि महिन्याभरासाठी बॅटरी रिचार्ज. नाही का?

Leave a Reply