व्हेकेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख

——

ट्रेडमिल धावते आहे. डोळ्याचा virtual reality गॉगल समुद्र किनारा दाखवतोय. किनाऱ्याने आपण धावतोय, ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने. कानाचे हेडफोन समुद्राच्या लाटा ऐकवताहेत. वाऱ्याने किनाऱ्यावरची झाडं हलतांना दिसतात. पण तो वारा आपल्या पर्यंत पोहोचतच नाही. आपल्या अंगातून घामाच्या धारा वाहत राहतात. समुद्राच्या लाटांचं देखील तसंच. लाटा पायांच्या अगदी जवळ येऊन फुटतात. पण तुषार आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तरी आपण धावत राहतो. ऊर फुटेपर्यंत. समुद्रात डॉल्फिन दिसतोय. पण थांबून बघायला वेळ नाही. ट्रेडमिल धावतेय. आपणही धावलं पाहिजे. “थांबला तो संपला”.

अचानक डोळ्यांसमोर मेसेज फ्लॅश होतो “The vacation you booked 3 months ago, starts today”. धावता धावता आपण उडी मारून ट्रेडमिलच्या दोन बाजूंना पाय ठेवतो. ट्रेडमिल कोणासाठी थांबत नाही. ती आपल्याशिवाय तशीच धावत राहते. आपण डोळ्यांवरचा virtual reality चा गॉगल काढून बाजूला ठेवतो. कानाचे नॉइज कॅन्सलेशन हेडफोन्स काढतो. दोन वर्षं झालीत अविरत धावतोय. मनात उत्सुकता “एवढ्या दिवसात नक्की कुठे पोहोचलोय?” अचानक ट्रेडमिलच्या भन्नाट वेगातून शून्यावर स्पीड आल्याने नजर भिरभिरते. पाय लटलट कापतात. पाठीवरून घामाची एक धार, पहिल्या मणक्यापासून कण्याच्या टोकापर्यंत घसरगुंडी खेळत जाते. नजर जरा स्थिरावल्यावर नजरेत भरते जिमची तीच फिकट निळी भिंत. ए. सी. चा खोटा वारा अंगाला झोंबतो. कानावर ट्रेडमिलचा नीरस आवाज कानात घुमतो. दोन वर्षं धावूनही अजून होतो तिथेच आहोत की. मन उदास होतं. समोरच्या आरशातून एक प्रतिबिंब आपल्याकडे बघतं, थकलेलं, घामाने निथळलेलं, काहीसं अनोळखी, तरी पुसटश्या ओळखीच्या खुणा असणारं. नजर अजूनही स्पष्ट नाही. मग जाणीव होते हातात टोचणाऱ्या सुईची. नशेची सलाईन. आपण अलगद ती सुई काही वेळेसाठी काढून ठेवतो.

व्हेकेशन सुरु होऊन दोन तीन दिवस होईस्तोवर हळू हळू रक्तातली नशा कमी होत जाते आणि नजर साफ होत जाते. खराखुरा निसर्ग, खरे पक्षी, खरं तळं. बोथट झालेल्या मनाच्या संवेदना जाग्या होऊ लागतात. दोन वर्षं ट्रेडमिल वर धावतांना दिसत होता तो निसर्ग काहीसा वेगळा भासतो, तो खरा की हा? आता समोरचा निसर्ग हवाहवासा वाटतो. झाडाची पानं हलतात तेव्हा तो वारा अंगापर्यंत पोहोचतो आणि आपण शहारतो. “वारा असा असतो तर!” आपण स्वतःशीच उद्गारतो.

अजून एक दोन दिवसात आपण चांगले सरसावतो. हे खरं जग! हा खरा निसर्ग! ट्रेडमिलचा निसर्ग खोटा, फसवा. मनाची खात्री पटते. काहीशी विरक्ती येते. नकोच तो पैसा, तो स्टेटस. का धावतोय आपण? कशासाठी? कोणासाठी? कशासाठी हे सगळं? असंख्य प्रश्न फेर धरतात. आता इथेच राहायचं, मनाचा निश्चय होतो. काही गरज नाही ट्रेडमिलवर धावायची. माझं आयुष्य माझं आहे, दुसरं कोणी मला धावायला लावू शकत नाही. नाहीच धावणार मी आता. घड्याळ त्याच्या वेगाने सरकत रहातं. दिवस पायाखालच्या वाळूसारखे निसटत जातात. बघता बघता परतीची वेळ येते. मन आक्रोश करतं “मला आता नाही धावायचं, मी थकलोय”. कानातली पक्षांची कुजबुज मनात झिरपण्याआधी संपलेली असते. ट्रेडमिलची रटरट कानात घुमायला लागते. सवयीने आपण उडी मारून ट्रेडमिलच्या दोन्ही कडांवर पाय ठेवतो. डोळ्यांसमोर ट्रेडमिल धावत असते, ती कोणासाठी थांबत नाही. आपण सुन्न मनाने तिच्याकडे बघत राहतो पण तिच्यावर पाय ठेवायला मन धजत नाही. “काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय” मन चुकचुकत राहतं.

नजर बाजूला लटकणाऱ्या सुईकडे जाते. नशेची सलाईन! कोणासाठी ती नशा पैसा, कोणासाठी प्रमोशन, कोणासाठी मुलांचं भवितव्य, कोणासाठी हक्काचं घर. भविष्याचा कधी न वठणारा, तरी प्रत्येक जण गळ्यात मिरवणारा चेक. प्रत्येकाची नशा निराळी. “हे काही खरं नाही गड्या, नशेशिवाय धावणं कठीण आहे.” आपण मनाला समजावतो. आपली नशा आपणच निवडतो. सुई हातात शिरल्यावर सुरुवातीला त्रास होतो. डोळ्यातून एक थेम्ब अलगद खाली ओघळतो. पण काही क्षणात नशा तिचं काम बजावते. संवेदना बोथट होऊ लागतात. virtual reality चा गॉगल पुन्हा खुणावू लागतो. आपण नकळत तो डोळ्यांवर चढवतो आणि कानाला नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्स लावतो. क्षणात ट्रेडमिल दिसेनाशी होते.

पुन्हा तोच समुद्र किनारा, तोच लाटांचा आवाज, दिसत असून हाती न लागणारा फसवा वारा. आपण मनाचा हिय्या करून ट्रेडमिल वर पावलं टाकतो आणि सवयीने धावू लागतो. धावत राहतो ऊर फुटेस्तोवर, पुढच्या व्हेकेशन पर्यंत.

Leave a Reply