माझी खाद्यंती

संस्कार म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे आई, वडील, आजी, आजोबा, काका, मामा, मावशी इत्यादी उभे राहतात. पण कळत नकळत आपल्या संपर्कात येणारे कितीतरी लोक आपल्यावर संस्कार करून जातात. माझ्यावर झालेल्या खाद्यसंस्कारात जाणते अजाणतेपणी अनेकांनी हातभार लावला.

मुळातच घरात खाण्याची आणि खिलवण्याची आवड असल्याने खवय्येगिरी वारसा हक्काने मिळाली. गावात कुटुंबाला घेऊन जाण्यासारखं एकही रेस्टॉरंट नाही म्हणून आई बाबा खास जळगावला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जात, नवनवीन पदार्थ स्वतःही ट्राय करत आणि आम्हालाही खाऊ घालत. त्याकाळी जळगाव मधलं हॉटेल म्हणजे डोसा, इडली, पाव भाजी, भेळ आणि चाट पदार्थ. पण त्याचं पण काय अप्रूप असायचं आम्हाला, कारण आमच्या गावात तेवढं देखील मिळायचं नाही. दोन चार महिन्यातून एकदा जळगावला गेल्यावर हॉटेलमध्ये जेवणे हा सोहळा असायचा. मग आई घरी तो पदार्थ बनवून बघायची. नंतर नंतर तर दर रविवारी असं काहीतरी वेगळं रात्रीच्या जेवणात बनायचं, कधी इडली सांबार, कधी पाव भाजी तर कधी रगडा पॅटिस. एकदा आई कुठल्या तरी कॉन्फरन्ससाठी पुण्याला जाऊन आल्यावर तिने मसाला पापड या पदार्थाचा आस्वाद घेतला आणि मग घरी येऊन आम्हाला तो खिलवला.

वर्षा दोन वर्षातून एखादी तरी लांबची ट्रिप व्हायची, मग जिथे जाऊ तिथल्या खास पदार्थांची चव बघायची. त्यातच मग हिमाचल मधल्या अनेक फळं एकत्र करून त्यावर चाट मसाला घालून केलेल्या फ्रुट सॅलडचा शोध लागला. अलिबागला फणसाचे चुकीचे गरे खाऊन मग उगाच लोक फणसाचं एवढं कौतुक करतात म्हणून त्यांना नावं ठेवली. अनेक वर्षांनी मुंबईत रहायला आल्यावर मग कळलं की फणसात कापा आणि बरका असे दोन प्रकार असतात. त्यातले बरका गरे गिळगिळीत असते. हे माहित नसल्याने आम्ही जो पहिला फणस विकणारा दिसला त्याच्याकडून गरे घेतले आणि गरे देणाऱ्याला आमचं अज्ञान माहित नसल्याने त्याने कदाचित बरका गरे दिले. मुंबईतल्या मित्रमंडळींमुळे फणसाशी नीट ओळख झाली आणि एवढ्या सुंदर गोष्टीला इतकी वर्षं नावं ठेवलीत म्हणून हळहळले.

पण माझ्यावर घरात खाद्यसंस्कारांची फक्त पायाभरणी झाली. त्यावर मजले उभे राहिले घराबाहेर पडल्यावर. शिक्षणासाठी पुण्याला हॉस्टेलला रहायला आल्यावर शहरांतून आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मुलींनी जाणीव करून दिली की खाण्याच्या बाबतीत आपण किती बावळट आहोत. जमशेदपूरची मैत्रीण ‘चायनीज’ हा शब्द कुठेही ऐकला की लगेच जिभल्या चाटायला लागायची तर मुंबईतून आलेल्या मैत्रिणी ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री, दोराबजी, मॉंजिनीज, मॅकडोनाल्ड असे शब्द पोहे, साबुदाण्याची खिचडी म्हटल्यासारखे सराईतासारखे दिवसात एक दोन वेळा तरी फेकायच्या. आमचे अनेक नातेवाईक शहरात रहात. त्या भावंडांत आपली मुलं बावळट वाटू नये म्हणून आई बाबा सतत दक्षता घेत. तरी देखील एक दोन खवचट नातेवाईक बोलण्यातून, नजरेतून “गावंढळ” असे हिणवून दाखवत असत. आता ‘बावळट न राहण्याचा’ वारसा आपण आपला चालवला पाहिजे याची जाणीव झाली.

मग सुरुवात चायनीजने केली. कॉलेजच्या पहिल्या वर्षी वाढदिवसाला, चायनीजच्या नावाने जिभल्या चाटणाऱ्या त्या जमशेदपूरच्या मैत्रिणीला धरलं आणि चायनीज खायला गेलो. हुशारी करून डेक्कनला संभाजी बागेसमोरच्या हॉटेलला गेलो. हेतू हा की चायनीज आवडलं नाही तर समोर बागेत जाऊन दहा रुपयांची भेळ खायची. होस्टेलला आठ वाजेच्या आत परतायचं असायचं त्यामुळे वेळेचं नियोजन अत्यंत महत्वाचं होतं नाहीतर वाढदिवसाच्या दिवशी उपाशी झोपावं लागलं असतं. पण पहिल्याच भेटीत माझे आणि चायनीजचे सूर जुळले. संभाजी बागेतली भेळ बिचारी वाट बघत राहिली.

मग हळू हळू वडा पाव, समोसा पाव, मॉन्जिनीज, केक्स, पेस्ट्री, दोराबजी अशी मजल दर मजल करत डेक्कन ते कॅम्प या भागात कुठे काय चांगलं मिळतं इथपर्यंत मजल गेली. आणि मग तो काळा दिवस उजाडला. “पुण्यात मॅकडोनाल्ड उघडलं” म्हणत एक मैत्रीण नाचत आली. काहीतरी कारण काढून ती मला मॅकडोनाल्ड मध्ये ट्रीट द्यायला घेऊन गेली. आत्तापर्यंत पुण्याच्या खाद्य संस्कृतीत सराईत झाल्याच्या गमजा मारणारी मी तिथला मेनू बघून गडबडले. मी नक्की काय बघतेय आणि त्यातलं काय कशाशी खातात हेच कळेना. मग त्या मैत्रिणीने दोघींसाठी ऑर्डर दिली. त्या दिवशी आपली समज आणि सत्य परिस्थिती यातला फरक मला नीट लक्षात आला. त्या दिवसापर्यंत मी स्वतःला बावळट समजत होते पण त्या दिवशी चार चौघांत तो बर्गर खाऊन मी स्वतःला महाबावळट सिद्ध केलं. पहिल्यांदा साडी नेसल्यावर ती सांभाळतांना माझी जेवढी त्रेधातिरपीट उडाली नसेल तेवढी तो बर्गर खातांना उडाली. ब्रेड सांभाळावा तर पॅटिस गळून पडे. पॅटिसला जपावं तर आतले टोमॅटो कांद्याचे काप संप करत बाहेरची वाट धरत. मेयॉनीजला दर दोन मिनिटांनी माझ्या हातावरून घसरगुंडी खेळल्याशिवाय मुळी चैनच पडेना. चायनीज पासून कण कण जमवलेला आत्मविश्वास धुळीला मिळाला. त्यानंतर बरेच दिवस मी मॅक डोनाल्डच्या दिशेला फिरकले नाही.


कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाच्या निकालाच्या दिवसाची गोष्ट. मी आणि माझी एक मैत्रीण निकालाची चिंता करत डेक्कनला हिंडत होतो. निकाल लागायला दोन तास बाकी होते. तिथे आम्हाला दोन वर्ष सिनिअर असलेला कॉलेजमधला मित्र भेटला. दोन तास उन्हात काय वाट बघायची म्हणून तो आम्हाला नवीन उघडलेल्या डेक्कनच्या पिझा हट मध्ये घेऊन गेला. मॅकडोनाल्ड नंतर अनोळखी पदार्थांना जरा जपून ‘हो’ म्हणायची सवय लागली होती, पण त्या दिवशी गैरसावधपणे फसले. तिथे गेल्यावर आपल्या बावळटपणाचा नव्याने साक्षात्कार झाला. मेनू दोनदा वाचून डोळे गोल फिरायला लागले पण ते पदार्थ वाचून की त्यांच्या किंमती वाचून ते कळेना. मग “मला निकालाचं टेन्शन आलंय, तूच माझ्यासाठी ऑर्डर दे” अशी पळवाट काढून स्वतःची सुटका करून घेतली. नशीब तो मित्र पिझ्झा हाताने खात होता. त्याने जर का टेबलावरचे काटा चमचा हातात घेतले असते तर मी “आता निकाल बघितल्याशिवाय राहवत नाही” म्हणत तो पिझ्झा टाकून पुणे युनिव्हर्सिटीकडे धावत निघाले असते.

नोकरी लागल्यावर मात्र कंपनीच्या खर्चाने आणि माझ्यासारख्या नवख्या वातावरणात बावळट वाटणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या संगतीत मी महागड्या, पॉश हॉटेल मध्ये न बुजता खायला शिकले. पण कंपनीला ते पाहवेना. त्यांनी मला UK ला पाठवायचा घाट घातला. मग जेवतांना पाळायचे नियम, काटा चमचा वापरणे, खातांना शंभर वेळा नॅपकिनने तोंड पुसणे (तोंडाला काही लागलेलं असो वा नसो) हे या सगळ्याचं ट्रैनिंग आणि प्रॅक्टिस झाली. त्या ट्रैनिंग मध्ये मला प्रश्न पडला होता की “या सगळ्यात खाण्याच्या चवीकडे नक्की कुठल्या स्टेप ला लक्ष द्यायचं?” पण मी तो प्रश्न हातातल्या काट्याने तोंडातून घशात ढकलला.

व्हिडिओ गेम मध्ये जशी राजकन्या मिळाल्यावर होणार आनंद क्षणिक असतो आणि ती आपण फक्त पहिली लेव्हल पार केलेली असते तसं काहीसं UK ला पोहोचल्यावर झालं. तिथे सगळेच पदार्थ अनोळखी. कधी नाव न ऐकलेले फळं, भाज्या, मेनूमधले पदार्थ. नव्याने खाद्य संस्कारांना सुरुवात झाली. पण या वेळेस ते संस्कार लडनमधल्या मामेबहिणीने मला बावळट वाटू न देता केले. अनेक नवीन गोष्टींशी तिने ओळख करून दिली. वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, इटालियन, मिडल ईस्टर्न, ब्रिटिश पदार्थ, एक ना दोन. तिच्यामुळे मी नवीन पदार्थाना नाव ठेवण्याआधी खाऊन बघायला शिकले. पहिल्या घासात “हे काय बोरिंग” म्हणण्यापेक्षा अजून एक दोन वेळा खाऊन त्याची टेस्ट डेव्हलप करायला शिकले. लंडन मधल्या एका मैत्रिणीने कुसकूस, क्रंपेट या गोष्टींची ओळख करून दिली. तिनेच खऱ्या चायनीजशी ओळख करून दिली, तेव्हा कळलं की अनेक वर्षांपूर्वी हिम्मत करून खाल्लेलं चायनीज खरं चायनीज नव्हतंच मुळी. मग हे ही लक्षात आलं की आपण भारतीय कुठलाही आंतरराष्ट्रीय पदार्थ ‘आपलासा’ करून खातो. म्हणजे काय तर त्यात कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, तिखट हे सगळं घालून घेतो. म्हणूनच ‘क्वीन’ सिनेमात कंगना रानावत जेव्हा इटालियन रेस्टॉरंटच्या मालकाला आलं, लसूण आणि मिरची घालून त्याचा पदार्थ किती छान लागला असता हे सांगते तेव्हा मनापासून हसू येतं.

या सगळ्या आणि आणखी अनेक लोकांच्या संस्कारांतून लक्षात आलं की प्रत्येक cuisine ची आपली एक खासियत असते. सुरुवातीला ब्लँड म्हणून मी नावं ठेवलेल्या पदार्थांना जेव्हा चवीने खाऊ लागले तेव्हा कळलं की त्या पदार्थात त्यातल्या गोष्टींच्या मुळ चवीवर भर दिलेला असतो. पण कांदा लसूण ची सवय लागलेल्या आपल्या जिभेला ते अंगवळणी पडायला वेळ लागतो तर कधी ‘बावळट’ वाटण्याच्या भीतीने आपण ते खाऊन बघायचं टाळतो. पहिला घास खाण्यापूर्वी आपण त्याबद्दल आपलं मत बनवून मोकळे होतो.

या सगळ्याचा विचार करतांना वाटतं माणसाने नेहमी मातीचा ओला गोळा राहावं, मनावर जे काही संस्कार होतील ते घेत राहण्यासाठी. इतर बाबतीत माहित नाही पण निदान खाण्याच्या बाबतीत मी हे संस्कार माझ्यावर होऊ दिले याबद्दल मी कायम कृतकृत्य राहीन.

Leave a Reply